शेवटचे अपडेट... आणि संपर्क तुटला; कैलास यात्रेच्या वाटेवरच संकट!

चिनी कस्टम्सजवळ शेवटचा ठावठिकाणा; कल्याणच्या पाटील दाम्पत्यासह सोबतच्या ३१ जणांशी अद्याप संपर्क नाही; कुटुंबीयांची चिंता वाढली

    30-Aug-2026
 
 Nepal Tibet flood
 
ठाणे (Nepal Tibet flood) : काठमांडू विमानतळावर पोहोचल्याचे फोटो... हॉटेलमध्ये मुक्काम... पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन... शेषशाही विष्णूच्या मंदिरातील आनंदाचे क्षण... प्रवासातील प्रत्येक अपडेट कुटुंबीयांपर्यंत पोहोचत होत्या. मात्र कैलास-मानसरोवरच्या दिशेने पुढे जात असतानाच अचानक संपर्क तुटला. कल्याणचे सायकलपटू संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी नलिनी पाटील यांच्यासह मुंबईतील ३१ जणांच्या ग्रुपबाबत अद्याप ठोस माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
 
संजय आणि नलिनी पाटील हे हिल्स अँड ट्रेल्सच्या ग्रुपसोबत कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. २३ ऑगस्टला काठमांडूला पोहोचल्यानंतर त्यांनी विमानतळावरून हॉटेल शंकर गाठले. काही सामान हॉटेलच्या लॉकरमध्ये ठेवून त्यांनी विश्रांती घेतली. दि. २४ ऑगस्टला ग्रुपने पशुपतिनाथ मंदिर तसेच शेषशाही विष्णूच्या मंदिराला भेट दिली. या वेळी काढलेले फोटो आणि प्रवासाच्या अपडेट कुटुंबीयांना मिळत होत्या. (Nepal Tibet flood)
 
यानंतर २५ ऑगस्टला बसने तब्बल आठ ते नऊ तासांचा प्रवास करून हा ग्रुप तिमुरे गावात पोहोचला. पुढे चिनी सीमेवरील केरुंगमार्गे तिबेटमध्ये प्रवेश करून सागा आणि त्यानंतर कैलास-मानसरोवर असा सुमारे १५ दिवसांचा प्रवास नियोजित होता. (Nepal Tibet flood)
  
चिनी कस्टम्सजवळ पोहोचले आणि संकट कोसळले
 
तिमुरेहून पुढे जाताना हा ग्रुप रिसुवागढी इथलंया चीनी कस्टम्स आणि इमिग्रेशन परिसरापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. याच भागाच्या आसपास मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह निर्माण झाला. ग्लेशियरमधून आलेल्या पाण्यामुळे नदी-नाल्यांना अचानक पूर आला आणि रस्ते व संपर्कमार्ग मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले.त्यांच्या सोबत असणाऱ्या स्टाफकडून दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ०८:२५ मिनिटांनी शेवटचे अपडेट मिळाले आणि त्यानंतर लगेचच ०८:३० च्या आसपास प्रचंड पाण्याचा प्रवाह या ठिकाणे आल्याचे समजले त्यानंतर संपर्क अचानक खंडित झाला. पुढे नेमके काय घडले, ग्रुप कुठे आहे आणि सर्वजण सुरक्षित आहेत का, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत आणि ठोस माहिती उपलब्ध नाही. (Nepal Tibet flood)
 
शेवटचे फोटो आणि अपडेटच आता आधार
 
संजय-नलिनी पाटील यांच्यासह प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांकडे सध्या उपलब्ध असलेले मंदिरदर्शनाचे फोटो, तिमुरेतील मुक्काम आणि शेवटच्या प्रवासाच्या अपडेट याच त्यांच्या शेवटच्या खुणा ठरत आहेत. त्यानंतर संपर्क बंद झाल्याने प्रत्येक क्षण कुटुंबीयांसाठी अस्वस्थ करणारा ठरत आहे.
 
दरम्यान, या यात्रेकरूंचे सामान काठमांडूतील हॉटेल शंकरमध्येच ठेवण्यात आले आहे. विविध ग्रुपमधील यात्रेकरू आणि स्टाफ मिळून त्यांच्या सोबत सुमारे ६० ते ६१ जणांचा समूह या प्रवासात असल्याची माहिती आहे. (Nepal Tibet flood)

बचाव पथकांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा
 
चिनी आणि भारतीय बचाव यंत्रणांकडून बाधित भागात मदतकार्य सुरू असल्याची माहिती असली तरी, संजय पाटील, नलिनी पाटील आणि इतर यात्रेकरूंबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. रस्ते पूर्णपणे वाहून गेल्याने बचाव पथकांनाही पुढे जाण्यात अडचणी येत आहेत.
 
दरम्यान पाटील दाम्पत्य सह ठाणे जिल्ह्यातील एकूण १० जण नेपाळ मधील महापुरात बेपत्ता असून अद्याप कोणाशीही संपर्क झालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Nepal Tibet flood)
 
 




संबंधित मजकूर