मुंब्र्यात धूम अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला; १७० रहिवाशांचे भवितव्य टांगणीला, मुंब्रा प्रभागाकडून तातडीने इमारत खाली करण्याची नोटीस!

    03-Aug-2026
 
Mumbra Dhoom Apartment Slab Collap
 
ठाणे (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse) : ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा कौसा येथे शनिवारी दुपारी सी-१ म्हणजेच अत्यंत धोकादायक घोषित केलेल्या एका २० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीतील १७०हून अधिक रहिवाशांना आता तातडीने घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटना दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ५१मिनिटांनी धूम अपार्टमेंट, सानिया हॉल जवळ, चांदनगर, कौसा, मुंब्रा येथे ही दुर्घटना घडली.
 
घटनेचा तपशील
 
तळ अधिक पाच मजली असलेल्या धूम अपार्टमेंटचे बांधकाम अंदाजे २० वर्षांपूर्वी झाले आहे. शनिवारी दि. १ ऑगस्ट२०२६ दुपारच्या सुमारास इमारतीच्या वरच्या मजल्यावरील स्लॅबचे मोठे प्लास्टर अचानक कोसळले. यावेळी इमारतीच्या मुख्य कॉलमलाही मोठे तडे गेल्याचे निदर्शनास आले. इमारतीचा उर्वरित भाग देखील अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचा प्राथमिक अहवालात उल्लेख आहे. (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse)
 
या इमारतीत एकूण ४२ सदनिका आहेत. त्यापैकी सध्या २२ सदनिकांमध्ये अंदाजे १६०ते १७० रहिवासी वास्तव्यास आहेत.
 
प्रशासनाची तातडीची कारवाई
  
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. विजय कावळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच, अतिक्रमण विभागाचे अधिकारी, मुंब्रा प्रभाग समितीचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे जवान देखील घटना स्थळी दाखल झाले. (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse)
 
धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन मुंब्रा प्रभाग समितीमार्फत इमारतीतील सर्व रहिवाशांना "तातडीने इमारत रिकामी करा" अशा आशयाच्या लेखी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पुढील तांत्रिक तपासणी आणि पुढील कार्यवाही महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse)
 
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
 
 
दुर्घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. "गेले तीन ते चार वर्षांपासून इमारतीत पाणी गळणे व इमारतीच्या भिंतींना भेगा पडण्याची तक्रार केली होती. पण कोणीही लक्ष दिले नाही. आता अचानक स्लॅब कोसळला आणि आम्हाला घराबाहेर पडावे लागत आहे," अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.
 
आयुक्त सौरभ राव यांचे कडक आदेश
 
भिवंडी येथे दि. ३० जुलै रोजी धोकादायक इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील सर्व जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार आयुक्तांनी सर्व विभागांना आदेश दिले आहेत की, सी-१ प्रवर्गातील धोकादायक इमारतींना कलम २६४ अंतर्गत नोटीस बजावून तातडीने रिकाम्या करून घ्याव्यात. इमारत रिकामी करण्यास अडथळा आल्यास वीज व पाणीपुरवठा खंडित करावा. तसेच इमारतीवर इशारा फलक लावण्यात यावा. (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse)
 
ज्या रहिवाशांकडे पर्यायी व्यवस्था नाही त्यांच्यासाठी महापालिकेच्या स्थलांतर शिबिरांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात तांत्रिक अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करून धोकादायक इमारतींची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse)
 
ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न
 
 
ठाणे महापालिकेच्या यादीत सध्या २०० हून अधिक सी-१ आणि सी-२ प्रवर्गातील इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारच्या इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडत असतात. तरीही पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायम आहे. (Mumbra Dhoom Apartment Slab Collapse)

सी-१ इमारत म्हणजे काय?
 
सी-१ : अत्यंत धोकादायक - तातडीने रिकामी करणे बंधनकारक
सी-२ (अ) : दुरुस्ती करून राहण्यायोग्य
सी-२ (ब) : किरकोळ दुरुस्ती आवश्यक
 
 




संबंधित मजकूर