समुद्री व्यापाराचे अनामिक शिलेदार!

    30-Aug-2026   
 
Indian Merchant Navy
 
देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणारे नौदल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असते. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यात ज्यांचा वाटा सिंहाचा आहे, असे व्यापारी नौदलाबाबत मात्र आपली माहिती बहुदा त्रोटक असते. अलीकडच्या युद्ध काळात अनेक भारतीय अधिकारी व्यापारी जहाजांवर लक्ष्य झाले, काहींना समुद्री चाचेगिरीचा फटका बसला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नौदलासमोरील आव्हाने आणि त्यांच्या योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...
 
समुद्री चाचेगिरीचे पुनरागमन : ऑगस्ट महिन्यात दोन व्यापारी जहाजे चाच्यांनी ताब्यात घेतली. त्यात एकूण २२ भारतीय कर्मचारी होते. ‘एमटी सिबू-१’ या जहाजावर १६ भारतीय कर्मचारी होते, तर ‘एमव्ही लुतूफ’ या जहाजावर सहा भारतीय. सुदैवाने त्यावेळी सर्व कर्मचारी सुरक्षित होते. एकेकाळी कमी झालेली सोमालियन समुद्री चाचेगिरी, आता पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे एडनच्या आखातात आणि आफ्रिकेच्या शिंगाजवळ, भारतीय नाविकांना ओलीस धरल्याच्या घटनाही वाढत आहेत. जुलै २०२६ पर्यंत किमान १६ भारतीय नाविकांना चाच्यांनी ओलीस ठेवले होते. चाच्यांच्या ताब्यातल्या नाविकांना, अनेक संकटांचा सामना करावा लगतो. त्यांना शारीरिक अत्याचार, दीर्घकाळ कैद, औषधांची कमतरता, मानसिक ताण आणि कुटुंबापासून दूर राहण्याचा त्रास सहन करावा लागतो.
 
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलताना आपण सहसा सैन्य, नौदल, वायुदल किंवा सीमा सुरक्षा दलांचा उल्लेख करतो. मात्र, एक असे मोठे क्षेत्र आहे, जे कोणत्याही शस्त्राशिवाय, कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि अनेकदा जीव धोयात घालून देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र अखंडपणे चालू ठेवते. ते म्हणजे भारतीय व्यापारी नौदलातील अधिकारी, अभियंते, खलाशी आणि विविध तांत्रिक कर्मचारी. जगभरातील समुद्रीमार्गांवर काम करणारे हे भारतीय नाविक देशाच्या ऊर्जासुरक्षेचे, पुरवठा साखळीचे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे खरे रक्षक आहेत. आज भारत जगातील सुमारे १२ टक्क्यांहून अधिक सागरी मनुष्यबळ पुरवतो. फिलीपिन्सनंतर भारताचा क्रमांक दुसरा येतो. भारतीय अधिकारी आणि अभियंते त्यांच्या कौशल्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. जगातील हजारो व्यापारी जहाजांवर ते कार्यरत असून, भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभही आहेत.

अदृश्य; पण अत्यंत महत्त्वाची जबाबदारी: भारतीय व्यापारी जहाज कर्मचारी काळा समुद्र, पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी, लाल समुद्र, एडनचे आखात आणि हिंदी महासागरातील धोकादायक समुद्रीमार्गांवर कार्यरत असतात. या मार्गांद्वारे भारताला आवश्यक असे खनिज तेल, नैसर्गिक वायू, खत, अन्नधान्य, औद्योगिक कच्चा माल आणि निर्यात मालाची वाहतूक होते. यात व्यत्यय आल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
 
सामान्यतः या कर्मचार्‍यांना खलाशी म्हटले जाते; परंतु ते अत्यंत प्रशिक्षित व्यावसायिक असतात. त्यात कॅप्टन, डेक ऑफिसर, मरीन इंजिनिअर, रेडिओ अधिकारी आणि इतर तज्ज्ञांचाही समावेश असतो. त्यांची जहाजे व्यापारासाठी तयार केलेली असतात. त्यामुळेच शत्रूच्या हल्ल्यांपासून स्वसंरक्षणास ती सक्षम नसतात.
 
युद्धाच्या सावटाखालील भारतीय नाविक : गेल्या काही वर्षांत जागतिक संघर्षांमुळे, भारतीय नाविकांवरील धोका वाढला आहे. मध्य-पूर्वेतील संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि सोमालियाजवळची वाढती समुद्री चाचेगिरीमुळे, अनेक भारतीय नाविकांनी आजवर जीव गमवाला आहे.अधिकृत अहवालांनुसार, मार्च २०२६ पर्यंत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये दोन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता झाला होता. मध्य-पूर्वेतील संघर्षात दहा भारतीय नाविकांचा मृत्यू आणि सुमारे ७५ भारतीय जखमी झाल्याची माहिती आहे. रशिया-युक्रेन युद्ध क्षेत्रातही, भारतीय नाविकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काळ्या समुद्र मार्गावरही पाच भारतीय नाविकांचा मृत्यू झाला असून, दोनजण बेपत्ता असल्याचे अहवाल सांगतात. ही आकडेवारी केवळ संख्या नसून, प्रत्येक आकड्यामागे एक कुटुंब, एक स्वप्न आणि देशासाठी सेवा करणारा एक भारतीय नागरिक आहे.
 
युद्धक्षेत्रातील खरे धोके : आजच्या काळात व्यापारी जहाजांना केवळ समुद्री चाच्यांचाच नव्हे; तर क्षेपणास्त्रे, सशस्त्र ड्रोन, समुद्री माईन्ससारख्या धोयांचाही सामना करावा लागतो आहे. पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्र भागात, व्यापारी जहाजे अनेकदा युद्धाच्या सावटाखालीच प्रवास करतात. कधीकधी जहाजाचा ध्वज, मालक, मालाचा प्रकार किंवा गंतव्य बंदरांमुळे जहाज लक्ष्य होते. राजकीय निर्णयांमध्ये कोणतीही भूमिका नसतानाही, जहाजावरील कर्मचारी प्रत्यक्ष धोक्याला सामोरे जातात. रशिया-युक्रेन संघर्ष क्षेत्रात क्षेपणास्त्रहल्ले, ड्रोनहल्ले, समुद्री माईन्स, बंदरे बंद होणे आणि नौवहन व्यवस्थेचे नुकसान, यामुळे व्यापारी जहाजांवरील धोका वाढला आहे.
 
सागरी कर्मचार्‍यांसमोरील धोके: भारतीय कर्मचारी अनेक प्रकारच्या धोयांचा सामना करतात, ते पुढीलप्रमाणे :
  • बंदरांवरील हल्ले आणि जहाजांचे नुकसान
  • गैरसमजातून लक्ष्य होण्याचा धोका
  • समुद्री चाचे, सशस्त्र दरोडेखोर आणि ओलीस ठेवण्याचे प्रकार
  • जहाजावर पुरेसे अन्न, औषधे, इंधन किंवा सुटे भाग न मिळणे
  • युद्धक्षेत्रात दीर्घकाळ अडकून पडणे आणि वेळेवर कर्मचारी बदल न होणे
  • थकवा, चिंता, मानसिक तणाव आणि कुटुंबीयांची काळजी
व्यापारी जहाज ही लढाऊ युद्धनौका नाही. त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे किंवा आधुनिक ड्रोनहल्ले रोखण्याची क्षमता नसते. त्यामुळे अशा जहाजांवरील कर्मचारी युद्धबळी ठरतात.
 
मानसिक आणि मानवी आव्हाने: युद्ध आणि संघर्षाचा परिणाम, केवळ जीवितहानीपुरताच मर्यादित नसतो. अनेक वेळा नाविकांना नियोजित कालावधीपेक्षा, जास्त काळ जहाजावर राहावे लागते. कर्मचार्‍यांच्या बदल्यात विलंब होतो, वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण होते, ताजे अन्न, औषधे आणि सुटे भाग मिळण्यातही अडचणी येतात. त्यातच सॅटेलाईट संपर्क खंडित होणे, संवादव्यवस्था बंद पडणे आणि कुटुंबीयांशी संपर्क तुटण्यासारख्या घटनांमुळे मानसिक तणाव वाढतो. भारतातील कुटुंबीयांनाही अपुरी माहिती आणि अनिश्चिततेमुळे, मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. मध्य-पूर्वेतील अलीकडील संघर्षांत अनेक जहाजांवर दीर्घकाळ तैनाती, वैद्यकीय मदतीत विलंब आणि जहाजावरील परिस्थिती बिघडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

भारतीय नाविक स्वतःचे संरक्षण कसे करतात?
 
धोकादायक परिस्थितीतही व्यापारी जहाजांचे कर्मचारी अत्यंत व्यावसायिक पद्धतीनेच काम करतात. जहाज कंपन्या आणि कर्मचारी प्रवासापूर्वी जोखीम मूल्यांकन करतात. नौदलाच्या सूचना, गुप्तचर माहिती आणि सुरक्षा अहवालांचा अभ्यास करूनच मार्ग निश्चिती होतो. चाचेगिरीविरोधी उपाययोजनांमध्ये अतिरिक्त पहारा, जहाजावर नियंत्रित प्रवेश, प्रकाशयोजना, पाण्याचे फवारे, काटेरी तार आणि संशयास्पद हालचालींचा त्वरित अहवाल अशांचा समावेश असतो. चाच्यांचा हल्ला झाल्यास कर्मचारी ‘सिटाडेल’ नावाच्या सुरक्षित विभागात, आश्रय घेतात. तेथून ते नौदलाशी संपर्क साधून मदत मागतात. नियमित सरावामुळे आग, पूर, क्षेपणास्त्रहल्ले आणि ओलीस परिस्थिती यांना तोंड देण्याची तयारी ठेवली जाते. तरीही, व्यापारी जहाजे क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक ड्रोन किंवा मोठ्या सशस्त्र हल्ल्यांपासून स्वतःचे प्रभावी संरक्षण करू शकत नाहीत. त्यामुळे केवळ जहाजावरील कर्मचार्‍यांवरच जबाबदारी टाकून चालणार नाही.

भारताने काय करावे?
 
भारतीय नाविकांच्या सुरक्षेसाठी, सरकारने अधिक व्यापक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. उच्च जोखमीच्या भागात पाठविण्यापूर्वी, कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष धोयांची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असावे. एखाद्या नाविकाला युद्धक्षेत्रात जाण्यास नकार देण्याचा अधिकार असावा आणि त्यासाठी त्याला नोकरीत कोणताही तोटा होऊ नये. चुकीची माहिती देणार्‍या, कर्मचार्‍यांवर दबाव आणणार्‍या किंवा परत पाठविण्यास टाळाटाळ करणार्‍या जहाज कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
 
केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, नौदल, तटरक्षक दल आणि इतर संस्थांनी, २४ तास कार्यरत असलेले ‘सागरी संकट नियंत्रण केंद्र’ संयुक्तपणे उभारावे. हे केंद्र कुटुंबीयांशी थेट संपर्क ठेवेल, बचावकार्याचे समन्वयन करेल आणि धोकादायक भागातील भारतीय नाविकांची माहितीही अद्ययावत ठेवेल. याशिवाय, युद्ध जोखीम विमा, अपंगत्व भरपाई, वैद्यकीय स्थलांतर, सुरक्षित परतावा आणि मृत किंवा जखमी नाविकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी अधिक मजबूत व्यवस्था असावी.
 
सागरी सुरक्षेत नौदलाची भूमिका : भारतीय नौदलाने अरबी समुद्र, एडनचे आखात, लाल समुद्र आणि पश्चिम हिंदी महासागरात अधिक व्यापक गस्त सुरू ठेवणे आवश्यक आहे. नौदलाची उपस्थिती भारतीय व्यापारी जहाजांमध्ये विश्वास निर्माण करते. चाचेगिरीग्रस्त भागांत ताफा पद्धतीने जहाजांची वाहतूक, संरक्षणात्मक गस्त आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणेही अत्यंत आवश्यक आहे.
 
राष्ट्राची कृतज्ञता : भारतीय व्यापारी नौदल कर्मचारी हे भारताच्या ऊर्जासुरक्षेचे, अन्नसुरक्षेचे आणि आर्थिक सामर्थ्याचे अदृश्य रक्षक आहेत. भारतातील प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध इंधन, उद्योगांना मिळणारा कच्चा माल, शेतकर्‍यांसाठी येणारी खते आणि जगभर जाणारा भारतीय निर्यात मालामागे, याच नाविकांचे अथक परिश्रम आहेत. युद्ध, दहशतवाद, समुद्री चाचेगिरी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या सावटाखाली कार्यरत असतानाही, ते देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी प्रवाही ठेवतात. आज संपूर्ण देशाने या धाडसी भारतीय नाविकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. आपल्या सैनिकांप्रमाणेच हे व्यापारी नाविकही, राष्ट्रसेवेत योगदान देत आहेत. त्यांचे बलिदान, त्यांची चिकाटी आणि त्यांच्या व्यावसायिक निष्ठेमुळेच भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जापुरवठा आणि जागतिक व्यापार सुरक्षित राहतो. राष्ट्राने या शूर भारतीयांना केवळ शब्दांनीच नव्हे, तर मजबूत सुरक्षा व्यवस्था, तत्काळ मदत, न्याय्य भरपाई आणि त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानपूर्ण काळजीद्वारे सलाम केला पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिकाने या धाडसी सागरी योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे, हेच आपले कर्तव्य आहे. या सर्व भारतीय व्यापारी नाविकांना राष्ट्राचा सलाम! समुद्राच्या अथांग लाटांवर भारताचा ‘तिरंगा’ अभिमानाने फडकवत ठेवणार्‍या, या निःशब्द वीरांचे योगदान देश कधीही विसरणार नाही.
 
 




हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

संबंधित मजकूर