मुंबईकरांच्या पार्किंगचा खर्च वाढणार! नवीन दर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

    30-Aug-2026
Mumbai parking fees
(चित्र : एआय) 
 
मुंबई : (Mumbai parking fees) मुंबईत वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे; मात्र त्या तुलनेत पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनचालकांसमोर वाहन कुठे उभे करायचे, हा प्रश्न कायम असतो. वाहनचालकांच्या सुविधेसाठी मुंबई महानगरपालिका शुल्क आकारून सार्वजनिक पार्किंग तसेच रस्त्यावरील पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देते. आता या पार्किंगच्या ठिकाणांचे शुल्क महागणार आहे.
 
मुंबई महानगरपालिका पुढील दोन वर्षांसाठी पार्किंग शुल्कात १० टक्के वाढ करण्याच्या तयारीत आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो लवकरच मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. (Mumbai parking fees)
 
मुंबईत गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या सातत्याने वाढली आहे. सध्या मुंबईतील वाहनांची एकूण संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. (Mumbai parking fees)
 
वाहनसंख्या वाढल्यामुळे पार्किंगची समस्याही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने पार्किंग व्यवस्थेकडे लक्ष देताना बहुमजली यांत्रिक पार्किंगसह रस्त्यांवरील पार्किंगची सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या महानगरपालिकेची ३७ सार्वजनिक पार्किंगची ठिकाणे आणि ६७ रस्त्यांवरील पार्किंगची ठिकाणे उपलब्ध आहेत. (Mumbai parking fees)
 
जानेवारी २०१५ मध्ये व्यापक ‘पे अँड पार्क’ धोरण तयार करताना पार्किंग शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नागरिक आणि राजकीय पक्षांच्या विरोधानंतर राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती. दोन वर्षांनंतर ही स्थगिती उठविण्यात आली; मात्र शुल्कात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यानंतर २०२२ पासून प्रशासकीय कार्यकाळ असल्याने तीन वर्षे पार्किंग शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. (Mumbai parking fees)
 
अखेर मुंबई महानगरपालिकेने पार्किंग शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव पुढील आठ ते दहा दिवसांत तयार करून महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर तो स्थायी समिती आणि मुंबई महानगरपालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. (Mumbai parking fees)
 
४६.४० टक्के शुल्कवाढीच्या प्रस्तावाला स्थगिती
 
गेल्या तीन-चार वर्षांपासून पार्किंग शुल्कात वाढ झालेली नसल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी एकूण ४६.४० टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करून महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, एवढी मोठी वाढ योग्य नसल्याचे मानण्यात आले. त्यामुळे आयुक्तांनी पुढील दोन वर्षांसाठी ए, बी आणि सी श्रेणीतील पार्किंगच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवीन प्रस्ताव तयार केला जात आहे. (Mumbai parking fees)
 
सी श्रेणीतील पार्किंगचे सध्याचे शुल्क
 
चारचाकी वाहनांसाठी : १ तासासाठी – ₹२५ ३ ते ६ तास – ₹४० ६ ते १२ तास – ₹७०
दुचाकी वाहनांसाठी : १ तासासाठी – ₹१० ३ ते ६ तास – ₹२५ ६ ते १२ तास – ₹३०
 
बी श्रेणीतील पार्किंगचे सध्याचे शुल्क
 
चारचाकी वाहनांसाठी : १ तासासाठी – ₹२० ३ ते ६ तास – ₹३५ ६ ते १२ तास – ₹६०
दुचाकी वाहनांसाठी : १ तासासाठी – ₹५ ३ ते ६ तास – ₹२० ६ ते १२ तास – ₹२५
 
ए श्रेणीतील पार्किंगचे सध्याचे शुल्क
 
चारचाकी वाहनांसाठी : १ तासासाठी – ₹२० ३ ते ६ तास – ₹३५ ६ ते १२ तास – ₹६०
दुचाकी वाहनांसाठी : १ तासासाठी – ₹५ ३ ते ६ तास – ₹२० ६ ते १२ तास – ₹२५
 
 




संबंधित मजकूर