समय रैना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! काश्मिरी पंडित आणि बिहारी नागरिकांविषयी आपत्तीजनक वक्तव्य भोवणार ?

    30-Aug-2026
Samay Raina Kashmiri Pandit remarks
 
मुंबई (अभिनंदन परूळेकर): (Samay Raina Controversy) इंडियाज गॉट लॅटेंट सीजन दोनच्या शुक्रवार दि.२८ ऑगस्ट रोजी प्रसारित केलेल्या पाचव्या भागात काश्मिरी पंडित आणि बिहारी नागरिकांविषयी केलेल्या आपत्तीजनक विधानामुळे समय रैनाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. आपल्या शॉमध्ये आलेल्या मूळ बिहारच्या शेरोन वर्मा या कॉमेडीयनबाबत," शेरोन एक बिहारी आहे जी कामाच्या शोधात मुंबईत आली आहे.", असे विधान समय रैना याने केले होते.
त्यावर,' कमीत कमी मी माझं राज्य स्वतःच्या इच्छेने तरी सोडले.' असे प्रत्युत्तर शेरोनने समय रैनास तो काश्मीरी पंडीत असल्याचा संदर्भ देत दिले होते. तसेच ‘शेरोन इतकी बिहारी आहे की तिला ‘इबोला’ म्हणजे कुणीतरी काहीतरी बोललं, असं वाटतं.’ असे देखील समय म्हणाला. त्यावर प्रत्युत्तर देत, ‘समय इतका काश्मिरी आहे की त्याला स्वतःवर दगड भिरकवून घ्यायला आवडतं.’अशी टिप्पणी शेरॉननेही केली होती. हा व्हिडिओ समाज माध्यमांच्यामध्ये प्रसारित होताच अनेकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. या भागात परीक्षक म्हणून औरी, अर्चना पुरन सिंग, निशांत सूरी, यासह शेरोन वर्मा सहभागी झाले होते. (Samay Raina Controversy)
 
भाजपचे नेते राम कदम यावर म्हणाले, "काश्मिरी पंडित आणि बिहारी लोकांची चेष्टा केली जाऊ शकते याचा अर्थ काय आहे. कश्मीरी पंडितांवर किती अन्याय झाला आहे आणि त्यावर एक कलाकार त्यांची चेष्टा कशी काय करू शकतो. समय रैनाने देशाची तात्काळ माफी मागावी ", अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. (Samay Raina Controversy)
बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी म्हणाले ,"आपल्या देशातील कोणत्याही नागरिकांवर अशा पद्धतीने टीका सहनशक्तीच्या बाहेर आहे. जे लोक अशी टीका-टिप्पणी करतात ते देशाला तोडण्याची गोष्ट करत असतात. आम्ही अखंड भारताचे स्वप्न पाहणारे लोक आहोत." (Samay Raina Controversy)
यापूर्वी देखील समय रैनाच्या या शोमध्ये आक्षेपार्य विधाने केल्याप्रकरणी एफ आय आर दाखल झाला होता. पण हा सर्व जुना वाद मिटल्यानंतर नुकताच ऑगस्ट २०२६ च्या शेवटी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र सायबर सेलच्या एका जनजागृती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैनाचा सत्कार करण्यात आला होता.त्य़ावेळी देखील आपल्याबाबतच्या जुन्या वादांची आठवण समय रैनाने सांगितली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परवानगी घेऊन बिस्कीट खाल्याचा व्हिडिओ तेंव्हा प्रचंड व्हायरल झाला होता. पण आता हा नवीन वाद समोर आल्यावर काय घटना घडतील ते पाहणे गरजेचे ठरेल. (Samay Raina Controversy)
 
 




संबंधित मजकूर