महाराष्ट्र प्रदेश म्हणजे लोककलांची जन्मभूमी आणि लोककलावंतांची कर्मभूमी. इथे अनेक लोककला उदयाला आल्या, अनेक लोककलावंत निर्माण झाले, लोककलावंतांनी लोककलेला नटवले, सजवले. महाराष्ट्रजनांचे मनोरंजन केले, प्रबोधन केले. अशा लोककलावंतांची दखल घेतली पाहिजे, त्यांनी केलेले कार्य किती महत्त्वपूर्ण आहे हे जनसामान्यांना सांगितले पाहिजे, या भूमिकेतून प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी ‘लोकरंगनायक’ हा ग्रंथ निर्माण केलेला आहे.
'लोकरंगनायक’ या ग्रंथात डॉ. प्रकाश खांडगे यांनी एकूण १३ लोककलावंतांचा परिचय करून दिलेला आहे. त्यामध्ये देवीचा गोंधळ देशात आणि परदेशात प्रभावीपणे सादर करणारे ‘गोंधळमहर्षी’ राजारामबापू कदम, तमाशाकलेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवणारे ‘तमाशासम्राट’ दत्तोबा तांबे शिरोलीकर, दिल्ली दरबारी सन्मानाचे मानकरी ठरलेले ‘विनोदसम्राट’ दादू इंदुरीकर, मुक्तनाट्याचा नवा प्रकार सादर करणारे महाराष्ट्र शाहीर ‘पद्मश्री’ शाहीर साबळे, महाराष्ट्र जनतेला जागृतीचा संदेश देणारे आत्मशाहीर आत्माराम पाटील, शाहिरीच्या माध्यमातून समाजजागृती करणारे शाहीर बापूराव विभूते, लोकांसाठी शाहिरी गाणारे लोकशाहीर विठ्ठल उमप, लोकसंस्कृतीचे अभ्यासक-नाटककार अशोकजी परांजपे, अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवणारी विनोदाची जोडगोळी काळू-बाळू, कीर्तनातला ज्ञानदीप ‘हभप’ रामदासबाबा मनसुख, चित्रकथी परशुराम गंगावणे, ‘भारुडरत्न’ डॉ. रामचंद्र देखणे, विनोदाला झटकन कलाटणी देणारे विनोदवीर ‘पद्मश्री’ रघुवीर खेडकर अशा नामवंत लोककलावंतांचा समावेश आहे. लोककलावंतांचा परिचय करून देताना त्यांच्या कलेची निर्मिती कधी झाली, याचीही माहिती प्रा. डॉ. खांडगे लिहितात. त्यामुळे या ग्रंथाला संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे.
या ग्रंथातील लेख वाचताना आपल्याला कधी आनंदाचा, तर कधी दुःखाचा धक्का बसत असतो. १०५ वर्षांचे ‘गोंधळमहर्षी’ राजारामबापू पॅरिसमध्ये ‘आयफेल टॉवर’च्या समोर गोंधळ सादर करताना १६ वर्षांच्या तरुणाप्रमाणे नाचतात, गिरक्या घेतात हे वाचताना आपण अचंबित होतो, आनंदित होतो, तर, विठ्ठल उमप प्रेक्षकांना हात जोडून ‘जय भीम’ म्हणत नमस्कार करीत असताना जगाचा निरोप घेतात, हे वाचून आपण दुःखीकष्टी होतो. मनाला हुरहूर लावणारी ही घटना आहे. पण, या दोन्ही प्रसंगातून आपल्या लक्षात येते की, लोककलावंत कलेशी एकनिष्ठ असतात. वयाचे कारण देऊन राजारामबापू गोंधळ करण्यास नकार देत नाहीत, शाहीर विठ्ठल उमप यांनी तर रंगमंचावरच प्राण सोडला आहे. हे लोककलावंत कलेशीच एकरूप झालेले होते. कलेची एक झिंग असते. एकदा ती नशा अंगात भिनली की, तो कलावंत प्राणाचीही पर्वा करीत नाही, या उक्तीची सत्यता आपल्याला राजारामबापू आणि शाहीर विठ्ठल उमप यांचे लेख वाचताना पटते.
