बेशिस्त शहर नियोजनावर आमदार संजय केळकरांचा हल्लाबोल..

पाणीटंचाई, तरी मोठ्या इमारतींना परवानगी; विकासाच्या नवे ठाण्यात विनाशाचे नियोजन

    30-Aug-2026
TMC 1 
 
ठाणे : (TMC) ठाणे शहरात तब्बल ४० एमएलडी पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे १५० मीटर उंचीच्या तब्बल ७९ इमारतींची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात ठाण्याची पाणीटंचाई आणि नागरी समस्यांचा प्रश्न आणखी गंभीर होणार असून, शहराची क्षमता लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करण्याची गरज आहे. बेशिस्त शहर नियोजनावर टीका करताना आमदार संजय केळकर यांनी सर्वपक्षीयांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ठाण्याच्या हितासाठी निर्णय घेण्याचे आवाहन केले.
 
आमदार केळकर यांच्याकडे पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. काही गृहसंकुलांना सहा महिने ते वर्षभर पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थळपाहणी आणि तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. (TMC)
 
हे नियोजन नक्की कोणासाठी ? 
 
‘एका बाजूला पाण्याची कमतरता आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या गृहप्रकल्पांना परवानग्या, हे नियोजन नेमके कोणासाठी?’ असा सवाल उपस्थित करत केळकर यांनी महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने पुरेशा पाण्याची उपलब्धता होईपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देण्यास मनाई केली होती. मात्र, महापालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर ही बांधकाम स्थगिती उठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (TMC)
 
दरम्यान, ठाण्यात रस्ते, बोगदे, मेट्रो यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात ठाण्याकडे नागरिकांचा ओढा आणखी वाढून नागरीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत ७५ लाख वाहनांची नोंद असल्याचे सांगत, ठाण्याची पायाभूत सुविधांची क्षमता आता ताणली गेली असल्याचे केळकर यांनी नमूद केले. त्यामुळे विकासाला विरोध नसला तरी शहराची पाणी, वाहतूक आणि पायाभूत सुविधा यांची क्षमता लक्षात घेऊनच विकासाचे नियोजन झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. (TMC)
 
 




संबंधित मजकूर