कानउघाडणी अत्यावश्यक!

    03-Aug-2026
Noise Pollution
 
पंचेद्रियांमध्ये कानाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, अलीकडे विनाकारण प्रसिद्ध झालेल्या ‘डीजे’नामक प्रकारामुळे, श्रवणशक्ती बाधित होण्याचा धोका निर्माण झाला. श्रवणशक्ती जशी मैदानातील ‘डीजे’मुळे बाधित होते, तशीच खेळाडूंमध्ये ती विविध कारणांनी होते. त्यामुळे श्रवणशक्तीची योग्य काळजी घेण्यासाठी सर्वांचीच कानउघडणी आवश्यक झाली आहे...
 
येणार्‍या गणेशोत्सव मिरवणुकीतील ढोल-पथकांची जोरदार तयारी, दोन महिने आधीपासूनच सुरू झाली आहे. आतापासूनच त्या पथकांच्या सरावांचे आवाज, दिवेलागणीनंतर आपल्या कानी पडू लागतात. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत या पथकांच्याच जोडीला, आता ‘डीजे’ही असतात. गणेशोत्सवात सर्रास झालेला ‘डीजे’चा वापर हा ध्वनिप्रदूषण, उच्च न्यायालयाचे निर्बंध आणि पारंपरिक संस्कृतीच्या जतनाच्या मुद्द्यांमुळे, एक मोठाच वादग्रस्त विषय झाला आहे. लहान-मोठी गावं, शहरांमध्येही अलीकडे ‘डीजे’च्या वापरामुळे होणारा त्रास, म्हणावा तसा कमी झालेला नाही. गणेशोत्सवच नव्हे, तर नवरात्रीतही ‘डीजे’ असतोच. यापासून क्रीडाक्षेत्रही मागे राहिलेली नाही. क्रिकेट सामन्यांत भारत जिंकला रे जिंकला, की ‘ती मंडळे’ आपल्या ‘डीजे’ला मोकळे सोडतात. त्यामुळे या कर्णप्रेमी जनांची कानउघाडणी, वारंवार करावीच लागते!
 
या कर्णपुराणावरून, मला जून महिन्यतील राष्ट्रपतीभवनातला सोहळा पाहिल्याचं आठवलं. त्यात कला, समाजसेवा, वैद्यक, कृषी, साहित्य, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी, राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. त्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा, प्रवीण कुमार, महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, बलदेव सिंग, के. पंजानिवेल, हॉकीसाठी सविता पुनिया अशा क्रीडापटूंनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता. तर ‘पद्मभूषण’च्या नामावलीत, अमेरिकेत स्थायिक झालेला टेनिसपटू विजय अमृतराजचा समावेश होता. ‘पद्मभूषण’ पुरस्कारात कला क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका अलका याग्निकचेही नाव होते. कला आणि क्रीडेची श्रेयनामावली पाहिल्यावर, मला अलका याग्निकची आठवण विशेषत्वाने झाली. सध्या अलका याग्निक गायन क्षेत्रापासून दूर असल्याचं आपण ऐकलं असेलच.
 
ज्येष्ठ गायिका अलका याग्निकला ‘सेन्सोरिनरल नर्व्ह हियरिंग लॉस’ हा दुर्मीळ श्रवणदोष झाला आहे. हा आजार एका अचानक झालेल्या विषाणू हल्यामुळे होतो. यात कानाच्या आतील भागातील (कॉलिया) सूक्ष्म पेशींना किंवा कानांपासून मेंदूला जोडणार्‍या श्रवण मज्जातंतूला (ऑडिटरी नर्व्ह) इजा होते. अलका याग्निक एका विमान प्रवासातून बाहेर आल्यावर, त्यांना श्रवणशक्ती बाधित झाल्याचे जाणवले होते. पुढे वैद्यकीय तपासणीनंतर, डॉटरांनाही अलका याग्निकच्या या श्रवणदोषाची माहिती समजली. यात आवाज अस्पष्ट ऐकणे किंवा ऐकण्याची क्षमता अचानक मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा त्रास होतो. अलका याग्निकचा हा श्रवणदोष कोणालाही होऊ शकतो; अगदी खेळाडूंनादेखील!
 
खेळात डोयाला दुखापत होणे, हे नेहमीचेच. मुष्टियुद्ध, जलतरणाबरोबरच, हॉकी, फुटबॉलमध्येही डोयावर फुटबॉल, स्टिक यांचा अति जोरदार आघात झाल्यास, कानांची रचना किंवा श्रवण मज्जातंतूंना ईजा होण्याचा धोका असतो. मोटर रेसिंग, शूटिंग रेंज किंवा मोठ्या स्टेडियममधील कर्कश आवाजामुळेही, कानातील लवचिक पेशींना ईजा होते. अचानक होणारा रक्ताभिसरण बिघाड, अतिश्रम किंवा निर्जलीकरणानेही कानाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.
 
सार्वजनिक कार्यक्रमात ‘डीजे’सारखे कर्णकर्कश संगीत लावणे, हेपण आपल्या श्रवणदोषाला कारणीभूत ठरू शकते. त्या कर्णदोषाची काही ठळक लक्षणे आणि काळजी याचा आपण थोडयात विचार करू.कान भिरभिरणे, ऐकताना आवाज अस्पष्ट वाटणे, तोडांतील आवाज न समजणे, गर्दीच्या मैदानात सहकार्‍यांचे बोलणे ऐकू न येणे,अशी या श्रवणदोषाची लक्षणे असू शकतात.
 
खेळताना हेल्मेट, इयरप्लग्स सारख्या सुरक्षात्मक उपायांमुळे, क्रीडापटू कर्णदोषांपासून आपला बचाव करू शकतात. खेळांमध्ये ‘सेन्सोरिन्यूरल हियरिंग लॉस’ म्हणजे, आतील कानाला किंवा ऐकण्याच्या नसांना होणारी इजा होय. मोठ्या स्टेडियम्समध्ये खेळ, संगीत व प्रेक्षकांच्या प्रचंड गदारोळामुळे निर्माण होणारा तीव्र आवाज, खेळाडू आणि प्रेक्षकांच्या कानांना हानी पोहोचवतो. खेळताना डोयाला जबर दुखापत, जोराचा आवाज किंवा तीव्र संसर्गामुळेही हा दोष होऊ शकतो. क्रीडाक्षेत्रात ‘सेन्सोरिन्यूरल हियरिंग लॉस’चे बळी पडलेले खेळाडू आपल्या दिसतात.
 
‘विश्व स्वास्थ्य संघटने’नं घोषित केलेला ‘जागतिक श्रवण दिवस’, दि. ३ मार्च रोजी साजरा करण्यात आला. दि. ३ मार्च ही तारीख पाहिल्यास, त्यातील ‘३’ हा अंक दोन कानांसारखा दिसतो. विविध श्रवणदोषांच्या जनजागृतीसाठी ३/३ हा दिवस साजरा करतात. श्रवणदोष असणार्‍या खेळाडूंसाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत, या माध्यमातून जनजागृती केली जाते. जेव्हा एखादा खेळाडू सातत्याने खराब कामगिरी करतो, नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा संघव्यवस्थापक त्यांची कानउघाडणी करतात. अशी कानउघाडणी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक किंवा सांघिक चुका सांगणे, नियमांचे काटेकोर पालन करायला लावणे, खेळाडूंना गाफील राहण्यापासून रोखून त्यांच्यात विजयाची जिद्द निर्माण करणे.
 
खेळाडूंमध्ये कानांच्या दुखापतींचा संबंध प्रामुख्याने ‘कॉलीफ्लावर इअर’, ‘स्विमर इअर’ आणि बाह्य आघातांशी असतो. ‘कॉलीफ्लावर इअर’ प्रामुख्याने कुस्ती, रग्बी, बॉसिंग आणि मिस्ड मार्शल आर्ट्ससारख्या खेळांमध्ये, कानांवर सतत धक्के बसल्याने होतो. कानाच्या कूर्चा आणि त्वचेमध्ये रक्त साचून सूज येते. वेळेत उपचार न झाल्यास, रक्त घट्ट होते आणि कानाचा आकार कायमचा बदलून तो फुलकोबीसारखा दिसतो. सराव किंवा सामन्यादरम्यान योग्य ‘हेडगियर’ किंवा ‘इअर गार्ड’ वापरणे, हाच यावरचा सर्वोत्तम उपाय. जलतरणपटूंच्या कानातही दीर्घ काळ पाणी साचून राहिल्याने, जिवाणू किंवा बुरशीची वाढ होते. त्याने कानात खाज सुटणे, लालसरपणा, वेदना आणि पाणी वाहणे असे कर्णदोष होतात. हे टाळण्यासाठी पोहताना ‘इअरप्लग्ज’ वापरणे आणि बाहेर पडल्यावर लगेच कान कोरडे करणं महत्त्वाचं असतं. खेळताना कानातले किंवा कोणतेही दागिने घालू नयेत; कारण त्यामुळे कानाला गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढतो.
 
अलका याग्निकला झालेला श्रवणदोष वेगळा, बालवयातच श्रवणदोषाची बाधा झालेल्या विरेंद्र सिंगचा श्रवणदोष वेगळा. कर्णदोषाने पीडित क्रीडाप्रेमींसाठी असलेला, बर्‍याच लोकांनी न ऐकलेला, न वाचलेला एक क्रीडाप्रकार ‘डेफलिम्पिस’ म्हणजेच, मूकबधिर खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. कर्णदोष असलेल्या खेळाडूंना जागतिक स्तरावर हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, ‘डेफलिम्पिस’ या जागतिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात १९२४ मध्ये पॅरिस येथे झाली. ‘डेफलिम्पिस’देखील दर चार वर्षांनी आयोजित केलं जातं. ‘खेळातून समानता’ हे त्याचे बोधवाय. अलीकडील २५वे समर डेफलिम्पिस दि. १५ नोव्हेंबर ते दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजीदरम्यान, टोकियोत झाले. या स्पर्धेत भारताने नऊ सुवर्णपदकांसह, एकूण २० पदके जिंकली. पुढच्या वर्षी म्हणजे२०२७ मध्ये हिवाळी डेफलिम्पिस ऑस्ट्रियातील इन्सब्रक येथे आणि २०२९ मध्ये उन्हाळी डेफलिम्पिस ग्रीसच्या अथेन्स येथे होणार आहेत.
 
दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला, कर्णबधिर खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार, २०२५’ प्रदान करण्यासाठीचे निकष तयार करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाचे निकष, दिव्यांग खेळाडूंच्या तुलनेत कर्णबधिर खेळाडूंसोबत भेदभाव करणारे होते. त्याला अनुसरून दि. २९ ऑगस्ट २०१६ रोजी, राष्ट्रपतीभवनात झालेल्या क्रीडा आणि साहसी पुरस्कार २०१६ सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते, कुस्तीपटू (कर्णबधिर) वीरेंद्र सिंगला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
 
‘डीजे’चा भारतीय इतिहास बघता असे आढळते की, १९०६ मध्ये पहिल्यांदा रेडिओवर रेकॉर्ड केलेले संगीत वाजवले जाई. नंतर १९३५ मध्ये, पत्रकार वाल्टर विंचेल यांनी प्रथमच ‘डिस्क जॉकी’ हा शब्द वापरला. ब्रिटनच्या जिमी सेव्हिल यांनी १९४७ मध्ये, एकाच वेळी दोन रेकॉर्ड्स वापरून गाण्यांमधील खंड थांबवण्याचे तंत्र शोधले. तेव्हापासूनचं ‘डीजे’चं प्रकरण भारतात लोकप्रिय झालं. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला ‘डीजे अकील’, ‘डीजे सुकेतू’ आणि ‘डीजे चेतस’ यांनी, जुनी हिंदी गाणी आधुनिक बीट्समध्ये रिमिस करून तरुणांना वेड लावले. गोव्यात सुरू झालेले ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आणि निकेल चिनपासारख्या कलाकारांनी, इलेट्रॉनिक डान्स म्युझिक भारतात घराघरांपर्यंत पोहोचवले. भारतात गणेशोत्सवासारखे सण आणि लग्न समारंभांमध्ये, मोठ्या साऊंड सिस्टमसह ‘डीजे’ अनिवार्य झाले.
 
आपल्याला होणारे कर्णदोष आपण टाळू शकत नसलो, तरी हे ‘डीजें’च्या आवाजांनी होणारे श्रवणदोष आपल्याला वाचवता येतील का?याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘डीजे’सारख्या अति मोठ्या आवाजामुळे होणारा कर्णदोष, आपण योग्य ती काळजी घेऊन नक्कीच टाळू शकतो. आवाजामुळे कानांच्या आतील पेशींवर होणारा परिणाम पूर्णपणे टाळता येतो. ही कानउघाडणी कोणी नेतेमंडळी करतील का? तसे न जमल्यास जनतेला जलतरणपटू कानात घालतात किंवा लांबच्या विमानप्रवासात देतात, तसले ‘इयरप्लग्जस्’ वगैरे तरी द्यावेत. अहो, घरीपण रेडिओवर आपल्या आवडीचं एखादं गाणं लागतं, तेव्हा कोणी चुकून त्याचा आवाज मोठा केला, तर घरची मोठी माणसं तो आवाज बारीक करायला भाग पाडतात. ‘अरे आवाज कमी कर; शेजारच्यांना त्रास होईल बरं का,’ असेही सुनावतात. बहुधा आता तशी कानउघाडणी होत नसावी, असं वाटू लागलंय मला...
 
 (लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
- श्रीपाद पेंडसे




संबंधित मजकूर