क्रीडा क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण बदल घडत असतात. हॉकीही या बदलापासून वंचित नाही. हॉकीमध्येही स्टीक ते मैदान यात बदल झाले. त्यामुळे हॉकीचे ध्यानचंद यांच्याकाळातील रुप जाऊन, त्याला आधुनिक स्वरुप प्राप्त झाले. शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने हॉकीच्या बदलत्या रुपाचा आढावा घेणारा हा लेख...
‘मेन इन ब्ल्यू अन् टर्फ ऑन ब्ल्यू!’ हे शीर्षक असलेल्या आपल्या लेखात आपण, ‘स्ट्रोटर्फ’चा विषय बघितला. त्यानंतर हॉकी विश्वचषकाचे सूप वाजतानाही, दूरचित्रवाणीवर बघितले.आता लेखाच्या दुसर्या भागात, आपण दि. २९ ऑगस्टच्या शनिवारी साजर्या झालेल्या हॉकीच्या जादूगारापुढे नतमस्तक होणार आहोत. दादा ध्यानचंद यांचा हा जन्मदिन आपण, ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा करतो. पण तत्पूर्वी त्या जादूगाराच्या हॉकीची निळाई अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. लंडन ऑलिम्पिक २०१२च्या काळात विकसित करण्यात आलेले ‘पॉलिग्रास टोकियो जीटी’, हे ६० टक्के उसापासून बनवलेले हॉकीचे मैदान होते. हे मैदान एक नवीनतम ‘टर्फ’च होते. त्यात आणखी सुधारणा करून, पॅरिस २०२४ स्पर्धांसाठी ‘पॉलिग्रास पॅरिस जीटी झिरो’ हे ‘टर्फ’ विकसित करण्यात आले. जे हॉकीमधील पहिले ‘कार्बन-झिरो टर्फ’ ठरले. या अत्याधुनिक मैदानासाठी, पूर्वीच्या मैदानांच्या तुलनेत ३९ ते ४० टक्के कमी पाण्याची आवश्यकता भासत असे.
पारंपरिक पद्धतीने झारीने पाणी मारणेच नव्हे, तर बागेत झाडांना पाणी देण्यासाठी वापरली जाणारी प्लॅस्टिक किंवा रबरी नळीही क्रीडाक्षेत्रात कालबाह्य झाली आहे. त्याची जागा आता ‘वॉटर कॅनन्स’ किंवा ‘पॉप-अप स्प्रिंकलर्स’सारख्या यंत्रणांनी घेतली. ‘स्ट्रोटर्फ’ मैदानांवर मुबलक पाण्याची गरज असते. दूरचित्रवाणीवर हॉकीचे ‘स्ट्रोटर्फ’वरील सामने आपण पाहिले असता कळेल की, सामन्यांच्या प्रारंभी आणि मोठ्या मध्यंतरात, मैदानावर उडणारे उंच उंच पाण्याचे फवारे इंद्रधनुष्याचा अनुभव देतात. ‘स्ट्रोटर्फ’ मैदानावर पाणी मारण्याची मुख्य कारणे जाणून घेतल्यास समजते की, ‘स्ट्रोटर्फ’ला एवढे पाणी का आवश्यक असते. ‘स्ट्रोटर्फ’च्या सुया कृत्रिम गवतामुळे घसरल्यास, खेळाडूंना दुखापत होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी पाणी मारल्याने, मैदानाचा पृष्ठभाग गुळगुळीत व्हायला आणि घर्षण कमी होण्यास मदत होते. कडक उन्हात ‘स्ट्रोटर्फ’चे तापमान खूप वाढते. पाणी मारल्याने मैदान थंड राहते आणि खेळाडूंना उष्माघाताचा त्रास होत नाही. ओल्या मैदानावर चेंडूचा वेगही नियंत्रित राहतो, चेंडू जास्त उसळत नाही आणि सरळ रेषेत फिरतो. पाण्यामुळे मैदानावरील धूळ, काडी-कचरा वगैरे वाहून गेल्याने, खेळाडूंना श्वास घेण्यास त्रास होत नाही. पाण्यामुळे टर्फचे गवत लवचिक राहिल्याने, त्याचेही सांभव्य नुकसान टळते. म्हणूनच ही ‘स्ट्रोटर्फ’ची मैदाने दीर्घकाळ टिकतात. ‘स्ट्रोटर्फ’ दीर्घकाळ जरी टिकत असले, तरी ती बदलण्याची वेळ येतेच. जगभरात ‘स्ट्रोटर्फ’ बदलण्याच्या अत्याधुनिक पद्धतींची अनेक उदाहरणे आहेत. सामान्यतः एका ‘टर्फ’चे आयुष्य हे सरासरी १५ वर्षे असते; त्यानंतर ते बदलावे लागते. २०१८ आणि २०२३च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेपूर्वी, भुवनेश्वर, ओडिशा येथील कलिंगा क्रीडागाराचे जुने ‘टर्फ’ बदलून, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मानकांनुसार नवीन निळे ‘स्ट्रोटर्फ’ बसवण्यात आले होते. २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांपूर्वी दिल्लीच्या ‘मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’ येथील मुख्य, तसेच सराव मैदानांवरील ‘स्ट्रोटर्फ’ बदलण्यात आले. नुकतेच वाराणसी येथील युपी महाविद्यालयातही ८ कोटी ५० लाखांचा खर्च करून, आंतरराष्ट्रीय मानकांचे नवीन ‘स्ट्रोटर्फ’ बसवण्यात आले. शालेय पातळीवर पायाभूत क्रीडा सुविधा सुधारण्यासाठी, इंदोरच्या डेली महाविद्यालयाच्या प्रसिद्ध फॅनशॉ हॉकी मैदानावर, १५ मिमी शॉक पॅडसह नवीन १३ मिमीचे अत्याधुनिक ‘टर्फ मार्च’ बसवले गेले. अर्जुन पुरस्कार विजेती माजी ऑलिम्पियन धावपटू अश्विनी नच्चप्पाच्या गोनीकोप्पल, कर्नाटकातील ‘अश्विनी स्पोर्ट्स फाऊंडेशन’च्या ‘काल्स स्कूल’मध्ये, पहिले ‘मेड इन इंडिया’ सिन्थेटिक हॉकी ‘टर्फ’ बसवण्यात आले. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून टाकलेले हे एक मोठे पाऊल. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रोटर्फ’ बदलण्याचा विचार करता आपल्याला असे आढळते की, दर चार वर्षांनी ऑलिम्पिक यजमान देशांमध्ये जुने ‘टर्फ’ बदलून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ‘टर्फ’ बसवले जातात. तसेच नेदरलॅण्ड्स, बेल्जियम आणि जर्मनीमधील शेकडो स्थानिक हॉकी लब्स दर दहा-बारा वर्षांनी जुने झालेले संथ टर्फ (सॅण्ड फिल्ड) बदलून, नवीन वेगवान टर्फ (सॅण्ड ड्रेस्ड किंवा वॉटरबेस्ड) बसवतात. अशी देशविदेशांत ही निळी मैदानं वापरली जात आहेत.
अनेकवेळा ज्या भागात ‘स्ट्रोटर्फ’वरील मैदानांवर मोठे सामने खेळवण्यात येतात, अशा स्पर्धांवर पाण्याच्या अपव्ययाचा आक्षेप घेतला जातो. ते अडचणीत येऊ नयेत, म्हणून प्रचंड काळजी घ्यावी लागते. पावसाचे पाणी हे क्रिकेटसारख्या क्रीडाप्रकारांना नकोसे वाटत असते, पण हॉकीला त्याच्या असण्याने काही फरक पडत नसतो. हे वक्तव्य आपण निर्धोकपणे करू शकतो. तथापि, ‘स्ट्रोटर्फ’पूर्व काळात पाऊस पडणे नकोसेच वाटत असे. मैदानावर पाऊस सुरू होताच खेळ थांबवावा लागे. लब हॉकी खेळणारे खेळाडू अशा वेळी हॉकी स्टिक आडोशाला ठेवत आणि ते हॉकीपटू तेवढ्यापुरते फूटबॉलपटू होऊन पावसात खेळायचा आनंद लुटत. हॉकीच्या सामन्यांत थोडीच रिमझिम झाली, तर जास्त पाणी साचणार्या ठिकाणी भुसा टाकून त्यावर रोलर फिरवून परत चुन्याची फक्की मारून खेळ परत चालू केला जाई. यापेक्षाही जोराचा पाऊस झाल्यास मात्र, सामना रद्द करणे, पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यायची पाळी आयोजकांवर येत असे. मैदानच नव्हे, तर संपूर्णपणे तुती किंवा अॅशचे लाकूड वापरून बनवलेली हॉकी स्टिकही पाण्याने खराब होई. पावसात किंवा ओल्या मैदानावर लाकूड पाणी शोषून घ्यायचे, ज्यामुळे स्टिक अधिक जड व्हायची. त्यामुळे, स्टिकला वारंवार तेलपाणी करावे लागे. आता ‘टर्फ’च्या आगमनाबरोबरच हॉकी स्टिकनेही कात टाकलेली दिसते. कार्बन फायबर, फायबरग्लास आणि केव्हलर अशा आधुनिक साहित्यापासून बनणारी कंपोझिट मटेरिअलची हॉकी स्टिक आता रुळली आहे. कार्बन फायबरमुळे लाकडापेक्षा दुपटीने जास्त मजबूत आणि टिकाऊ हॉकी स्टिक आता, ‘ड्रॅग-फ्लिक’स्नेही झाली आहे. पारंपरिक हॉकीचे कसब दर्शवणार्या हॉकी स्टिकनी खेळणार्या हॉकीपटूंवर पावसात खेळण्याची जेव्हा वेळ येई, तेव्हा अख्खा सामनाच मध्यातच दुसरीकडे हलवला जाई. याचे एक उदाहरणही आपण बघू शकतो.
