होयसळांचे विस्मृतीत गेलेले रत्न - बेलवडी

    30-Aug-2026
 
Belwadi Veeranarayana Temple
 
कर्नाटकातील होयसळ स्थापत्य म्हटले की, बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराचे सौंदर्य, हळेबीडूमधल्या होयसळेश्वराची अफाट शिल्पसंपदा आणि सोमनाथपूरच्या केशव मंदिराची भूमितीय परिपूर्णता आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. या मंदिरांच्या प्रसिद्धीमुळे होयसळ साम्राज्याने घडवलेल्या इतर अनेक अप्रतिम वास्तू मात्र काहीशा दुर्लक्षित राहिल्या. हळेबीडूपासून अवघ्या काही अंतरावर चिक्कमगळूर जिल्ह्यातील बेलवडी या छोट्याशा गावात उभे असलेले वीरनारायण मंदिर हे असेच एक विस्मृतीत गेलेले रत्न. येथे बेलूरसारखी पर्यटकांची गर्दी नाही किंवा हळेबीडूसारख्या शिल्पांच्या अंतहीन रांगा नाहीत; पण मंदिराच्या प्रशस्त मंडपात प्रवेश केल्यावर होयसळ वास्तुविशारदांनी दगडाबरोबरच ‘अवकाशालाही’ कसे घडवले होते, याची विलक्षण अनुभूती येते.
 
बेलवडीशी एक सुंदर लोकपरंपराही जोडलेली आहे. या गावाला महाभारतातील एकचक्रनगर मानले जाते. पांडव लाक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर काही काळ येथे राहिले आणि गावकर्‍यांना त्रास देणार्‍या बकासुराचा भीमाने वध केला, अशी स्थानिक श्रद्धा आहे. अर्थात, आजच्या बेलवडीची ‘महाभारता’तील एकचक्रनगराशी ऐतिहासिक ओळख सिद्ध करणारा ठोस पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या कथेकडे इतिहास म्हणून नव्हे, तर या भूमीने शतकानुशतके जपलेल्या सांस्कृतिक स्मृतीच्या रूपात पाहणे अधिक योग्य ठरेल.
 
बेलवडीच्या मंदिराचा निश्चित इतिहास आपल्याला घेऊन जातो, तो बाराव्या-तेराव्या शतकातील बलाढ्य होयसळ साम्राज्याकडे. कर्नाटकाच्या राजकीय इतिहासात होयसळांनी केवळ आपले साम्राज्य विस्तारले नाही, तर दगडाला एक स्वतंत्र स्थापत्यभाषा दिली. पश्चिमी चालुयांच्या स्थापत्य परंपरेतून अनेक घटक स्वीकारून होयसळ शिल्पकारांनी त्यांना स्वतःच्या सौंदर्यदृष्टीतून नव्याने घडवले. बहुप्रक्षेपी आणि तारकाकृती आराखडे, साबणाच्या दगडाचा विलक्षण वापर, ‘लेथ’वर फिरवल्यासारखे गुळगुळीत स्तंभ, अनेक स्तरांत विभागलेल्या बाह्य भिंती आणि देव-देवता, नर्तिका, पशुपक्षी, पुराणकथा यांचे सूक्ष्म शिल्पांकन ही त्यांची स्वतंत्र ओळख बनली.
 
याच होयसळ सामर्थ्याच्या उत्कर्षकाळात राजा वीर बल्लाळ द्वितीय यांच्या कारकिर्दीत, साधारण इ.स. १२००च्या आसपास बेलवडीच्या वीरनारायण मंदिराचा पहिला टप्पा उभारला गेला. विशेष म्हणजे आज आपण पाहतो, ते मंदिर एकाच वेळी उभारले गेलेले नाही. सुरुवातीला येथे एककूट, म्हणजे एका गर्भगृहाचे मंदिर होते. त्यामध्ये वीरनारायणाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पुढील काही वर्षांत मंदिराचा विस्तार झाला; विशाल मंडप आणि आणखी दोन स्वतंत्र गर्भगृहे जोडण्यात आली. अशाप्रकारे एका साध्या एककूट मंदिराचे रूपांतर एका विलक्षण त्रिकूट मंदिरात झाले आणि बेलवडीचे खरे स्थापत्यवैभव याच विस्तारात दडलेले आहे.
 
सामान्यतः त्रिकूट मंदिर म्हटले की, मध्यभागी मंडप आणि त्याच्या तीन दिशांना जवळजवळ सममितीने उभारलेली तीन गर्भगृहे आपल्या डोळ्यांसमोर येतात. बेलवडीमध्ये मात्र वास्तुविशारदाने वेगळाच प्रयोग केला. मूळ वीरनारायण मंदिराशी एक प्रशस्त मंडप जोडण्यात आला आणि त्याच्या दोन बाजूंना परस्परांसमोर आणखी दोन देवालये उभारण्यात आली. त्यामुळे मंदिरातून चालताना एकामागोमाग एक बंदिस्त दालने अनुभवण्याऐवजी अचानक एक विशाल अवकाश आपल्यासमोर उघडतो.
 
या विस्तीर्ण रंगमंडपातील स्तंभ म्हणजे, होयसळ कारागिरीची स्वतंत्र कहाणी आहेत. घंटाकृती, अत्यंत गुळगुळीत आणि जणू एखाद्या यंत्रावर फिरवून तयार केलेले 'lathe-turned pillars' प्रकाशाच्या बदलत्या दिशेनुसार वेगवेगळे भासतात. काही स्तंभ तारकाकृती, काही चौकोनी, तर काही विलक्षण प्रमाणबद्ध आहेत. मंडपातील विविध चौकांच्या वितानावर (छतांवर) कमलपुष्पे, भूमितीय आकृती आणि अलंकारिक रचना दिसतात. त्यामुळे येथे नजर सतत भिंतींवरून स्तंभांकडे, स्तंभांवरून वितानाकडे आणि पुन्हा समोर उघडणार्‍या अवकाशाकडे फिरत राहते.
 
बेलूर आणि हळेबीडूमध्ये मंदिराचा बाह्यभाग इतका शिल्पसमृद्ध आहे की, प्रत्येक पावलावर थांबावेसे वाटते. बेलवडी मात्र वेगळी आहे. मंदिराच्या मूळ वीरनारायण भागाच्या बाह्य भिंती तुलनेने संयत आहेत. नंतर जोडलेल्या उत्तर आणि दक्षिण देवालयांवर होयसळ शैलीतील देवप्रतिमा आणि अलंकरण अधिक स्पष्ट दिसते. म्हणजे, एका वास्तूतच आपल्याला होयसळ स्थापत्याच्या दोन वेगवेगळ्या सौंदर्यदृष्टी अनुभवायला मिळतात- एक साधी, संयत आणि वास्तुरचनेवर भर देणारी; दुसरी अधिक शिल्पसमृद्ध आणि अलंकारप्रिय.
 
पण, या मंदिराचा सर्वांत सुंदर अनुभव त्याच्या तीन गर्भगृहांत दडलेला आहे. येथे एकाच विष्णूची तीन वेगवेगळी रूपे आपल्या समोर येतात- वीरनारायण, वेणुगोपाल आणि योगनरसिंह.
 
मूळ गर्भगृहातील वीरनारायणाची जवळपास सहा फूट उंच प्रतिमा अत्यंत प्रभावी आहे. कमलपीठावर उभा असलेला, चार हातांत आयुधे धारण केलेला आणि अलंकारांनी सजलेला विष्णू येथे स्थिर, राजस आणि विश्वाचा पालक म्हणून समोर येतो. मूर्तीचे प्रमाण, अलंकारांची सूक्ष्मता आणि काळ्या दगडाचा गुळगुळीत पोत यामुळे गर्भगृहाच्या अंधुक प्रकाशात प्रतिमा अधिकच प्रभावी वाटते.
दुसर्‍या गर्भगृहात प्रवेश केला की, हेच विष्णुतत्त्व अचानक बदलते. येथे आहे वेणुगोपाल- बासरी वाजवणारा कृष्ण. सुमारे पाच ते सहा फूट उंच असलेली ही प्रतिमा होयसळ शिल्पकलेतील अत्यंत सुंदर मूर्तींपैकी एक मानली जाते. शरीराचा नाजूक त्रिभंग, हातात धरलेली बासरी, अलंकारांची सूक्ष्मता आणि चेहर्‍यावरील प्रसन्न भाव पाहताना दगडामध्ये संगीत पकडण्याचा शिल्पकाराचा प्रयत्न जाणवतो. वीरनारायणाच्या राजस स्थैर्यानंतर येथे देव माधुर्य, प्रेम आणि आनंद बनून समोर येतो.
 
आणि मग तिसर्‍या गर्भगृहात भेटतो योगनरसिंह. नरसिंह म्हटले की, हिरण्यकश्यपूचा वध करणारे उग्र रूप आठवते. पण, बेलवडीचा नरसिंह वेगळा आहे. येथे ती प्रचंड शक्ती बाहेर उसळत नाही; ती अंतर्मुख झाली आहे. योगमुद्रेत बसलेला नरसिंह जणू सांगतो- खरे सामर्थ्य केवळ शत्रूचा संहार करण्यात नसते; स्वतःच्या अंतर्गत शक्तीवर नियंत्रण मिळवण्यातही असते.
 
यामुळे बेलवडीचे त्रिकूट केवळ तीन देवतांचे मंदिर राहत नाही. एकाच विष्णुतत्त्वाच्या तीन भावावस्था येथे एकमेकांसमोर उभ्या राहतात-वीरनारायणामध्ये संरक्षण आणि स्थैर्य, वेणुगोपालामध्ये प्रेम आणि माधुर्य, तर योगनरसिंहामध्ये सामर्थ्य आणि आत्मसंयम. स्थापत्याने या तीनही रूपांना एका विशाल अवकाशात जोडले आहे.
 
कदाचित, बेलवडीचे सर्वांत मोठे सौंदर्य याच ठिकाणी आहे. येथे वास्तुविशारदाने शिल्पाला स्थापत्यावर राज्य करू दिले नाही आणि स्थापत्यालाही देवप्रतिमेवर हावी होऊ दिले नाही. दगड, प्रकाश, स्तंभ, रिकामा अवकाश आणि देवता-सगळे एकमेकांना पूरक ठरतात.
 
आज हळेबीडूला येणार्‍या हजारो पर्यटकांपैकी फार थोडे जण काही अंतर पुढे जाऊन बेलवडीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे ८०० वर्षांपूर्वी उभारलेले हे मंदिर अजूनही तुलनेने शांतपणे उभे आहे. पण, कधी होयसळ स्थापत्य अनुभवण्यासाठी कर्नाटकात गेलात, तर बेलूर आणि हळेबीडू पाहून प्रवास संपवू नका. बेलवडीच्या वीरनारायण मंदिरात काही वेळ शांतपणे बसा. त्या गुळगुळीत स्तंभांवरून हात फिरवू नका- फक्त त्यांच्यावर पडणारा प्रकाश पाहा. एका गर्भगृहातून दुसर्‍यात जाताना विष्णूची बदलणारी भावमुद्रा अनुभवा आणि विशाल मंडपाच्या मध्यभागी काही क्षण थांबा!
 
बेलूरमध्ये शिल्प आपल्याला थांबवते, हळेबीडूमध्ये दगडात कोरलेल्या कथा आपल्याला गुंतवून ठेवतात; पण बेलवडीमध्ये अवकाश आपल्याशी बोलू लागते आणि कदाचित म्हणूनच, हे शांत मंदिर होयसळांचे विस्मृतीत गेलेले रत्न नसून, त्यांच्या स्थापत्य प्रतिभेचे सर्वांत सुंदर गुपित आहे.
 
इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४




संबंधित मजकूर