मुंबई (Dr. Mohan Bhagwat New York speech) : अमेरिकेचा उल्लेख झाला की ‘बहुविधता’ / बहुलतवाद (प्लुरालिझम) हा शब्द समोर येतो; तर भारताचा विचार केला की ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना अधोरेखित होते. भारतासाठी एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी त्याच्या डीएनएमध्येच आहेत. राष्ट्रे ही केवळ भौगोलिक सीमा नसतात, सृष्टीच्या व्यापक योजनेत प्रत्येक राष्ट्राला एक विशिष्ट कर्तव्य सोपवण्यात आलेले असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
अमेरिकेतील अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग (अहेड फोरम) यांच्या वतीने शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी (भारतीय वेळेनुसार ३० ऑगस्टच्या मध्यरात्री) न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या भव्य कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, आपण सर्व एकात्मतेने जोडलेले आहोत आणि विविधतेमुळे ही एकात्मता अधिक सुंदर बनते. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न परंपरा आणि भिन्न जीवनपद्धती असूनही आपण सर्व एकमेकांचे आहोत. प्रत्येक राष्ट्राला एक नियती पूर्ण करायची असते. भारताची नियती म्हणजे विविधतेतील एकतेचे सत्य स्वतः अनुभवणे आणि वेळोवेळी जगालाही त्या सत्याची जाणीव करून देणे. आपण सर्व एक आहोत आणि विविधता ही त्या एकतेची शोभा आहे. त्यामुळे विविधतेचा उत्सव साजरा करणे, तिचा आदर करणे आणि तिचा स्वीकार करणे आवश्यक आहे. मात्र त्याचवेळी सर्वांच्या अस्तित्वातील एकत्वाची जाणीवही कायम ठेवली पाहिजे. (Dr. Mohan Bhagwat New York speech)
मानवी समाजातील दोन प्रवृत्तींचा उल्लेख करताना ते म्हणाले की, एक प्रवृत्ती 'जगा आणि जगू द्या' अशी आहे; तर दुसरी प्रवृत्ती 'आमचे म्हणणे मानणाऱ्यांनाच जगू द्या' अशी आहे. 'तुम्ही आमचे ऐका, आम्ही तुमचे रक्षण करू,' अशी भूमिका घेणारी वृत्ती ही राक्षसी आहे. याउलट, माणूस आमचे म्हणणे मानतो की नाही, आमच्याबद्दल काय विचार करतो किंवा आमच्यासाठी किती उपयुक्त आहे, यापेक्षा तो एक मानव आहे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मानवतेचे रक्षण करण्यासाठी आणि जीवन टिकवण्यासाठी बंधुभावाने जगणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
एकात्मतेची संकल्पना स्पष्ट करताना सरसंघचालक म्हणाले की, शरीर, भाषा, संस्कृती, वेशभूषा आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच चैतन्य आहे. म्हणूनच आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत. जे तत्त्व सर्वांना एकत्र जोडते , सर्वांचे अस्तित्व टिकवून ठेवते, संतुलन राखते, विभाजन टाळते आणि मध्यममार्गाचा पुरस्कार करते, त्यालाच धर्म म्हणतात.
पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आज आपण फादर्स डे, मदर्स डे यांसारखे दिवस साजरे करतो. कारण त्यातून आपल्याला आपल्या कर्तव्यांची आठवण होते. त्याचप्रमाणे पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदारीचीही जाणीव ठेवली पाहिजे. आपण जे अन्न खातो ते शेतीमुळे उपलब्ध होते. शेतकरी शेती करणे थांबवतील तर अन्न कुठून मिळणार? आपण वापरत असलेल्या वस्त्रांमागे शेतकरी, कामगार आणि उद्योगांचे योगदान असते. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट इतरांच्या परिश्रमांवर उभी आहे. त्यामुळे आपण जगाकडून जे काही घेतले आहे, ते जगाला परत देणे हे आपले कर्तव्य आहे अशी पुस्ती ही त्यांनी जोडली. (Dr. Mohan Bhagwat New York speech)
भारताच्या जागतिक ध्येयावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, मानवजन्माचा उद्देश केवळ स्वतःच्या उन्नतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हा आहे. भारताचे ध्येय हेच ज्ञान जगाला देणे आहे आणि जगाच्या कल्याणासाठी सर्वांपर्यंत पोहोचवणे आहे. जगभरातील भारतीयांनी हा संदेश उपदेशातून नव्हे, तर स्वतःच्या आचरणातून जगासमोर ठेवला पाहिजे. हीच भारताची नियती आहे.
परदेशातील भारतीयांना उद्देशून ते म्हणाले की, ज्या भूमीत आपण राहतो त्या कर्मभूमीप्रती पूर्ण निष्ठा राखणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्याचवेळी जन्मभूमीने दिलेल्या मूल्यांनुसार शाश्वत, संतुलित आणि जबाबदार जीवन जगणे, हीदेखील भारतीयांची जबाबदारी आहे. आपण सर्व एकात्मतेने जोडलेले आहोत आणि विविधतेने नटलेले आहोत. विविधता ही निसर्गाची देणगी आहे, तर एकता हे सत्य आहे. विविधतेचा उत्सव म्हणजे एकात्मतेच्या सौंदर्याचा उत्सव आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Dr. Mohan Bhagwat New York speech)
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. त्याचा उल्लेख करताना सरसंघचालक म्हणाले की, रक्षाबंधनाचा संदेश केवळ एका नात्यापुरता मर्यादित नाही, तर एकमेकांची जबाबदारी स्वीकारणे, परस्पर संरक्षणाचा संकल्प करणे हा आहे. दुसऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी स्वीकारल्यानेच व्यक्ती खऱ्या अर्थाने मुक्त होते.
यापूर्वी डॉ. मोहनजी भागवत यांनी जगभरातील २०० धर्मनेत्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी – कॉल फॉर अॅक्शन’ या ठरावाचे सादरीकरण केले. ३० देशांतील १८० धर्मनेत्यांनी भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याचा पाच सूत्री कृती आराखडा जाहीर केला. वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी – कॉल फॉर अॅक्शन' या ठरावाद्वारे कोणत्याही समाजावर अन्याय, अपमान किंवा हिंसेचा प्रसंग ओढवल्यास त्याच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उभे राहण्याचा निर्धार या ठरावातून व्यक्त करण्यात आला. (Dr. Mohan Bhagwat New York speech)
धर्माच्या नावाखाली द्वेष, हिंसा, अपमान किंवा अमानवी वर्तन यांना कोणतेही समर्थन देता येणार नाही, अशी ठाम भूमिका जागतिक धर्मनेत्यांनी यावेळी मांडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी एकमेकांना राखी बांधून मानवतेच्या बंधुभावाचा आणि एकात्मतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २५० संस्थांनी सहभाग नोंदविला. अमेरिकेतील ३९ राज्यांतील, ८५० शहरांतील तसेच २९ देशांतील सुमारे ६,००० प्रतिनिधींनी या भव्य ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’मध्ये सहभाग घेतला. (Dr. Mohan Bhagwat New York speech)
खलिस्तान समर्थकांची कार्यक्रमादरम्यान निदर्शने
खलिस्तान समर्थक कट्टरपंथीयांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे सरसंघचालकांच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने केली. शीख आंदोलकांनी कार्यक्रमस्थळाबाहेर तिरंग्याचा अपमान करत तो फाडला. यावेळी ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. तेथे उपस्थित भारतीय वंशाच्या लोकांनी खलिस्तान समर्थक आंदोलकांचा तीव्र विरोध केला आणि त्यांना पाकिस्तान व चीनचे एजंट असल्याचे म्हटले. भारतीय वंशाच्या लोकांनी जोहरान ममदानी यांच्या नेतृत्वाखालील न्यूयॉर्क शहर प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे, यावेळी पोलीस बंदोबस्त उपस्थित होता; मात्र भारतीय तिरंग्याचा कथित अपमान होत असताना पोलिसांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी आंदोलकांनी ज्यू समुदायाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये केल्याचेही सांगण्यात येत आहे.
हिंदू संघटनेने दिले निवेदन
शीख आंदोलकांच्या विरोधानंतर हिंदू अमेरिकन फाउंडेशनने सांगितले की, त्यांना अशा प्रकारच्या परिस्थितीची आधीपासूनच अपेक्षा होती. एक्सवरील एका पोस्टमध्ये संघटनेने म्हटले की, “न्यूयॉर्कमधील लोकांसाठी खलिस्तान्यांच्या धमक्यांपासून ते ज्यूंविरोधातील द्वेषपूर्ण चकमकींपर्यंत, मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेरील निदर्शने खरोखरच अत्यंत वाईट होती. आमच्या सुरक्षा इशाऱ्यांकडे लक्ष देण्यात आले आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, याचा आम्हाला आनंद आहे.” (Dr. Mohan Bhagwat New York speech)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक