प्रा. यास्मिन शेख : एक दीपस्तंभ

    30-Aug-2026
 
 Prof. Yasmin Sheikh
 
दि. २४ ऑगस्ट रोजी मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांनी वयाच्या १०१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जन्माने ज्यू, लग्नानंतर मुस्लीम आणि कर्माने मराठी भाषेसाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केलेल्या शेखबाई म्हणजे दीपस्तंभच!
 
मराठी भाषा आणि व्याकरणाच्या तज्ज्ञ असलेल्या प्रा. यास्मिन शेख अर्थात, सर्वांच्या लाडया ‘शेखबाई’ दि. २४ ऑगस्टच्या सकाळी आपली इहलोकीची यात्रा संपवून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. बाई गेल्याचे कळले, तेव्हा त्यांची नुकत्याच उमललेल्या फुलासारखी ताजी टवटवीत, प्रसन्न, हासरी मूर्ती डोळ्यांपुढे आली आणि त्यानंतर एकच वाक्य सारखे ऐकू येऊ लागले, ‘मातृभाषेवर प्रेम करा.’ वाटले, बाईंच्या माघारी इतया तळमळीने मराठीविषयी आता कोण सांगणार आपल्याला? गायीच्या शुद्ध तुपाचा गोडवा आणि खमंगपणा असलेली रसाळ वाणी आता ऐकू येणार नाही. क्षणभर डोळे पाणावले. शेखबाईंनी आपल्यात रुजवलेले मराठीच्या प्रेमाचे बीज जपणे, वाढवणे, फुलवणे, आपल्या मराठी भाषेला मौल्यवान दागिन्यासारखे, उंची वस्त्रासारखे अंगाखांद्यावर परिधान करणे आणि त्याही पुढे जाऊन ‘माणूस’ होण्याचे साधन म्हणून तिच्याकडे पाहणे, हीच शेखबाईंना वाहिलेली खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.
 
शंभरी पार करणार्‍या मोजया कर्तृत्ववान माणसांमध्ये अगदी उठून दिसणार्‍या शेखबाईंना १०१ वर्षांचे दीर्घ; पण अत्यंत समाधानी, निर्मळ आयुष्य लाभले. लाभलेले हे आयुष्य अखेरच्या श्वासापर्यंत भाषाशास्त्राच्या आणि व्याकरणाच्या अभ्यासाकरिता समर्पित करून बाईंनीसुद्धा त्याचे सोने केले.
 
बाईंचा जन्म १९२५ सालचा. ज्यू कुटुंबात त्या जन्मल्या. ज्यू समाजाने जगाला किती प्रतिभावंत दिले आहेत, हे नव्याने सांगायला नको. अल्बर्ट आईनस्टाईन, फ्रांझ काफ्का... ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा मार्क झुकरबर्ग हे सगळे ज्यूच आहेत. बाईसुद्धा लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा रुबेन. बाईंचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात काम करायचे. वडिलांची नोकरी फिरतीची असली, तरी त्यांचे घर नाशिकला होते. उच्चशिक्षणासाठी बाई पुण्यात आल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ‘बीए’ करत असताना, प्रा. श्री. म. माटे आणि प्रा. के. ना. वाटवे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभले. विशेषतः प्रा. माटे यांच्यामुळेच त्यांना व्याकरणाची, मराठी भाषेची गोडी लागली. केवळ मराठीतच नाही, तर सर्वच विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्या ‘बीए’ झाल्या. पुढे ‘एमए’साठी फेलोशिपही मिळाली; पण आजारपणामुळे त्यांना विश्रांतीसाठी पुण्याहून नाशिकच्या घरी यावे लागले.
 
पावसाळा सुरू होता. मुसळधार पावसात ‘एमए’साठी पुस्तके कुठे मिळतील, याची चौकशी करण्यासाठी बाई आपल्या वडिलांबरोबर सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या घरी गेल्या. चिंब भिजलेल्या अवस्थेत पुस्तकाच्या चौकशीसाठी आलेल्या बाईंना पाहून कानेटकरांना त्यांच्या अभ्यासाविषयीच्या कळकळीचे फार कौतुक वाटले. प्रा. कानेटकरांनी त्यांना आवश्यक ती पुस्तके तर मिळवून दिलीच. शिवाय, नंतर ‘डॅडी शेख’ या तिथल्या चित्रमंदिरात काम करणार्‍या एका देखण्या, उमद्या, मुस्लीम तरुणाशीही त्यांची ओळख करून दिली. प्रा. कानेटकरांच्याच पुढाकाराने १९५० साली बाईंचे डॅडी शेख यांच्याशी लग्न झाले. मिस जेरुशा रुबेन लग्नानंतर ‘मिसेस यास्मिन शेख’ बनल्या.
 
लग्नानंतरही बाईंनी धर्म बदलला नाही. डॅडी शेख यांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. शेखबाईंनी दोन वर्षे छत्रपती संभाजीनगरच्या मिलिंद महाविद्यालयात आणि नंतर मुंबईला शीव येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयात २७ वर्षे मराठीचे अध्यापन केले. ‘एसआयईएस’ महाविद्यालयात विंदा करंदीकर इंग्रजी व चंद्रकांत बांदिवडेकर हिंदी शिकवत. श्री. पु. भागवत मराठीचे विभागप्रमुख होते.शेवटची सात वर्षे शेखबाई विभागप्रमुख होत्या. निवृत्तीनंतर दहा वर्षे ‘यूपीएससी’च्या परीक्षार्थींना त्यांनी मराठी भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकवले. एकूण ४४ वर्षे त्यांनी मराठीचे अध्यापन केले. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ अशी फार महत्त्वाची पुस्तके बाईंनी लिहिली.शब्दकोशाहून अगदी वेगळा असा त्यांचा शब्दलेखनकोश! शब्द कसा लिहावा, त्याची रूपे कशी होतात ते सांगणारा. लेखकांना, मराठी भाषेच्या अभ्यासकांना तर फारच उपयुक्त ठरेल असा. बाईंचे हे ऋण कधीही न फिटणारे. आपण अनेकदा शब्दांची रूपे ऐकीव माहितीवरून, कानाला लागलेल्या सवयीनुसार वापरतो, अशा वेळी बाईंचा हा कोश हाताशी असला की अगदी सोय होते.
 
मला एकदा कविता सुचली. ‘दोन फुले दोन पाने’ त्याचे शेवटचे कडवे आहे-
आठवांच्या दोन लाटा
सांग त्यांना कोण पुसे
अथांगशा समुद्रात
उसासांचे किती मासे
 
पण, या शेवटच्या ओळीत ‘उसासांचे’ हे जे काय लिहिले, ते बरोबर आहे ना; अशी शंका आली. मग लगेच शेखबाईंचा मराठी शब्दलेखनकोश काढून पाहिले, तेव्हा समजले की, ‘उसाशांचे’असे रूप होईल ‘उसासा’ या शब्दाचे. मग त्यानुसार मी कवितेची ओळ ‘उसाशांचे किती मासे’ अशी सुधारून घेतली. माझा ‘तळ्यातले आकाश’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला, तेव्हा आवर्जून बाईंना भेटले. संग्रह देताना ही आठवण सांगितल्यावर त्यांना फार समाधान वाटले. मराठी भाषा अचूकपणे लिहिली, बोलली जावी, असे फार आतून वाटायचे त्यांना!
 
भेटीत बाई मला म्हणाल्या, "आजकाल बोली भाषेत किंवा लेखनामध्येही व्याकरणाच्या नियमांची पायमल्ली केली जातेय. कोणालाच त्याचं काही वाटत नाही. फार वाईट वाटतं, त्रास होतो. दिवंगत नेत्याविषयी ‘स्वर्गीय’ हा शब्द सर्रास वापरला जातो. मराठीमध्ये ‘स्वर्गीय’ हा शब्द आनंदाचं विशेषण म्हणून येतो. दिवंगत व्यक्तीसाठी ‘स्वर्गवासी’ हाच शब्द वापरला गेला पाहिजे. ‘मला मदत कर’ असं म्हणण्याऐवजी ‘माझी मदत कर,’ असं म्हटलं जातं. इथं ‘माझी’ हे ‘मदत’ या शब्दाचे विशेषण आहे, हे ध्यानातच येत नाही, किती उदाहरणं सांगू तुला...”
 
बाईंना मी प्रामाणिकपणे सांगितले की, "बाई, माझं मराठी भाषेवर प्रेम आहे; पण व्याकरण कठीण जायचं शाळेत असताना. नंतर शास्त्र शाखेत प्रवेश घेतल्यावर तर संपर्कच तुटला. संस्कृतच्या बाईंमुळे मात्र शब्दांच्या उच्चारांकडे, शुद्धाशुद्धतेकडे लक्ष द्यावं, हे रुजलंय मनावर. पण, संस्कृतचे सगळेच नियम मराठीला लागू होत नाहीत. त्यामुळे संस्कृत भाषेप्रमाणे विचार केला की, अनेकदा माझा गोंधळ होतो. संस्कृतमध्ये ‘मधु’ म्हणजे मध हा शब्द नपुसकलिंगी आहे, तर मराठीत ‘मध’ हा शब्द पुल्लिंगी. हा र्‍हस्व, दीर्घ शब्द उच्चारानुसार लिहिताना किंवा लेखनाप्रमाणे बोलताना अनेकदा फसगत होते. ‘अक्षरधन’चा संस्कृत आणि मराठी उच्चार वेगवेगळा करावा लागतो ना! अगदी अलीकडेच लक्षात आलं ते माझ्या.”
 
त्यावर बाई म्हणाल्या, "मराठीत अनेकदा आपण उच्चार करतो तसं लिहितोच असं नाही. ‘बाहेर खूप ऊन आहे’ असं म्हणताना ‘ऊन’चा उच्चार र्‍हस्व करतो; पण लिहिताना तो शब्द दीर्घ आहे. मराठी पुष्कळशी संस्कृतोद्भव आहे. तरीही, प्रत्येक भाषा तशी स्वतंत्र असते. त्या भाषेचं अगदी तिच्या पोटभाषेचं व्याकरणसुद्धा वेगवेगळं असतं. भाषाशास्त्र कळलं की, त्या भाषेचं व्याकरण नीट समजतं.”
 
मी कविता लिहिते म्हणून बाई मला म्हणाल्या, "कवींना व्याकरणाचे कठोर नियम लागू पडत नाहीत. कवितेला आणि कवींना स्वातंत्र्य आहे. म्हणजे बघ, केशवसूतांची ‘तुतारी’ कविता आहे ना, त्यात ‘भेदुन टाकिन सगळी गगने’ अशी ओळ आहे. आता ‘गगन’ या शब्दाचं अनेकवचन होत नाही. पण, कवितेत मला ते खटकत नाही. कवीचा तो अधिकार आहे. लय, मात्रा किंवा काही नवनिर्मिती करताना त्याला हवं तसं वळण तो देऊ शकतो.” बाईंकडून हे ऐकताना मला अगदी दिलासाच मिळाला.
 
बाई इतक्या मिश्कील आहेत की, लहान असताना त्यांच्या हातून झालेली लेखनातली मजेशीर चूकही निःसंकोचपणे सांगितली. त्यांनी शाळेत असताना एक वाक्य लिहिले होते की, ‘सावकाराने शेतकर्‍याला निर्व्याज कर्ज दिलं.’ त्यावेळी सरांनी त्यांना जवळ बोलावून ‘निर्व्याज’मधल्या ‘ज’चे दोन्ही उच्चार आणि त्यानुसार अर्थ सांगितला होता; आणि हेही सांगितले की, ‘निर्मळ मन’ या अर्थी ‘निर्व्याज’ हा शब्द मुख्यत्वे वापरला जातो. कर्ज निर्व्याज कुणी का देईल? फार तर निर्व्याज मनाने देईल. यावर मी आणि शेखबाई खळखळून हसलो.
 
‘एसआयईएस’ महाविद्यालयात काम करत असतानाची बाईंची एक आठवण अगदी निराळीच आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन त्या पंढरपूरला आल्या होत्या. स्वत: निरीश्वरवादी असलेले श्री. पु. भागवतही सोबत होते. बाई सांगतात, "भक्तगणांच्या रांगेतून हळूहळू पुढे सरकत विठ्ठलाच्या मूर्तीसमोर भागवत उभे राहिले. मी त्यांच्या मागेच होते. कसं कुणास ठाऊक, मी एकदम म्हटलं, ‘भागवत, विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवा.’ त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. मला वाटलं, ते तसंच पुढे सरकतील. पण, त्यांनी विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवलं. मला ते दृश्य विलक्षण वाटलं. मी त्यांना तसं का सांगितलं? काही कळेना. मंदिरातून बाहेर पडल्यावरही ते काही बोलेनात. गप्पगप्पच होते.” ज्ञानदेव, तुकोबा, नामदेव यांच्यावर आपली श्रद्धा असते, तर मग या संतांची श्रद्धा असलेल्या विठ्ठलावर का नसावी? विठ्ठल हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, महाराष्ट्राचे ते दैवतही आहे, आपण त्याच्या चरणावर माथा टेकायला हवा, असे बाईंना वाटते. व्यक्तिगत श्रद्धांच्या, तत्त्वांच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेले बाईंचे हे मन किती लोभस आणि प्रगल्भ!
 
ज्यू म्हणून त्यांच्या वडिलांना घर मिळताना त्रास व्हायचा आणि गावापासून दूर जागा मिळायची. बाईंना स्वतःलाही उत्तर आयुष्यात पुण्यात घर शोधताना त्यांच्या ‘शेख’ आडनावाचा त्रास झालाच. विद्यार्थ्यांनाही ‘शेखबाई’ काय मराठी शिकवणार, असा प्रश्न पडायचा सुरुवातीला. पण, शिकायला लागल्यावर भ्रमनिरास व्हायचा. बाईंविषयी आदर वाटायचा. बाई सांगतात, "शाळा, कॉलेजमध्ये शिकताना, प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना शिक्षक, मित्रमंडळींचा, विद्यार्थ्यांचा पुष्कळच स्नेह मिळाला. दुजाभाव तर नाहीच. उलट, भाषाशास्त्र आणि व्याकरणविषयक कामाची, मतांची खूपच दखल घेतली गेली. मोठमोठ्या मराठी साहित्यिकांकडून आदरही मिळाला. ‘अंतर्नाद’सारख्या प्रतिष्ठित मासिकात व्याकरण सल्लागार म्हणून मान मिळाला. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले, प्रसिद्धीही खूप मिळाली.” बाईंच्या चेहर्‍यावर तो आनंद, ते समाधान कायम दिसायचे. काही मोजके अनुभव मनाला त्रास देणारे असले, त्याने मन दुखावले गेले असले, तरी कोणतीही कटुता, द्वेष, राग, आकस बाईंच्या मनात नव्हता. बाईंना एवढेच वाटे की, व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला मिळालेला स्नेह सार्वजनिक पातळीवरही जाणवायला हवा. धर्माची, जातिपातीची बंधने माणसाने झुगारून द्यावीत. आपण कोणत्या धर्मात वा जातीत जन्माला येणार हे आपल्याला माहीत नसते. ते आपण ठरवूही शकत नाही. आपण माणसे आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, हे जर आपण मनापासून स्वीकारले, तर मानवी समाज सुखी होईल.
 
स्वयंपाकाची आवड नसली, तरी भाषासूत्रांकरिता स्वयंपाकगृहात डोकावणार्‍या चकल्या, करंज्या करताना पिठात घालायचे ‘मोहन’ हे मुळातल्या ‘मोवन’ या नपुसकलिंगी शब्दाचा अपभ्रंश असून, त्याचा अर्थ ‘मऊ’, ‘मृदू’ आहे, असा व्युत्पती कोशातून शोध घेणार्‍या, शंभरीतही व्याकरणाच्या पुस्तकाचे मुद्रितशोधन आनंदाने करणार्‍या, व्याकरण इतके पक्के असतानाही भोवताली कमीत कमी तीन-चार शब्दकोश ठेवून काम करणार्‍या शेखबाईंना अगदी मोजया प्रसंगांच्या निमित्ताने स्नेही दिलीप फलटणकर यांच्यामुळे भेटता आले, हे माझे केवढे भाग्य!
 
माहेरचे कुटुंब ज्यू आणि सासरचे मुस्लीम असल्याने शेखबाईंना अनेकदा विचारले जायचे की, "तुमची मातृभाषा कोणती?” बाईसुद्धा बाणेदारपणे सांगायच्या, "मी महाराष्ट्रात जन्मले, इथेच वाढले. त्यामुळे माझी मातृभाषा मराठीच!” भाषेला धर्म नसतो, जात नसते. मराठी भाषा महाराष्ट्रात जन्मलेल्या, येथे वास्तव्य करणार्‍या सर्वांचीच आहे. सध्या धर्म, जातपात यांसारख्या अस्मिता अधिक टोकदार होत आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात, आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक श्रीमंत होण्याच्या नादात बहुतांशी समाजाचे मातृभाषेकडे दुर्लक्ष होते. अव्वल दर्जासाठी, सत्तेसाठी जगभरात संघर्ष तर सुरूच आहेत. अमेरिका-इस्रायलचे इराणविरोधातील युद्ध, ज्यू आणि इस्लाम धर्मियांचे परस्परांमधले अनेक काळापासून असलेले वैर, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेखबाईंचे विचार एखाद्या दीपस्तंभासारखेच आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहतील. लाडया शेखबाईंना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांच्या कर्तृत्वाला सादर शतप्रणाम!
 
दीपाली दातार
९८५०३४८०८१




संबंधित मजकूर