स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभर ‘मीही स्वदेशी समर्थक’ अभियानाचा शुभारंभ

    03-Aug-2026   
Swadeshi Jagran Manch
 
मुंबई : (Swadeshi Jagran Manch) स्वदेशी जागरण मंचाने संपूर्ण देशभर ‘मीही स्वदेशी समर्थक’ या अभियानाची सुरुवात केली आहे. मंचाचे अखिल भारतीय संयोजक आर. सुंदरम यांनी मदुराई येथून या अभियानाचा शुभारंभ केला. अभियानाचा प्रारंभ करताना ते म्हणाले की, देशाची उन्नती केवळ स्वदेशीच्या मार्गानेच शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वदेशी समर्थक होणे आवश्यक आहे.
 
पुढे ते म्हणाले की, स्वदेशीच्या बळावरच भारताने आज जगाच्या पटलावर आपली प्रगती सिद्ध केली आहे. परकीय विचार किंवा परकीय वस्तूंच्या आधारे देशाला खऱ्या अर्थाने प्रगत करता येणार नाही. भारताला समृद्ध आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वदेशीचा समर्थक होण्याबरोबरच स्वदेशी स्वीकारण्याचा पुढाकार घ्यावा. हाच उद्देश समोर ठेवून स्वदेशी जागरण मंचाने जनजागृतीसाठी डिजिटल माध्यमातून ‘मीही स्वदेशी समर्थक’ हे अभियान सुरू केले आहे.(Swadeshi Jagran Manch)
 
या अभियानाचा शुभारंभ अखिल भारतीय सहसंयोजक डॉ. अश्वनी महाजन यांनी दिल्ली येथून, सहसंयोजक डॉ. धनपत राम अग्रवाल यांनी कोलकाता येथून, सहसंयोजक डॉ. राजीव कुमार यांनी मुरादाबाद येथून, सहसंयोजक डॉ. अजय पतकी यांनी बिकानेर येथून तसेच मंचाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी गुवाहाटी येथून केला.(Swadeshi Jagran Manch)
अखिल भारतीय सहसंयोजक डॉ. अश्वनी महाजन यांनी सांगितले की, हे अभियान पूर्णपणे डिजिटल माध्यमातून राबविण्यात येणार आहे. डिजिटल नोंदणी, सामाजिक माध्यमे, क्यूआर कोड आणि ऑनलाइन जनसंपर्काच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानाशी जोडले जाईल. अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल स्वरूपात ‘स्वदेशी समर्थक’ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल.(Swadeshi Jagran Manch)
 
स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी सांगितले की, देशभरातील सर्व प्रांत आणि जिल्ह्यांमध्ये व्यापक जनजागरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे २ कोटी नागरिक ऑनलाइन संकल्प घेतील, असा मंचाचा संकल्प आहे.(Swadeshi Jagran Manch)
 
‘मीही स्वदेशी समर्थक’ अभियानांतर्गत पुढील संकल्प करण्यात येणार आहेत :
 
माझ्या दैनंदिन जीवनात स्थानिक आणि स्वदेशी उत्पादनांच्या खरेदी-विक्रीला प्राधान्य देईन.
स्वदेशी भाषा, वेशभूषा, जीवनशैली आणि विस्तारित कुटुंबव्यवस्था स्वीकारण्यासाठी व तिचा प्रसार करण्यासाठी कार्य करीन.
‘युवकांचे स्वावलंबन, गुणवत्तापूर्ण रोजगार, उद्योजकता, नवोपक्रम आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून साध्य होते’ या विचाराचा युवकांमध्ये प्रसार करीन.
 
‘भारताला समृद्ध आणि महान राष्ट्र बनविण्यासाठी’ कार्य करणाऱ्या राष्ट्रभक्त शक्तींना सर्वतोपरी सहकार्य व योगदान देईन.
राष्ट्राची एकता आणि अखंडता, स्वदेशीचा सर्वांगीण प्रसार तसेच जात, भाषा आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीन. (Swadeshi Jagran Manch)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर