नेपाळ हिंदुराष्ट्र करण्याच्या मागणीला पुन्हा जोर! बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवा; विविध संघटनांची मागणी

    03-Aug-2026   
 
Nepal Hindu Nation Demand
 
मुंबई (Nepal Hindu Nation Demand) : नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. हा मुद्दा केवळ संघटना आणि आंदोलनांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सर्वसामान्य नागरिकही आपल्या लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारू लागले आहेत. विविध भागांमध्ये खासदारांना घेराव घालून हिंदू समाजाच्या सुरक्षा आणि अधिकारांच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी सध्या केली जात आहे.
 
सिरहा जिल्ह्यात राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे खासदार बबलू गुप्ता यांना नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. आंदोलकांचे म्हणणे होते की, परिवर्तनाची अपेक्षा आणि नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र बनवण्याच्या आशेने त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांच्या अपेक्षांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Nepal Hindu Nation Demand)
 
 
 
नेपाळमध्ये २६ जुलैच्या रात्री सुरू झालेल्या हिंसाचाराची तीव्रता आता कमी झाली असून, अनेक जिल्ह्यांतील तणावाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, या घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारला १५ सूत्री मागण्यांचे निवेदन सादर केले असून, नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडण्याची प्रमुख मागणी केली आहे. या निवेदनात सुनसरी जिल्ह्यातील देवानगंज येथे झालेल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी, दोषी आणि कट रचणाऱ्यांना तातडीने अटक, तसेच चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गोळीबाराचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख जाहीर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रशासकीय निष्काळजीपणा आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. (Nepal Hindu Nation Demand)
 
निवेदनात हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना शहीदाचा दर्जा द्यावा, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि जखमींवर मोफत व प्रभावी उपचाराची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर बौद्ध आणि किरात परंपरांचा सन्मान राखत नेपाळची 'वैदिक सनातन हिंदू राष्ट्र' म्हणून पुनर्स्थापना करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर हाकलावे, सीमासुरक्षा अधिक मजबूत करावी आणि १९९० नंतर देण्यात आलेल्या नेपाळी नागरिकत्वांची चौकशी करावी, अशीही मागणी संघटनांनी केली आहे.
 
पंतप्रधान बालेन शाह यांनी या मागणीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हिंदू राष्ट्राच्या पुनर्स्थापनेचा प्रश्न हा राजेशाहीच्या मुद्द्याशीही जोडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत असा कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. सरकार संघीय व्यवस्थेला कटिबद्ध असून ती अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हिंदू राष्ट्र घोषित केल्यास देशाची संघीय व्यवस्था कमकुवत होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Nepal Hindu Nation Demand)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर