भोटेकोशीचा महाप्रलय : निसर्गाचा कोप की मानवी चुकांचा हिशोब?

    30-Aug-2026
 
Bhotekoshi Flood Nepal
 
माणूस आज चंद्रावर पोहोचला असला, तरी पृथ्वीवरील निसर्गाच्या रौद्ररुपासमोर तो किती खुजा आहे, याची प्रचिती नेपाळमधील महाप्रलयाच्या महाविनाशकारी दृश्यांनी अवघ्या जगाला करुन दिली. आपल्या वाटेत जे जे येईल, ते ते सगळे गिळंकृत करीत, या महापुराने नेपाळमधील गावेच्या गावे अक्षरश: नकाशावरुन कायमस्वरुपी उद्ध्वस्त करुन टाकली. अजूनही मृतांचा आकडा वाढत असून, शोधमोहीम, मदतकार्याचा ओघ सुरुच आहे. यानिमित्ताने हिमालयातील हिमनग-हिमनद्यांच्या वितळण्याचा वाढता धोका, तिबेटमधील चीनचे महाकाय प्रकल्प आणि एकूणच या महाभयाण आपत्तीमागील कारणांचा आढावा घेणारा हा लेख...
 
बुधवार, दि. २६ ऑगस्टची ती सकाळ रसुवागढीच्या चिंचोळ्या दरीत नेहमीसारखीच उजाडली. रसुवागढी जलविद्युत प्रकल्पाच्या जागेवर कामगार आपल्या कामात गर्क होते. सीमेवरील कस्टम्स् यार्डात चिनी बनावटीचे मालाने भरलेले ट्रक नेपाळमध्ये सोडण्यासाठी अधिकारी प्रवेशद्वारे उघडत होते. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी निघालेले भाविक, तसेच लांगटांग खोर्‍यात ट्रेकिंगसाठी आलेले भारतीय, युरोपीय आणि अमेरिकन पर्यटक तिमुरे आणि स्याफ्रुबेसी येथील स्थानिक उपाहारगृहांमध्ये नाश्ता करत होते.
 
पण, सकाळी ८.३०च्या सुमारास अचानक एका गूढ, धडकी भरणार्‍या आवाजाने संपूर्ण दरी थरथरली. तो पाण्याचा खळखळाट नव्हता, तर पर्वत आतून फुटल्याचा आणि खडक एकमेकांवर घासल्याचा एक भयानक खोल आवाज होता. काही मिनिटांतच तिबेटच्या सीमेवरील ल्हेंदे-खोला नदीच्या पात्रातून एका काळ्या-राखाडी रंगाची महाकाय लाट खाली येताना दिसली. ती लाट पाण्याची नव्हती; तर बर्फ, बारीक झालेला ग्रॅनाईटसदृश खडक, माती आणि हजारो वर्षांचा गाळ एकत्र झालेला एक प्रवाह होता. या महाकाय लाटेने सीमा सुरक्षा चौकीवर थेट हल्ला चढवला. २०-२० टनांचे मालवाहू ट्रक प्लास्टिकच्या खेळण्यांसारखे कोलमडून वाहू लागले. नेपाळ आणि चीनला जोडणारा पक्का काँक्रीटचा ‘मितीरी मैत्री पूल’ एका क्षणात पायापासून उद्ध्वस्त होऊन वाहत्या चिखलात गायब झाला.
 
या भयानक संकटाची कोणतीही धोक्याची सूचना खालील गावांमध्ये मिळालेली नव्हती. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामान खात्याला सीमेपलीकडून तिबेटमधून कोणताही आपत्कालीन संदेश किंवा उपग्रहीय संदेश मिळाला नव्हता. रसुवा जिल्ह्यात आदल्या रात्री मुसळधार पाऊसही झाला नव्हता. त्यामुळे स्थानिक लोक पूर्णपणे बेसावध होते. हा पूर एका भयानक ताकदीच्या बुलडोझरसारखा आला. ही लाट स्याफ्रुबेसी ओलांडून त्रिशूली नदीच्या खोर्‍यात पोहोचली व अवघ्या ३० मिनिटांत नदीची पातळी तब्बल नऊ मीटरने (सुमारे ३० फूट) वाढली. पिढ्यान्पिढ्या वसलेली गावे, वीज उपकेंद्रे, शाळा आणि शेकडो स्वप्ने दि. २६ तारखेच्या सकाळी त्रिशूलीच्या काळवंडलेल्या पात्रात गाडली गेली.
 
घटनाक्रम आणि पुराचा मार्ग
 
हा महाप्रलय तिबेटी स्वायत्त क्षेत्रातील लांगटांग पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील मानवी वस्ती नसलेल्या अतिउंच भागात सुरू झाला. सकाळी ८.३७ वाजता दक्षिण आशियातील भूकंपमापन केंद्रांवर ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपासारख्या लहरी नोंदवल्या गेल्या. सुरुवातीला हा एक नेहमीचा भूगर्भीय भूकंप असावा, असा अंदाज बांधला गेला. परंतु, नंतर उपग्रहीय चित्रे आणि प्रगत तरंगांच्या विश्लेषणावरून एका भयानक सत्याचा उलगडा झाला. हा भूकंप नव्हता, तर तो ५.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा एक अतिमहाकाय हिम-खडक कोसळण्याचा आघात होता.
 
अंदाजे ५ हजार २०० मी. उंचीवर, एका उभ्या कातळाला शतकानुशतके घट्ट पकडून उभा असलेला हजारो टन्स्चा हिमखंड आणि ग्रॅनाईटचा खडक अचानक वेगळा झाला आणि खाली कोसळला. अंदाजे १ हजार मीटर खाली, ल्हेंदे-खोलाच्या अरुंद पात्रात जेव्हा हा अब्जावधी टनांचा साठा आदळला, तेव्हा त्या आघाताच्या प्रचंड ऊर्जेने आणि निर्माण झालेल्या घर्षणाने बर्फाचे रूपांतर क्षणात पाण्याच्या महापुरात झाले.
 
हा प्रवाह तिथेच थांबला नाही. अतिवेगाने खाली उतरत या पाण्याने दरीच्या तळाशी साचलेला दगड-धोंड्यांचा, मातीचा आणि हिमोढाचा प्रचंड साठा स्वतःमध्ये सामावून घेतला. ‘हिमोढ’ (इंग्रजीमध्ये Moraine- मोरेन) म्हणजे, हिमनदीने वाहून आणलेला गाळ व खडकाचे एक विशिष्ट घट्ट मिश्रण. ल्हेंदे नदीच्या पात्रात काही मिनिटांसाठी या ढिगार्‍यामुळे एक तात्पुरता नैसर्गिक बंधारा तयार झाला. पण, मागे साचलेल्या पाण्याच्या अथांग दाबामुळे तो बंधारा अवघ्या काही मिनिटांत फुटला आणि एक विनाशकारी लाट निर्माण झाली.
 
सकाळी ९ वाजता या लाटेने चिनी हद्दीतील जिरॉन्ग पोर्ट कस्टम्स यार्ड उद्ध्वस्त केले आणि नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रवेश केला. पुढील दोन तासांत या प्रलयाने तिमुरे, स्याफ्रुबेसीची बाजारपेठ, अनेक जलविद्युत प्रकल्पांची धरणे आणि खाली नुवाकोट व धाडिंग जिल्ह्यातील नदीकाठची गावे कवेत घेतली. नुवाकोटमध्ये त्रिशूली माध्यमिक शाळेचे क्रीडांगण आणि वर्गखोल्या चिखलाखाली कायमच्या हरवल्या. हा विनाशकारी प्रवाह पुढे दक्षिणेकडे सरकत चितवनचे मैदान ओलांडून भारताच्या बिहार सीमेपर्यंत जाऊन पोहोचला.
 
जीवितहानी आणि बेपत्ता नागरिकांची आकडेवारी
 
या भयंकर घटनेनंतर आता नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांची आपत्कालीन यंत्रणा एका प्रचंड मानवी दुर्घटनेचा सामना करत आहे. नेपाळचे ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ऑथोरिटी’(NDRRMA), नेपाळी पोलीस आणि तिबेटमधील आपत्कालीन विभागाच्या संयुक्त अहवालानुसार, हा आजवरचा सर्वांत मोठा हिमप्रलय ठरला आहे.
 
दोन्ही देशांत मिळून आतापर्यंत ५०० हून अधिक जणांच्या मृत्यूला अधिकृत पुष्टी मिळाली असून, त्रिशूलीच्या पात्रातून चितवनपर्यंत ३९०हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. परंतु, खरी शोकांतिका पुढे आहे. दोन्ही बाजूंचे मिळून १ हजार ४००हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. खुद्द नेपाळमध्येच ८२६हून अधिक लोक बेपत्ता असल्याची अधिकृत नोंद झाली आहे. यात ५७९ स्थानिक आणि परदेशी पर्यटक, नेपाळ सैन्याचे, सशस्त्र पोलीस दलाचे आणि नेपाळ पोलिसांचे ८५ जवान, विविध जलविद्युत प्रकल्पांचे ६० अभियंते व कामगार, २६ बँक कर्मचारी आणि १५ कस्टम अधिकारी यांचा समावेश आहे.
 
ही दुर्घटना कैलास-मानसरोवर यात्रेच्या ऐन हंगामात आणि ‘जनई पूर्णिमा’ (नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन) सणाच्या काळात घडल्याने त्याला आंतरराष्ट्रीय शोकांतिकेचे स्वरूप आले आहे. नेपाळमध्ये बेपत्ता असलेल्यांमध्ये ४६६ परदेशी नागरिक आहेत. यात किमान १७८ भारतीय नागरिक (ज्यात भाविक आणि कामगारांचा समावेश आहे), मलेशियाचे ५५, अमेरिकेचे ४७, ऑस्ट्रेलियाचे ३४, ब्रिटनचे ३३ आणि कॅनडाचे २४ नागरिक बेपत्ता आहेत. दुसरीकडे चिनी हद्दीतील जिरॉन्ग पोर्ट भागात तीनजणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, २६० परदेशी पर्यटकांसह ५५८ लोक चिखलाखाली बेपत्ता असल्याचे चिनी सरकारी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. २ हजार ५००हून अधिक लोकांना सुस्थळी हलवण्यात आले आहे.

दुर्घटनेची वैज्ञानिक आणि पर्यावरणात्मक कारणे
 
‘ग्रेटर हिमालय’ हा भाग जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने तापत आहे, याची नोंद आपल्याला अनेक शोधनिबंधात मिळते. या वाढत्या उष्णतेमुळे पर्वतांची अंतर्गत रचना ढासळत चालली आहे. हिमालयात ‘परमाफ्रॉस्ट’ (Permafrost - खडकांच्या भेगांमध्ये शतकानुशतके गोठलेला बर्फ) या पर्वतांना एकत्र बांधून ठेवणार्‍या सिमेंटसारखे काम करतो. परंतु, तापमानवाढीमुळे ज्या उंचीवर पाणी कायम गोठलेले राहते, ती उंची (Zero-Degree Isotherm) अधिकाधिक वर सरकत चालली आहे. यामुळे पर्वतांच्या पोटात साचलेला बर्फ वितळू लागला आहे. पाणी साचल्याने खडकांच्या भेगांमधील दाब वाढतो आणि हजारो टन वजनाचे खडक पर्वतापासून वेगळे होतात.
 
यालाच जोड मिळाली आहे ती हिमनद्या (Glaciers) झपाट्याने मागे सरकण्याची. गेल्या दोन दशकांत लांगटांग आणि जिरॉन्ग खोर्‍यातील हिमनद्यांचे आकारमान प्रचंड वेगाने कमी झाले आहे. हिमनद्या जेव्हा आकुंचन पावतात, तेव्हा त्यांनी पर्वताच्या पायथ्याला दिलेला नैसर्गिक बर्फाचा आधार निघून जातो, ज्यामुळे खडक उघडे पडतात आणि ढासळू लागतात.
 
दि. २६ ऑगस्टच्या या प्रवाहाचे भौतिक स्वरूपदेखील सामान्य पुरापेक्षा भयंकर होते. हा साध्या पाण्याचा पूर नव्हता, तर सुमारे २ ग्रॅम प्रतिघनसेंटीमीटर घनता असलेला घट्ट चिखल होता. अशा प्रवाहाला इतका प्रचंड वेग आणि वजन असते की, पाण्याचा सामान्य पूर सहज सहन करू शकणारे काँक्रीटचे मोठे पूल आणि बंधारे या चिखलाच्या लाटेसमोर पत्त्यांसारखे मोडून पडतात.
 
पायाभूत सुविधा आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान
 
निसर्गाने जरी या दुर्घटनेची ठिणगी टाकली असली, तरी माणसाने नदीपात्रात उभारलेल्या अमर्याद बांधकामांनी या विनाशाची तीव्रता अनेक पटींनी वाढवली. गेल्या दोन दशकांत भोटेकोशी आणि त्रिशूली नदीचे खोरे हे नेपाळचे सर्वांत मोठे ऊर्जा आणि व्यापार केंद्र बनले आहे. या अरुंद दरीमध्ये ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ (RoR) पद्धतीचे अनेक जलविद्युत प्रकल्प उभे केले आहेत. यात मोठे धरण न बांधता, नदीचे पाणी भुयारातून वळवून वीज निर्माण केली जाते. परंतु, या प्रकल्पांमध्ये पाणी अडवणारे बंधारे, गाळ उपसण्याच्या टाया आणि पॉवरहाऊस हे थेट नदीच्या सक्रिय पात्रातच बांधलेले असतात.
 
‘नेपाळ वीज प्राधिकरणा’च्या (NEA) अहवालानुसार, या एकाच लाटेने ७४८ मेगावॅट क्षमतेचे १४ जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त किंवा जलमय केले आहेत. यात ‘चिलिमे’, ‘संजेन-खोला’, ‘त्रिशूली’ आणि ‘देवीघाट’ हे चालू प्रकल्प आणि निर्माणाधीन असलेला ‘अपर त्रिशूली-१’ (२१६ मेगावॅट) प्रकल्प यांचा समावेश आहे. सीमेवर असलेल्या रसुवागढी (१११ मेगावॅट) प्रकल्पाचे मुख्य प्रवेशद्वार आणि पॉवरहाऊस अनेक मीटर गाळाखाली आणि दगडांखाली पूर्णपणे गाडले गेले आहेत.
 
त्याचप्रमाणे ‘पासांग ल्हामू’ महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. नेपाळला चीनशी जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा प्राथमिक व्यापारी रस्ता नदीच्या काठाकाठाने पर्वतांच्या अस्थिर उतारावरून बनवण्यात आला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी शेकडो टन माती आणि खडक थेट नदीपात्रात फेकले गेले आहेत. या सुट्ट्या माती आणि खडकाच्या साठ्याने प्रलयाच्या पाण्याला अधिक गाळ आणि दगड पुरवले असू शकतात, ज्यामुळे पुराचे विनाशकारी परिणाम दुप्पट झाले, असे काही अहवालांत नमूद केले आहे. सध्या बेत्रावती ते रसुवागढीदरम्यानचा ४२ किमी रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.
 
तिबेटमधील चीनचे महाकाय प्रकल्प आणि माहिती देवाणघेवाणीचा प्रश्न
 
दुर्घटना घडल्यानंतर लागलीच सोशल मीडियावर आणि प्रादेशिक वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. चीनने तिबेटमधील आपले एखादे मोठे धरण अचानक उघडल्यामुळे किंवा धरण फुटल्यामुळे नेपाळमध्ये हा पूर आला, असा दावा काही गटांमधून केला गेला. परंतु, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंट’ (ICIMOD) सारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी आणि उपग्रहीय उपकरणांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. ल्हेंदे-खोलाच्या तिबेटी भागात कोणतेही महाकाय पाण्याचे धरण अस्तित्वात नाही. या दुर्घटनेची सुरुवात पूर्णपणे नैसर्गिकरीत्या उच्च हिमालयातील पर्वतकडा आणि बर्फ कोसळल्यानेच झाली होती.
 
मात्र, याचा अर्थ चिनी बांधकामांवर प्रश्न उपस्थित करता येत नाहीत, असे नाही. चीनने ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ (BRI) उपक्रमांतर्गत ‘जिरॉन्ग पोर्ट’च्या रक्षणासाठी ग्यिरॉन्ग झांगबो नदीच्या पात्रात विस्तीर्ण काँक्रीटच्या भिंती आणि ‘चॅनेलायझेशन’ (पात्राचे संकुचितीकरण) केले आहे. भौतिकशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही नदीचे नैसर्गिक रुंद पात्र काँक्रीटच्या भिंती बांधून अति-अरुंद करता, तेव्हा पाण्याचा साचणारा भाग कमी होतो आणि त्याचा वेग अत्यंत प्रचंड होतो. चीनने ही काँक्रीटची भिंत चीनची महागडी कस्टम्स् केंद्रे, ड्राय पोर्ट्स (बंदरे) आणि त्यांच्या रस्त्यांचे रक्षण करण्यासाठी उभारली आहे. पण, त्यांनी इतरांचा बहुधा विचार केला नाही. हिमनदी फुटून चिखल आला, तेव्हा या काँक्रीटच्या पात्राने त्या चिखलाला थांबवण्याऐवजी त्याचा वेग वाढून अतिप्रचंड वेगाने थेट नेपाळच्या हद्दीत ढकलून दिले. निसर्गात नदीचे विस्तीर्ण नैसर्गिक पात्र हे पूर रोखण्यासाठी किंवा त्याचा वेग कमी करण्यासाठी काम करते. ते इथे घडले नाही.
 
दुसरा सर्वांत महत्त्वाचा भू-राजकीय मुद्दा म्हणजे, माहितीची देवाणघेवाण न होणे. २०२५ मध्ये झालेल्या अशाच एका दुर्घटनेनंतर चीन आणि नेपाळमध्ये रिअल-टाईम माहिती देण्याचे करार झाले होते. परंतु, दि. २६ ऑगस्टच्या सकाळी तिबेटमध्ये डोंगर कोसळल्यापासून ते नेपाळमध्ये लाट येण्यापर्यंतच्या मोलाच्या ४५ मिनिटांत नेपाळच्या जलविज्ञान विभागाला चीनकडून एकही आपत्कालीन फोन किंवा डिजिटल संदेश आला नाही. माहितीच्या या अभावामुळे शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याची संधीच मिळाली नाही.

धोका टळला का? अनुषंगिक आपत्ती आणि प्रशासकीय दक्षता
 
दि. २६ ऑगस्टच्या प्रलयाची कथा बहुधा इथे संपली नसून, पुढे अधिक मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिबेटमधील दुर्घटनाग्रस्त भागाच्या सॅटेलाईट रडार (SAR) मॅपिंगने दोन अत्यंत धोकादायक बाबी उघड केल्या आहेत.
 
पहिली बाब म्हणजे, उच्च हिमालयातील जो डोंगर कोसळला, त्याचा उरलेला भाग अजूनही अत्यंत कमकुवत स्थितीत आहे. मूळ खडक निघून गेल्यामुळे त्याच्या शेजारील हजारो टन वजनाचे खडक आणि हिमनद्या (Hanging Glaciers) आता अस्थिर स्थितीत आहेत. येत्या काही दिवसांत तीव्र ऊन पडल्यास, छोटा भूकंप झाल्यास किंवा पाऊस आल्यास दुसरा हिमखडक कोसळण्याचा स्पष्ट धोका निर्माण झाला आहे.
 
दुसरी आणि सर्वांत तातडीची भीती म्हणजे, ‘नैसर्गिक चिखलाचे बंधारे’ (Landslide Debris Dams). डोंगर कोसळताना आलेल्या अब्जावधी टन ढिगार्‍याने तिबेटमधील सोग्याल (Tsogyal) आणि पुरुपछियांगझांगबू (Purupqiangzangbu) या उपनद्यांच्या संगमावर सुमारे ५० ते ६० मी. उंच चिखल आणि दगडांची भिंत तयार केली आहे. मागे हिमनद्यांचे वितळणारे पाणी साचून एका प्रचंड तलावाची निर्मिती इथे झाली आहे. या नैसर्गिक बंधार्‍याला कोणतेही दरवाजे नाहीत. हा फक्त दगडांचा आणि बर्फाचा बनलेला ढीग आहे. मागे साचलेल्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हा कच्चा बंधारा कधीही फुटू शकतो. जर हा साचलेला तलाव फुटला (Landslide Dam Outburst Flood - LDOF), तर दि. २६ ऑगस्टपेक्षाही अधिक भयानक लाट पुन्हा एकदा भोटेकोशी आणि त्रिशूली पात्रातून धावेल, यात संशय नाही. या धोयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळसह उत्तर भारतातील बिहार प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारत-नेपाळ सीमेवरील वाल्मीकीनगर बॅरेजचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. इथे पाण्याचा विसर्ग तब्बल २ लाख ५० हजार युसेसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. त्रिशूली काठावरील हजारो नागरिकांना उंच-सखल भागांत हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
 
