मुंबई (अभिनंदन परुळेकर) : (child rights) “बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. या प्रयत्नांना कल्पकतेतून बळ देणाऱ्या या कलरिंग बुकच्या माध्यमातून बालकांना त्यांच्या हक्कांची माहिती सहज आणि आनंददायी पद्धतीने मिळणार आहे. रंग भरताना बालकांच्या मनावर त्यांच्या हक्कांची जाणीव रुजण्यास मदत होणार असल्याचा आनंद आहे. तसेच संविधान फेलोशिपच्या माध्यमातून कायदे आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे.” असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यावतीने बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी 'प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे १८ मूलभूत हक्क' हे बुक तयार करण्यात आले आहे. या कलरिंग बुकचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. (child rights)
बालकांच्या संविधानिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग सदैव कटिबद्ध आहे. या प्रयत्नांना आपल्या कल्पकतेतून बळ देत न्याया आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थांच्या वतीने कलरिंग बुक तयार करण्यात आली आहे. या कलरिंग बुकमध्ये रंग भरताना बालकांच्या… pic.twitter.com/Nt8kgECVfC
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डंगरे, माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, अनिशा गोपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने राज्यात संविधान फेलोशिपचाही शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान धारावी ड्रीम प्रोजेक्ट यांच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच बालकांच्या हक्कांवर तयार केलेल्या रॅप गीताचे लोकार्पण करण्यात आले. (child rights)
बालकांच्या हक्कांची माहिती त्यांना लहान वयापासूनच व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे कलरिंग बुक मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बुकमध्ये निवारा, पोषण, शिक्षण आणि मोफत कायदेशीर मदत यांसह बालकांच्या १८ महत्त्वपूर्ण हक्कांची माहिती देण्यात आली आहे. तसेच बालविवाह, बालमजुरी, रॅगिंग, बुलिंग आणि लैंगिक शोषण या विषयांचाही बालकांना समजेल अशा संवेदनशील पद्धतीने समावेश करण्यात आला आहे. (child rights)