‘लोकरंगनायक’ या ग्रंथातील लेख वाचताना आपणही त्या लोकरंगात अक्षरशः हरवून जातो. काळू-बाळूचा लेख वाचताना आपल्या चेहर्यावर हसू उमटलेले असते. प्रा. डॉ. खांडगे यांनी हा लेख अतिशय अप्रतिम लिहिलेला आहे. काळू-बाळू म्हणजे तमाशा क्षेत्रातील एक चमत्कारच होता. दोघे भाऊ दिसायला एकसारखे; रंग, उंची, आवाज कशातही फरक नाही. त्यांच्या विनोदाला हसला नाही, असा महाराष्ट्रात तमाशारसिक सापडणार नाही. ते दोघे पुढे आले की, प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट उसळायची. एक-दीड तास लोकांना ते हसवत ठेवायचे. हसूनहसून माणसे बेजार होऊन जायची. त्यांच्या जन्माची कथाही आश्चर्यचकित करणारीच आहे. ती पुस्तकातच वाचली पाहिजे, म्हणजे वेगळा अनुभव घेतल्याची जाणीव होईल.
या ग्रंथातील ‘विनोदसम्राट’ दादू इंदुरीकर यांच्यावर लिहिलेला लेख आवर्जून वाचला पाहिजे. यांच्यामुळेच तमाशा वातानुकूलित थिएटरमध्ये गेला आणि तमाशाचे तिकीट काढण्यासाठी रांगा लागल्या. दादू इंदुरीकर म्हणजे हजरजबाबी सोंगाड्या, विनोदाचा हुकमी एक्का! त्याने सादर केलेले ‘गाढवाचं लग्न’ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही गाजले. ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. दादू इंदुरीकर यांच्यावरचा लेख म्हणजे हसू आणि आसू याचे मिश्रण आहे. आपण कलावंतांची कला बघतो; पण कलावंतांच्या सुख-दुःखाचा विचार करीत नाही. प्रेक्षकांनी कलावंतांच्याही व्यथा-वेदनांचा विचार करावा, याची जाणीव करून देण्यासाठी प्रा. डॉ. खांडगे रघुवीर खेडकरांचे उदाहरण देतात. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम होता. राजीव गांधींची हत्या झाली होती. बॉम्बस्फोटात राजीव गांधींचा मृत्यू होतो, हे दृश्य दाखवण्यासाठी आपटबार आणलेले होते. ते एका लोखंडी पेटीत ठेवलेले होते. त्या दिवशी साडेसहा वर्षांचा बबलू (बेबीताईचा मुलगा) खेळता-खेळता राहुटीत ठेवलेल्या त्या पेटीजवळ गेला. त्याने पेटीचे लोखंडी झाकण वर उचलले नि जोराने खाली सोडले. तसा आपटबारांचा मोठा स्फोट झाला. त्यात बबलू जबर जखमी झाला, तर तमाशातील एक सोंगाड्या वामन लोहगावकर जागेवरच ठार झाला. असा भयानक प्रसंग घडला, तरी तमाशा बंद ठेवता येत नव्हता. बबलूला कांताबाई नांदेडला दवाखान्यात घेऊन गेल्या. वामन लोहगावकरचे प्रेत झाकून ठेवले नि तमाशा चालू ठेवला. स्टेजवर बबलूची आई-बेबी चेहर्यावर कसलेही दुःख न दाखवता नाचत होती. आलेल्या संकटावर मात करून तमाशाकलावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात, अशा लोककलावंतांबद्दल आपल्या मनात प्रेम-आपुलकी असली पाहिजे, हे सांगायला प्रा. डॉ. खांडगे विसरत नाहीत.
या ग्रंथातील परशुराम गंगावणे यांच्यावरचा लेख वाचताना आपल्या मनात आपसूकच अपराधीपणाची भावना निर्माण होते. कारण, पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात ‘चित्रकथी’ ही कला होती. पण, आता सिंधुदुर्गातील पिंगुळी गावापुरतीच उरली आहे, हे महाराष्ट्राचे केवढे दुर्दैव! काळाच्या ओघात अनेक लोककला अस्तंगत झालेल्या आहेत. पांगुळ गेला, भांड गेला, जात्यावरच्या ओव्या गेल्या, मोटेवरची गाणी गेली, तमाशासारखी कलाही शेवटच्या घटका मोजत आहे. याची दखल महाराष्ट्रातील माणसांनी घेतली पाहिजे. लोककलेबरोबर सांस्कृतिक लोकसंस्कृतीही नष्ट होते. ते घडू नये म्हणून लोककला आणि लोककलावंत जिवंत राहिले पाहिजेत, ही भावना जागृत झाली; तर प्रा. डॉ. खांडगे यांनी लिहिलेल्या ‘लोकरंगनायक’ या ग्रंथाचे सार्थक होईल.
पुस्तकाचे नाव : लोकरंगनायक
लेखक : प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या : २०३
मूल्य : रु. ३५०
- सोपान खुडे