पुण्याच्या संघकार्याचा चालताबोलता इतिहास : कै. मुरलीधर रामप्रसाद तथा 'दादा' किराड

    03-Aug-2026
 Murlidhar Dada Kirad
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कार्याचा इतिहास अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि लोकसंग्रहाने घडला आहे. त्या परंपरेतील कै. मुरलीधर रामप्रसाद तथा 'दादा' किराड हे एक अजरामर व्यक्तिमत्त्व होते. संघकार्याला आयुष्यभर वाहून घेत, असंख्य कार्यकर्त्यांना घडविणारे, संकटातही संघनिष्ठा न ढळू देणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने नाते जोडणारे दादा किराड यांचे जीवन हे संघकार्याच्या मूल्यांचा सजीव आदर्श आहे. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा हा संक्षिप्त परिचय.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कार्याचा इतिहास लिहायचा झाला, तर काही व्यक्तिमत्त्वे ही केवळ कार्यकर्ते नसून इतिहासाची जिवंत पानेच ठरतात. कै. मुरलीधर रामप्रसाद तथा 'दादा' किराड हे असेच एक व्यक्तिमत्त्व. पुण्याच्या पूर्व भागापुरते नव्हे, तर संपूर्ण शहरात 'दादा' म्हणून परिचित असलेले हे ज्येष्ठ स्वयंसेवक संघनिष्ठा, लोकसंग्रह, कार्यकर्त्यांवरील माया आणि निःस्वार्थ सेवाभाव यांचे मूर्तिमंत प्रतीक होते.
 
दुटांगी धोतर, पांढरा शर्ट, काळी टोपी आणि चेहऱ्यावर कायम प्रसन्न हास्य—ही त्यांची ओळख. मात्र त्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वामागे संघकार्याचा अनेक दशकांचा समृद्ध वारसा दडलेला होता. संघाच्या पुणे शाखेचा चालताबोलता इतिहास म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे, तो याच कारणामुळे.
 
दादांचा जन्म पुण्यातील नाना पेठेतील किराड कुटुंबात झाला. घरातील ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे लहान वयातच संसाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच १९३५ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. बाळू वझे, बापू दात्ये आणि किशा पटवर्धन या वर्गमित्रांच्या सहवासातून त्यांचा संघाशी परिचय झाला आणि हा परिचय पुढे आयुष्यभराच्या अखंड साधनेत रूपांतरित झाला. १९३६ मध्ये संघ शिक्षा वर्गाचे प्रथम वर्ष, १९३९ मध्ये द्वितीय आणि १९४१ मध्ये नागपूर येथे तृतीय वर्ष पूर्ण करून त्यांनी संघकार्याची भक्कम पायाभरणी केली.
 
दादांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा त्यांना लाभलेला सहवास. नागपूर काँग्रेस अधिवेशनानंतर पुण्यात सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गात डॉक्टरांनी "किराड" हे नाव ऐकताच त्रिभुवनशेठ किराड यांची चौकशी केली. दादांनी ते आपले चुलते असल्याचे सांगितल्यावर डॉक्टरांनी त्यांना वर्गात बोलावून आणण्यास सांगितले. दादांनी तत्काळ सायकलवर जाऊन त्यांना आणले आणि त्या भेटीतून त्रिभुवनशेठही संघकार्याशी जोडले गेले.
 
डॉ. हेडगेवारांच्या अद्भुत लोकसंग्राहक वृत्तीचा हा प्रसंग दादांनी आयुष्यभर जपला आणि स्वतःच्या कार्यातही तोच आदर्श आचरणात आणला. १९६४ पर्यंत पुण्यातील नाना चावडी चौकाला 'पाकिस्तान चौक' म्हणून ओळखले जात असे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनालाही तेथे राष्ट्रध्वजासोबत हिरवा झेंडा लावण्याची प्रथा होती. पुण्याचे पहिले शहर संघचालक विनायकराव आपटे यांच्या प्रेरणेने दादा किराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धैर्याने ही परंपरा बदलली. त्या चौकात राष्ट्रध्वजाबरोबर भगवा ध्वज फडकविण्याची परंपरा सुरू झाली. त्या काळातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेतल्यास हे अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी कार्य होते.
 
संघकार्य म्हणजे केवळ संघटन नव्हे, तर प्रसंगी संघर्षही. गांधीहत्येनंतर १९४८ मध्ये झालेल्या धरपकडीत त्यांना कारावास भोगावा लागला. १९४९ च्या संघ सत्याग्रहातही त्यांनी तुरुंगवास पत्करला. १९६५ मधील नाना पेठ दंगलीच्या पार्श्वभूमीवरही त्यांना अटक झाली. आणीबाणीच्या काळात १९७५ मध्ये 'मिसा' अंतर्गत तब्बल अठरा महिने त्यांनी कारागृहात व्यतीत केले. प्रतिकूल परिस्थितीतही संघनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा त्यांचा निर्धार कधीच डळमळला नाही.
 
दादांनी संघात शाखा कार्यवाह, मंडल कार्यवाह, पुणे महानगर सहसंघचालक अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. संघकार्याबरोबरच समाजजीवनातील विविध संस्थांमधूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९६९ पासून 'हिंदुस्थान जागरण' संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राष्ट्रजागरणाचे कार्य केले. मोतीबाग येथील 'संस्कृती संरक्षण संस्था'चे १९८४ पासून अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. 'जनता सहकारी बँके'च्या स्थापनेतील वीस प्रवर्तकांपैकी ते एक होते. सार्वजनिक जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यांनी संघसंस्कारांचा ठसा उमटवला.
 
दादांचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या कुटुंबालाही कर्तृत्वाचा वारसा दिला. किराड कुटुंबातील विष्णुदास किराड हे नामांकित डॉक्टर झाले, तुलसीदास किराड हे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाले, तर धाकटे बंधू भानुदास किराड यांनी जनता सहकारी बँकेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्य केले. या सर्वांच्या यशामागे दादांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संस्कार यांचा मोठा वाटा होता.
 
लहान कार्यकर्त्याला प्रेमाने हात धरून मार्गदर्शन करणे आणि ज्येष्ठांशी स्नेहाने संवाद साधणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. म्हणूनच संपूर्ण पुणे त्यांना स्नेहाने "दादा" म्हणत असे.
 
"पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलावे वैसा" या उक्तीप्रमाणे प्रत्येकाशी एकरूप होणारे, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि संघकार्यालाच जीवनाचे ध्येय मानणारे दादा किराड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपरंपरेतील एक प्रेरणादायी पर्व ठरले.
आजही त्यांच्या आयुष्याकडे पाहिले की संघनिष्ठा, कर्तव्यपरायणता, लोकसंग्रह, त्याग आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचा सजीव आदर्श आपल्या समोर उभा राहतो. म्हणूनच कै. मुरलीधर (दादा) किराड यांचे जीवन हे प्रत्येक स्वयंसेवकासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत राहील.




संबंधित मजकूर