मुंब्रा रेतीबंदर खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

    30-Aug-2026
Mumbra Retibunder
 
ठाणे : (Mumbra Retibunder) गणेश विसर्जन घाट, मुंबई-नाशिक महामार्गालगत रेतीबंदर, ठाणे पश्चिम येथे खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन व्यक्तींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी घडली. घटनेची माहिती दुपारी ३.०८ वाजता मिळताच पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने (TDRF) तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरपाडा, मुंब्रा येथील आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघे रेतीबंदर येथील गणेश विसर्जन घाटाजवळील खाडीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. (Mumbra Retibunder)
 
घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, नारपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान फायर वाहन आणि रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दोन रुग्णवाहिका, एक युटिलिटी वाहन व बोटीसह, तर ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान बस आणि बोटीसह बचावकार्यात सहभागी झाले. (Mumbra Retibunder)
 
TDRF जवानांनी अथक प्रयत्न करत तिघांचाही शोध घेतला. अखेर सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास तिघांना खाडीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे पाठविण्यात आले.सदर तिन्ही व्यक्तींना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे. (Mumbra Retibunder)
 
या घटनेमुळे ठाकूरपाडा, मुंब्रा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गणेश विसर्जन घाट व खाडी परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Mumbra Retibunder)
 






संबंधित मजकूर