उत्तर प्रदेशमध्ये जिथे ध्यानचंद राहायचे, त्या प्रदेशात ज्येष्ठ व्यक्तीला प्रेमाने ‘दादा’ म्हणण्याची प्रथा आहे. हॉकीचे जादूगार असलेल्या ध्यानचंद यांना, त्यांच्या घरचे आणि हॉकी जगतातले सगळेच ‘दादा’ म्हणून संबोधत. त्या दादा ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोककुमार १९७५च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे कर्णधार होते. हॉकी इतिहासकार व क्रीडा पत्रकार के. आरुमुगम यांनी, त्यांच्या ‘मार्च ऑफ ग्लोरी’ या पुस्तकात लिहिण्यासाठी अशोककुमारची एक मुलाखत घेतली. भारताने जिंकलेल्या १९७५च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित त्या पुस्तकात के. आरुमुगम एक ऐतिहासिक घटना सांगताना काय लिहितात, ते बघणे रोमांचक ठरेल.
भारताने प्रथमच एकमेव विश्वचषक जिंकला, एवढेच त्याचे महत्त्व नाही. तर, त्या १९७५च्या क्वालालंपूरच्या सामन्याचं विशेष म्हणजे, एकच हॉकी सामना दोन वेगवेगळ्या मैदानांवर खेळला जाऊ शकतो, हे जगाने पाहिले. कदाचित सगळ्यांना हे अशय वाटत असेल, पण होय! खरंच, १९७५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या हॉकी विश्वचषकात, नेमकं हेच घडलं होतं. हा आतापर्यंतचा सर्वांत नाट्यमय हॉकी सामना होता. मुसळधार पावसामुळे एकामागून एक सामने अडचणीत येत गेले. एक सामना इतका विलक्षण होता की, हॉकीच्या इतिहासात तो आजही स्मरणात राहावा, असाच आहे. त्या स्पर्धेतील एका सामन्यात मध्यंतरापर्यंत पाकिस्तान १-०ने आघाडीवर होता. मग पाऊस सुरू झाल्याने, सामना खेळण्याजोगा राहिला नाही. त्यानंतर आयोजकांनी दुसरा हाफ दुसर्या हॉकी मैदानावर हलवला. तिथे पाकिस्तानने त्या हलवलेल्या मैदानावर आणखी एक गोल करून, स्कोअर २-० असा केला. कदाचित, हा असा एकमेव विश्वचषक सामना असावा. गोष्ट इथेच थांबत नाही. जर्मनीविरुद्धच्या सामन्यावरही पावसाचा परिणाम झाला. भारताच्या जर्मनीविरुद्धच्या सामन्यालाही, त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. भारत १-०ने आघाडीवर होता आणि पाऊस सुरू झाला. अशा परिस्थितीत सामना सुरू ठेवण्यावर जर्मन संघाने आक्षेप घेतला. सामना रद्द करण्यात आला आणि दुसर्या दिवशी तो पुन्हा खेळवण्यात आला. तो सामना जिंकून, भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पर्जन्यग्रस्त परिस्थितीत अडकलेली ती स्पर्धा सावरण्यासाठी, आयोजक शय ते सर्व प्रयत्न करत होते. पाणी-पाणी झालेले मैदान सुकवण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला होता. ट्रक भरभरून भुसा टाकून, मैदान खेळण्याच्या स्थितीत आणावे लागले. हेलिकॉप्टरचा वापर करून, मैदान वापरण्यायोग्य करण्यासाठी पंखे वापरण्यात आले. सामना मध्यात थांबवून दुसर्या मैदानात नेऊन, बाकीचा सामना तिकडे खेळवला गेला होता. दोन बस करून दोन्ही संघ, पंचांसहित अन्य लवाजमा, तशाच स्टिस हातात घेऊन, तशाच कपड्यांत दुसर्या मैदानावर जात.
हॉकीतली ही घटना एकमेवाद्वितीय अशीच ठरली होती. के. आरुमुगम यांनी सांगितलेली ध्यानचंदपुत्राची कथा ऐकल्यावर, त्याचे वडील अनवाणी पायांनी आणि पावसात खेळल्याचा उल्लेखही मला आठवतो. ही माहिती आहे १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकची. त्या ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात असाच एक प्रसंग घडला होता. भारताचा जर्मनीविरुद्ध सामना होता. तेव्हा पावसाने मैदान अतिशय ओलसर आणि निसरडे झाले होते. स्पाईक असलेले बूट घालून खेळने, ध्यानचंद यांना कठीण होत होते. पूर्वार्धानंतर त्यांनी आपले बूट, मोजे काढून टाकले. उत्तरार्धात त्यांनी संपूर्ण वेळ अनवाणी पायांनीच खेळ केला आणि भारताला ८-१ असा विजय मिळवून देत सुवर्णपदक जिंकून दिले.
हॉकी विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये, प्रत्येकी १६ संघ सहभागी झाले होते. भारतीय पुरुष संघाला मात्र या स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर जर्मनी, स्पेन, नेदरलॅण्ड्स व अर्जेंटिना हे चार संघ अंतिम फेरीत दाखल झाले. महिला गटांत भारतीय संघाने या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पाचवे स्थान पटकावले, तर अर्जेंटिना-विजेता, नेदरलॅण्ड्स- उपविजेता, बेल्जियम-तिसरे स्थान, ऑस्ट्रेलिया-चौथे स्थानी राहिले. याच स्पर्धेत प्रथमच पॅरा हॉकी विश्वचषक स्पर्धा ६-अ-साईड आणि मिश्र-लिंगी स्वरूपात खेळवली गेली. या स्पर्धेतील पहिले चार शीर्ष संघ पुढीलप्रमाणे इटली-पहिले स्थान-विजेते, स्पेन-दुसरे स्थान-उपविजेते, तर भारत ११व्या क्रमांकावर राहिला.
दि. १८ जुलै १९७६ रोजी जन्मलेल्या निळ्या रंगाच्या हॉकी ‘टर्फ’च्या मैदानावर, प्रशिक्षण घेणारी आजची ब्ल्यू आणि केशरी पिढी अजून किती दिवस प्रयागराजला जन्मलेल्या ‘दादा’ पिढीचे फक्त गुणगान करत राहणार? आधीच्या प्रत्येक पिढीची हीच सुप्त इच्छा असते की, आपल्या पुढच्या पिढीने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करावे, अगदी आपल्या वरचढ जरी नाही, तरी त्यांनी आपली गादी चालवावी. दादा ध्यानचंद यांची कौशल्यपूर्ण हॉकी आता अंधूक होत असल्याचा भास, अनेकदा होतो .वेगवान धाव, स्लॅप हिट्स, टोमाहॉस, ड्रॅग फ्लिस, शेव्ह टॅकल्स असे प्रशिक्षण घेणारी निळ्या मैदानावर वाढलेली ही पिढी, बहुदा ध्यानचंदांची जादू आत्मसात करताना दिसत नाही. ती जादू आणि टोमाहॉस वगैरे शिक्षण घेणारी ही पिढी जेव्हा सुवर्ण-रौप्य अशा रंगांचा ध्यास घेईल, तेव्हाच ती ध्यानचंदांना ‘मेन इन ब्ल्यू’ची ‘टर्फ ऑन ब्ल्यू’वरून वाहिलेली खरी आदरांजली असेल.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४