ठाणे : (Thane Metro 4) ठाणेकरांची बहुप्रतिक्षित मेट्रो ४ आणि ४ए आता प्रत्यक्ष प्रवासी सेवेकडे वेगाने वाटचाल करत आहे. गायमुख-कॅडबरी जंक्शन या १०.५ किमीच्या पहिल्या टप्प्यात वापरण्यात येणाऱ्या बीईएमएलच्या सहा मेट्रो रेकना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलला देण्यात आले असून, प्रवासी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
गायमुख-कॅडबरी टप्प्यात आठ स्थानकांचा समावेश असून, यापूर्वी २ जून २०२६ रोजी या टप्प्याला आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळाले होते. सुमारे २०९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या प्रमाणपत्रामुळे सीएमआरएसच्या अंतिम सुरक्षा प्रक्रियेला सुरुवात झाली होती. (Thane Metro 4)
डेपो तयार नसल्याने गायमुखमध्ये तात्पुरती व्यवस्था
मेट्रो ४चा मुख्य डेपो अद्याप पूर्ण झालेला नसल्याने पहिल्या टप्प्यातील गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी गायमुख स्थानक आणि त्यापुढील भागाचा तात्पुरता वापर करण्यात येणार आहे. यासाठी पिट लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला सहा रेक प्रवासी सेवेसाठी वापरण्यात येतील. (Thane Metro 4)
विशेष म्हणजे, मुख्य डेपोचे काम पूर्ण होईपर्यंत आणि अल्स्टॉमच्या नव्या रेक उपलब्ध होईपर्यंत मंडाले डेपोमधील बीईएमएलच्या रेकचा तात्पुरता वापर केला जाणार आहे. याच रेकच्या माध्यमातून यापूर्वी चाचणी धावाही घेण्यात आल्या होत्या. (Thane Metro 4)
आता अंतिम मंजुऱ्यांची प्रतीक्षा
एमएमआरडीएच्या मेट्रो ४ मार्गिकेची लांबी ३२.३२ किमी असून ३० स्थानके आहेत. मात्र सुरुवातीला गायमुख-कॅडबरी हा १०.५ किमीचा भाग प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. (Thane Metro 4)
सहा रेकना सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने महत्त्वाचा अडथळा दूर झाला असला तरी संपूर्ण टप्प्यासाठी आवश्यक उर्वरित सुरक्षा मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रवासी सेवा सुरू करण्याची अंतिम तारीख निश्चित होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार वर्षाअखेरीस या टप्प्यावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (Thane Metro 4)