धार्मिक आचार-विचार वेगवेगळे असले तरी अंतिम सत्य एकच! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    30-Aug-2026   
 
Dr. Mohan Bhagwat
 
मुंबई (Dr. Mohan Bhagwat) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘एक विश्व : एक मानवता – धर्मगुरूंचे संमेलन’ (One World: One Humanity – Faith Leaders Conference) या कार्यक्रमात धार्मिक विविधता, मानवता आणि सामाजिक एकतेबाबत आपला संदेश दिला. विविध धर्मांच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले की, उपासनेच्या पद्धती आणि धार्मिक आचार-विचार वेगवेगळे असू शकतात; मात्र अंतिम सत्य आणि मानवता एकच आहे.
 
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, भारताच्या परंपरेमध्ये धर्म वेगवेगळे असू शकतात, पण मानवता एक आहे, ही विचारधारा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सत्य एकच आहे आणि मानवता ही त्याच सत्याची निर्मिती आहे. जगाच्या विविध भागांत जाऊन, विविधता असली तरी संपूर्ण मानवता एकच आहे, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे ही संघाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
 
हिंदू-मुस्लिम सलोख्याबाबत संदेश देताना ते म्हणाले, एखादा हिंदू असा विचार करत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर त्याला हिंदुत्वाची मूलभूत भावना समजलेली नाही. सत्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग असू शकतात; मात्र त्यांचे अंतिम ध्येय एकच असते. मानवांमध्ये कोणताही मूलभूत भेद नाही आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मान व प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. विविधता स्वीकारूनही एकतेची भावना कायम ठेवणे ही भारतीय परंपरेची विशेषता असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Dr. Mohan Bhagwat)
 
न्यूयॉर्कमधील या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून सरसंघचालकांचा संदेश प्रामुख्याने विविधतेतील एकता, धार्मिक संवाद, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समरसता याभोवती केंद्रित होता. हिंदुत्वाच्या व्याख्येपासून मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांसोबतच्या संवादापर्यंत तसेच आधुनिक राजकारणाच्या भूमिकेपर्यंत, त्यांनी भारतीय अनुभवाला जागतिक संदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला.

धर्माचा उद्देश सत्यापर्यंत पोहोचणे
 
धर्म आणि धार्मिक आचरणाबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले, आज धर्माची व्याख्या मोठ्या प्रमाणात विविध रीतिरिवाज आणि कर्मकांडांच्या आधारे केली जाते. धार्मिक शिस्त आणि उपासनेच्या पद्धती एखाद्या आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आवश्यक असू शकतात; मात्र धर्माचा अंतिम उद्देश सत्यापर्यंत पोहोचणे हा आहे. वेगवेगळ्या धर्मांचे अनुयायी आपापल्या धार्मिक परंपरा आणि पद्धतींचे पालन करू शकतात; मात्र त्यामुळे मानवतेची मूलभूत एकता संपुष्टात येत नाही. हाच विचार जगासमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (Dr. Mohan Bhagwat)
 
मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांसोबत संवादाचाही उल्लेख
 
सरसंघचालकांनी भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांसोबत संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या संवादाचाही उल्लेख केला. संवाद हा पहिला टप्पा आहे; मात्र सेवेला संवादानंतरची प्रक्रिया मानता कामा नये. दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू राहायला हव्यात, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, संघाच्या सेवा कार्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. संघाच्या कार्याबाबत अनेकदा गैरसमज किंवा चुकीचे कथानक तयार केले जाते; मात्र जेव्हा लोक स्वतः येऊन संघाचे कार्य समजून घेतात, तेव्हा असे गैरसमज लवकर दूर होऊ शकतात. सेवा कार्याच्या प्रचाराच्या बाबतीत संघ मागे राहतो, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, संघाचा भर काम करण्यावर अधिक आणि त्याबद्दल सांगण्यावर कमी राहिला आहे. (Dr. Mohan Bhagwat)
 
आधुनिक राजकारण आणि जनमताचा प्रभाव
 
डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या उद्बोधनात आधुनिक राजकारण आणि जनमताच्या प्रभावावरही भाष्य केले. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष आणि नेते जनतेच्या मताने प्रभावित होतात आणि कोणत्याही राजकारण्याला जनमताच्या विरोधात जाणे सोपे नसते. युद्ध थांबवायचे असेल किंवा जगात सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल, तर राजकारणावरही प्रभाव टाकावा लागेल. मात्र राजकारणावर प्रभाव टाकण्यामागचा उद्देश सत्ता किंवा वैयक्तिक हितसंबंध नसून योग्य दिशेने परिवर्तन घडवून आणणे हा असला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. आजच्या राजकारणात अनेकदा ‘मी आणि माझे’ ही भावना वरचढ ठरते. या विचारसरणीतून समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही. त्याऐवजी ‘आपण आणि आपले’ ही भावना पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (Dr. Mohan Bhagwat)
 
समाज पातळीवर परिवर्तनाची गरज
 
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकता केवळ राजकीय निर्णयांमधून साध्य होऊ शकत नाही. त्यासाठी समाज पातळीवर परिवर्तनाची गरज आहे. भारतात संघाने याच दिशेने काम सुरू केले आहे. समाजाने सर्वप्रथम एकमेकांना समजून घेतले पाहिजे, संवाद वाढवला पाहिजे आणि एकत्रितपणे सेवा केली पाहिजे. त्यानंतर त्याचा राजकीय व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी नमूद केले. (Dr. Mohan Bhagwat)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर