ठाणे (Thane Mayor Varsha Marathon) : ‘धाव प्रगतीची… गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्यासह झालेल्या ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष खुल्या गटात कोल्हापूरचा प्रविण कांबळे, तर महिला गटात नाशिकची रविना गायकवाड यांनी बाजी मारली. तब्बल ३० हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतल्याने ठाण्याच्या रस्त्यांवर पहाटे धावण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सहा वर्षांनंतर लोकप्रतिनिधी विराजमान झाल्यानंतर होणाऱ्या या ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मॅरेथॉनचा प्रारंभ करून दिल्यानंतर शिंदे यांनी स्वतःही धावपटूंसोबत काही अंतर धावत सहभाग घेतला आणि त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर आणि रवींद्र फाटक यांच्यासह महापौर शर्मिला पिंपळोलकर,उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह प्रामुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
#WATCH | Thane, Maharashtra: DY Chief Minister Eknath Shinde flags off the 32nd 'Thane Mayor Varsha Marathon Competition 2026'.
२१ किलोमीटरची मुख्य शर्यत १ तास ७ मिनिटे २१ सेकंदांत पूर्ण करत प्रविण कांबळे याने पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. पुण्याचा राजन विक्रमजीत यादव दुसरा, तर नाशिकचा कालिदास हिरवे तिसरा ठरला. महिला गटात रविना गायकवाड यांनी १ तास २६ मिनिटे ४ सेकंदांत शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. तेजस्विनी नरेंद्र लामकाने दुसऱ्या, तर पुण्याची साक्षी कसबे तिसऱ्या क्रमांकावर राहिली. (Thane Mayor Varsha Marathon)
शिंदेंकडून ऑलिम्पिकचे लक्ष्य
मॅरेथॉनच्या निमित्ताने बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे बदलत असून या बदलत्या ठाण्याबरोबर तरुणाईलाही नवी ऊर्जा देण्याचे काम मॅरेथॉन करत असल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला ३२ वर्षांची परंपरा असून, या स्पर्धेच्या सुरुवातीपासून पुढाकार घेणारे स्वर्गीय माजी खासदार सतीश प्रधान यांची यावेळी शिंदे यांनी आवर्जून आठवण काढली. मॅरेथॉनचा ३२ वर्षांचा इतिहास जतन करण्याची सूचनाही त्यांनी केली. (Thane Mayor Varsha Marathon)
१४ गटांत स्पर्धा; ११ लाखांची पारितोषिके
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत १४ विविध गटांत धावपटूंनी सहभाग घेतला. विजेत्यांना एकूण ११ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. २१ किलोमीटरच्या मुख्य शर्यतीतील विजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. (Thane Mayor Varsha Marathon)
याशिवाय १० किलोमीटर, ५ किलोमीटर, ३ किलोमीटर तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ठाणे महापालिका कर्मचारी आणि कॉर्पोरेट रन अशा विविध गटांतही स्पर्धा घेण्यात आली. दिव्यांगांनीही मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग नोंदवत उपस्थितांची दाद मिळवली.
मॅरेथॉननिमित्त जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, तसेच विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिनेकलाकारांनीही एक किलोमीटरच्या रनमध्ये सहभागी होत धावपटूंचा उत्साह वाढवला. (Thane Mayor Varsha Marathon)