मुंबई : (Vadhvan Bandar) देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाला वेगवान रस्ते संपर्क उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठे नियोजन केले असून, वाढवण बंदर ते तवा ३३ किलोमीटरचा आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग आणि तवा ते भरवीर १०५ किलोमीटरचा नवीन प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाढवण बंदराची थेट जोडणी समृद्धी महामार्गाशी होणार असून, २०३० पर्यंत दोन्ही मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले की, वाढवण बंदरालगत डहाणू तालुक्यात सुमारे ५१४ चौ. कि.मी. क्षेत्रात एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत असून, बंदराशी संलग्न आधुनिक टाउनशिप विकसित करण्याचे नियोजनही सुरू आहे. या टाउनशिपमुळे बंदर परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला चालना मिळणार आहे.(Vadhvan Bandar)
वाढवण बंदरापासून राष्ट्रीय महामार्गावरील तवा गावापर्यंतचा ३३ किलोमीटरचा आठ पदरी रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येणार आहे. हा मार्ग वाढवण बंदराला विद्यमान राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यापुढे तवा ते भरवीर दरम्यान १०५ किलोमीटरचा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरील प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे एमएसआरडीसीमार्फत उभारण्यात येणार आहे.
या एक्सप्रेसवेची संरेखन अंतिम करण्यात आली असून राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली आहे. हा मार्ग ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहतूक होईल, अशा दर्जाचा विकसित करण्यात येणार आहे.(Vadhvan Bandar)
भरवीर येथे समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे वाढवण बंदरातून मुंबई, नाशिक, नागपूर तसेच राज्याच्या इतर भागांकडे मालवाहतूक अधिक जलद आणि अखंडपणे करता येणार आहे. गायकवाड यांनी सांगितले की, २०३० मध्ये वाढवण बंदराचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, त्याचवेळी हा एक्सप्रेसवेही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
बंदर, टाउनशिप आणि उच्च क्षमतेच्या रस्ते संपर्कामुळे वाढवण परिसर देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Vadhvan Bandar)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.