मुंबई (Mundra Port Record) : अदानी पोर्ट्सच्या प्रमुख मुंद्रा बंदराने भारताच्या सागरी क्षेत्रात नवा इतिहास रचत एका जहाजावरील सर्वाधिक २१ हजार ८५ टीईयू कंटेनर्सची यशस्वी हाताळणी केली आहे. एमएससी अँब्रा या जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एकावर ही विक्रमी कामगिरी करण्यात आली असून, भारतीय बंदरांमधील एका जहाजावरील कंटेनर हाताळणीचा हा नवा राष्ट्रीय विक्रम ठरला आहे.
मुंद्रा बंदराने यापूर्वीचा जानेवारी २०२४ मध्ये एमएससी लिव्होर्नो या जहाजाच्या माध्यमातून झालेल्या १६ हजार ५६९ टीईयू हाताळणीचा विक्रम तब्बल ४ हजार ५१६ टीईयूने मागे टाकला आहे. ही वाढ सुमारे २६.९ टक्के इतकी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. (Mundra Port Record)
४०० मीटर लांबीच्या महाकाय जहाजाची यशस्वी हाताळणी
एमएससी अँब्रा हे सुमारे ४०० मीटर लांब आणि ६१.५४ मीटर रुंद जहाज असून, त्याचे विस्थापन वजन २ लाख ५६ हजार २२८ मेट्रिक टन आहे. इतक्या मोठ्या जहाजाची सुरक्षित हाताळणी करण्यासाठी अत्याधुनिक सागरी पायाभूत सुविधा, खोल पाण्याची क्षमता, अचूक नियोजन आणि अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता असते. मुंद्रा बंदराने ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण केली.(Mundra Port Record)
या विक्रमाबाबत अदानी पोर्ट्स मुंद्राचे कार्यकारी संचालक रक्षित शाह म्हणाले, "एमएससी अँब्रा या जहाजावरील २१ हजार ८५ टीईयू हाताळणी ही मुंद्रा बंदरासाठी आणि भारताच्या सागरी क्षेत्रासाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे. हा विक्रम आमच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम टीमवर्कचे प्रतीक आहे. जागतिक स्तरावर अधिक मोठ्या कंटेनर जहाजांची संख्या वाढत असताना, भारताला जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही भविष्योन्मुख क्षमता विकसित करण्यास कटिबद्ध आहोत." (Mundra Port Record)
कंपनीच्या माहितीनुसार, या विक्रमी ऑपरेशनसाठी जहाजाच्या आगमनापूर्वीचे नियोजन, बर्थचे अचूक वाटप, क्रेनची प्रभावी तैनाती, रिअल-टाइम यार्ड व्यवस्थापन आणि विविध विभागांमधील समन्वय महत्त्वाचा ठरला. आधुनिक कंटेनर टर्मिनल, डेटा-आधारित व्यवस्थापन प्रणाली आणि अनुभवी मनुष्यबळामुळे ही जटिल प्रक्रिया अत्यंत कार्यक्षम आणि सुरक्षितपणे पार पडली. (Mundra Port Record)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.