न शिकलेल्या धड्यांची पुनरावृत्ती...
 
दि. २६ ऑगस्टचा हा प्रलय म्हणजे, हिमालयाने दिलेला पहिला इशारा नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये एव्हरेस्टजवळील नेपाळमधील थामे गाव अशाच एका हिमनदीचा तलाव फुटल्याने नकाशावरून पुसले गेले होते. जुलै २०२५ मध्ये तिबेटमधील प्युरेपू ग्लेशियरवरील सुपरग्लेशियल तलाव फुटल्यामुळे याच भोटेकोशी कॉरिडोरमध्ये एक विनाशकारी लाट आली होती. या पुरामुळे मितेरीचा आधीचा पूल पूर्णपणे वाहून गेला आणि अनेक महिन्यांसाठी सीमावर्ती व्यापार ठप्प झाला होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
 
प्रत्येक दुर्घटनेनंतर काही दिवस राजकीय पातळीवर चर्चा होतात, तज्ज्ञांच्या समित्या स्थापन होतात आणि निसर्गरक्षणाचे संकल्प केले जातात. परंतु, काही महिन्यांतच पुनर्रचनेच्या नावाने सर्वकाही पूर्ववत सुरू होते. रस्ते बांधणारे अधिकारी पुन्हा त्याच खचणार्‍या नदीकाठून रस्ते उकरतात. वीज कंपन्या पुन्हा त्याच धोकादायक पात्रात अब्जावधींचे सिमेंटचे प्रकल्प उभारतात. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करून हिमालयाकडे केवळ एक रिअल इस्टेट आणि ऊर्जानिर्मितीचे साधन म्हणून पाहिले गेले, तर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टळणे कठीण आहे.
 
मदतकार्य आणि बचाव मोहिमेची सद्यस्थिती
 
- अजूनही रसुवा आणि नुवाकोटच्या उद्ध्वस्त झालेल्या पात्रात बचावकार्य सुरू आहे. नेपाळ सैन्य, पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक पायाने गाळ तुडवत, हातात फावडे घेऊन वाळलेल्या चिखलातून मानवी अवशेष आणि मृतदेह शोधत आहेत.
 
- स्याफ्रुबेसीच्या एका उंच कातळावर बसून स्थानिक नागरिक खाली वाहणार्‍या काळवंडलेल्या पात्राकडे पाहत आहेत. अनेक कुटुंबांची घरे, दुकाने आणि शेतजमिनी काही तासांत या गाळाखाली विलुप्त झाल्या. पर्वतावर चढून जीव वाचवलेले भाविक आणि पर्यटक अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत.हिमालयाने हजारो वर्षे दक्षिण आशियाला जीवन दिले आहे. तो नद्यांचा उगम आहे आणि संस्कृतींचा पाठीराखा आहे. परंतु, मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि हवामानबदलामुळे ही पर्वतरांग संवेदनशील बनली आहे.
 
- भोटेकोशीच्या काठावर तुटलेले पूल पुन्हा बांधले जातील, रस्ते पुन्हा तयार होतील आणि वीजप्रकल्पही उभे राहतील. परंतु, ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या नुकसानाची भरपाई शय नाही. सीमेच्या दोन्ही बाजूंच्या देशांनी हिमालयाला केवळ व्यापारी आणि ऊर्जेचे माध्यम न मानता, एक संवेदनशील परिसंस्था म्हणून जपण्याची आणि रिअल-टाईम माहितीची देवाणघेवाण करण्याची नितांत गरज आहे.
 
- डॉ. मयूरेश जोशी
 




संबंधित मजकूर