राहुल गांधी, ‘ब्रेक द केज’!

    30-Aug-2026   
 
Rahul Gandhi Hindu women
 
राहुल गांधींनी म्हणे, हिंदू स्त्रियांना आवाहन केले की, ‘ब्रेक द केज’. पण, राहुल गांधी नेमके कोणत्या पिंजर्‍याबाबत बोलत आहेत? धर्म आणि समाजाने सन्मानाने जगण्यासाठी जे नियम केले, (जे कालबाह्य आणि अनावश्यक, तसेच वाईट आहेत ते नव्हे) त्या नियमांच्या विरोधात जायचे का? याबाबत असली मनमानी हिंदू स्त्रियांनी करावी, असे का बरे राहुल गांधींना वाटत असेल? बरे, सर्व स्त्रियांनी पारंपरिक रीतिरिवाज टाकून द्यावेत, घरातल्या नात्यागोत्यांना बासनात गुंडाळून ‘मेरी मर्जी’चा नंगानाच करावा, असे फक्त त्यांना हिंदू महिलांच्या बाबतीतच वाटते, हे मात्र नक्की. ते ‘ब्रेक द केज’ म्हणत, हिंदू महिलांना सामाजिक आणि धार्मिकतेच्या रीतिरिवाजातून आणि संकेतातून मुक्त व्हायला सांगत आहेत. मात्र, राहुल गांधी स्वतःच अशा कितीतरी पिंजर्‍यांत अडकले आहेत. राहुल गांधी हे पिंजरे कधी तोडणार? राहुल गांधी, कृपया ‘ब्रेक द केज’!
 
नुकतीच अभिनेत्री क्रिती सेनॉन हीची देहप्रदर्शन करणारी जाहिरात वादाच्या भोवर्‍यात सापडली. रक्षाबंधनाच्या जाहिरातीमध्ये देहप्रदर्शन करणारे कपडे परिधान केले म्हणून ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. अर्थात, त्यालाही अनेक संदर्भ आहेत. मात्र, यावर राहुल गांधींनी म्हटले, "स्त्रीने कोणते कपडे परिधान करावेत, काय करावे आणि कुठे जावे, हा सर्वस्वी तिचा वैयक्तिक अधिकार आहे.” मान्य आहे, कुणी काय परिधान करावे, काय नाही याचे वैयक्तिक स्वातंत्र्य संविधानाने भारतीय जनतेला दिले आहे. मात्र, सामाजिक नीतिमत्ता आणि धार्मिक अस्तित्वही असतेच असते, त्याचे काय? माणूस हा समाजशील प्राणी आहे. सामाजिक सकारात्मक संकेताच्या विरोधात जाऊन कोणत्याही पुरुषाला आणि स्त्रीला काय मिळणार? पण, राहुल गांधींनी हिंदू महिलांना आवाहन केले की, ‘ब्रेक द केज’. पण, या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या मते, जे काही स्वातंत्र्य आहे, ते तसे स्वातंत्र्य गैर हिंदू महिलांच्या बाबतीतही असावे, असे ते कधीच म्हणताना दिसत नाहीत. याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे, मुस्लीम महिलांवर केली जात असलेली हिजाबची सक्ती किंवा ‘ट्रिपल तलाक’ कायदा असूनही आजही त्या तलाकद्वारे हतबल झालेली आणि नरक यातना भोगणारी महिला, ‘हलाला’ किंवा अनेक पोरांना जन्म देऊन मेटाकुटीला आलेल्या महिला; यांच्या मानवी हक्कांबद्दल राहुल कधीच बोलताना दिसले नाहीत. बोलणार तरी कसे? कारण, जेव्हा मुस्लीम महिलांच्या समस्या समोर येतात, त्यावेळी सोईस्करपणे मुस्लीम महिलाविरोधी निर्णय घेणे, यामध्ये राहुल यांचा वडिलोपार्जित वारसा आहे. शहाबानोची पोटगी ‘शरीया’चा हवाला देऊन नाकारणारे राहुल गांधी यांचे वाडवडीलच होते. राहुल गांधी त्याच पक्षाचे नेतृत्व करतात, ज्या पक्षाने एका असाहाय्य महिलेवर घटस्फोट आणि पोटगीच्या बाबतीत अन्याय केला होता. ज्या गोष्टी अस्तित्वाच नाहीत, त्या गोष्टींच्या नावावर बेंबीच्या देठापासून ओरडून, तेच खरे आहे; असेच दाखवण्यामध्ये राहुल गांधींचे राजकारण आघाडीवर आहे. हिंदू समाजात कशा अनिष्ट चालीरीती आहेत, तसेच हिंदूंमध्ये जातिपातीचे राजकारण कसे आहे, हेच निरर्थक वाद सुरू करण्यात तर राहुल गांधींचा हात कोणीच धरू शकत नाही. पण, हिंदू समाज हा सुधारणाशील असून, समाजाने काळाची पावले ओळखत स्वतःत बदल केला असल्याने समाजातील अनेक अनिष्ट प्रथा बंद पडल्या आहेत. पण, राहुल गांधी त्या बंद पडलेल्या प्रथांना नव्याने उकरत असतात. (यावरून उकिरड्यावर गर्दभ काहीबाही हुंगत फिरते हे आठवले. पण, त्याचा आणि राहुल गांधीचा संबंध नाही, हे आधीच सांगते बरे.)
 
असो. मूळ मुद्द्याकडे वळूया. राहुल गांधी महिलांना ‘ब्रेक द केज, बे्रक द केज’ म्हणतात. पण, हिंदू महिला कोणत्याही पिंजर्‍यात कैद आहेत, असे काही दिसत नाही. समाजाने, धर्माने आणि संविधानानेही तिच्यासाठी प्रगतीच्या-सन्मानाच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. अनेकदा गरिबी, गुन्हेगारी आणि अतिभौतिकता, अज्ञान आणि इतरांचा हव्यास अशा अनेक गोष्टींमुळे तिच्यावर अत्याचार-अन्याय होत असतो. पण, ते सगळे हिंदू धर्मामुळे होते, असे म्हणणे म्हणजे मोठी चूक ठरेल.
 
दुसरीकडे हिंदू महिलांना न जाणे कोणता पिंजरा तोडायला सांगत असताना, राहुल गांधी मात्र स्वतःच अनेक पिंजर्‍यांत अडकले आहेत. ‘लोग मंदिर में लडकियों को छेडने जाते हैं’ ते ‘भगवा दहशतवाद’ अशी वादग्रस्त विधाने करणारे राहुल गांधी. पुढे भारतात हिंदू जागा होत आहे हे पाहून, आपण कसे ब्राह्मण आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी जानवे परिधान करण्याचे नाटकही केले. या सगळ्या नाटकीपणाच्या पिंजर्‍यात राहुल गांधी अडकले आहेत. हा पिंजरा त्यांना त्यांच्या मनासारखे जगू देत नाही. मनासारखे म्हणजे, त्यांना हिंदू धर्मात प्रचंड उणिवा दिसतात, काहीच चांगले दिसत नाही. मात्र, तरीही आपण हिंदू आहोत, हे त्यांना सांगावे लागते आणि कधीकधी हिंदूंसारखे दिसावेही लागते. केरळम्मध्ये त्यांना आणि त्यांच्या पक्षांना ज्या मुस्लीम मतदारांनी निवडून दिले, त्यांच्याप्रति राहुल यांची निष्ठा आणि आवड वादातीत आहे. २०१४ पूर्वी ते आणि त्यांचे अख्खे सत्ताधारी खानदान या आवडीचे अष्टोप्रहर गुणगान गायचे. पण, आता बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असलेल्या भारतात मतदार जागृत झाले. त्यामुळे विनाकारण आणि केवळ हिंदूंना कमी लेखण्यासाठी ‘चांदतारा’ आवडणार्‍या पब्लिकचे गुणगान गायले, तर परिणाम सत्ताहीन व्हावे लागते, हे राहुल यांना कळले आहे. त्यामुळे त्यांना आवडत्या मतदारांचे उघड लांगूलचालन करतानाही दहावेळा विचार करावा लागतो. राहुल गांधी अशा अगतिकेच्या पिंजर्‍यात आहेत. हा पिंजरा ते तोडूही शकत नाहीत आणि त्यात ते राहूही शकत नाहीत. हो, आणखी एका पिंजर्‍यात ते अडकले आहेत; तो पिंजरा आहे, भारतीय महापुरुषांच्या कर्तृत्वाबद्दलच्या अज्ञानाचा पिंजरा. स्वातंत्र्यवीर सावरकर असोत की, आणखी कुणी महापुरुष; राहुल गांधी यांना त्यांचा इतिहास माहितीच नाही. तसेच ते, ‘संविधान बचाव, संविधान खतरे में हैं’ अशी सातत्याने बांग देत असतात. पण, आणीबाणी लादून त्यांच्या आज्जीबाईंनीच ‘संविधान खतरे में’ केले होते, हा इतिहास त्यांना अजिबात माहिती नाही, असे दिसते. या सगळ्या अज्ञानाच्या पिंजर्‍यात ते कैद आहेत.
 
कालपरवा ते स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल पाश्चात्त्य विचारसरणीही ‘पानी कम चाय’ ठरेल, अशा थाटात बोलत होते. (मातोश्री पाश्चिमात्य असल्याने ते विचारात आणि वाणीत उतरले यात आश्चर्य नाही) तर, त्यांनी स्त्रियांच्या अस्तित्वाचा प्रश्न उच्चारला. पितृसत्ताक पद्धतीबद्दल प्रश्न विचारले. राहुल यांच्या घरी पितृसत्ताक पद्धती नाही का? नसेल तर राहुल गांधी यांनी ‘पक्षाचे सर्वेसर्वा’ पद तत्काळ सोडावे आणि प्रियंका गांधी यांना त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते मानावे. दुसरे असे की, राहुल गांधी यांनी पितृसत्ताक पद्धती तत्काळ झुगारून अगदी पित्याकडून आलेले आडनाव टाकून द्यावे. माता सोनिया यांचे नाव लावावे म्हणजे, राहुल एडविगे अँटोनिया अल्बिना मायनो. दुसर्‍या स्त्रियांचा सोडा, प्रत्यक्ष आईचा असा सन्मान राहुल यांनी करावा. पण, ते करणे तर दूरच! कारण, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, राहुल गांधी हे आपली ओळख काय आहे, या गोंधळाच्या पिंजर्‍यातही अडकले आहेत. राहुल त्यांच्या मूळ पूर्वजांचे म्हणजे, ‘फिरोज जहांगीर घांडी’ यांचे नावही त्यांच्या नावासोबत लावत नाहीत. राहुल गांधी हे पूर्वजांच्या विस्मृतीच्या पिंजर्‍यात आहेत. थोडक्यात, भारतीय समाजाचा आणि भारत देशाचा इतिहासापासून ते अगदी स्वतःच्या वाडवडिलांच्या ओळखीपासूनही राहुल गांधी अनभिज्ञ आहेत. हा अनभिज्ञतेचा पिंजरा राहुल गांधी कधी तोडणार आहेत? राहुल गांधींनी असे अनेक पिंजरे स्वतःच तयार केलेत आणि ते त्यात स्वतःच कैद झाले आहेत. मात्र, गंमत अशी आहे की, ते स्वतः अशा अनेक पिंजर्‍यांत बंद झाले असूनही त्यांना स्वतःला ते कळलेच नाही. राहुल गांधी हे पिंजरे कधी तोडणार? राहुल गांधी कृपया ‘ब्रेक द केज’!
 
‘पप्पू फेल हो गया!
 
हिंदू महिलांना ‘ब्रेक द केज’ सांगणारे राहुल गांधी भारतीय नेता नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही नापास झाले. कारण, त्यांना हिंदू समाजाचा आणि संस्कृतीचा आत्मा कळलाच नाही. ‘मनु’बिनू बोलून आणि महिलांनी कसे मुक्त व्हावे, हे बोलून त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, याच भारतीय समाजात त्यांच्या आजीने पंतप्रधानपद भूषवले होते आणि आज द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही रण गाजवणार्‍या भारतीय महिला होत्या आणि चंद्र-मंगळावर स्वारी करण्यास सिद्ध होणार्‍यांमध्येही भारतीय महिला होत्या. ग्रामीण भागात आणि आदिवासी पाड्यातल्या स्त्रीशक्तीही इतक्या समर्थ आहेत की, त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. भारतीय स्त्री वेद-पुराणात तर सोडाच, आजच्या घडीलाही शक्तिमान आहे, याचे दाखले तर वस्तीपातळीवर आहेत. पण, राहुल गांधींना हे कळणे शक्यच नाही.
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर