महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षकांनी अनेक वर्षे ‘केंटीश चिखल्या’ (Kentish Plover) ) म्हणून नोंदविलेला एक परिचित पाणथळ पक्षी प्रत्यक्षात स्वतंत्र प्रजातीचा ‘हनुमान चिखल्या’ (Hanuman Plover) असल्याचे नव्या वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अमरावतीतील प्रजनन नोंदींपासून ते दक्षिण भारतातील वितरणापर्यंतच्या निरीक्षणांच्या आधारे या पक्ष्याचा महाराष्ट्रातील संभाव्य विस्तार, ओळख, प्रजनन आणि संवर्धनाचे महत्त्व उलगडणारा हा लेख.
भारतात ‘केंटीश चिखल्या’ या पक्ष्याच्या दोन उपप्रजातींची नोंद झालेली आहे. त्यामध्ये ‘अॅनानिकस अलेक्झांड्रीनस अलेक्झांड्रीनस’ आणि ‘अॅनानिकस अलेक्झांड्रीनस सीबोहमी’ यांचा समावेश आहे. ’केंटीश चिखल्या’ युरोप, आशिया, तसेच उत्तर आफ्रिकेत सामान्यपणे आढळतो. त्यांपैकी ‘सीबोहमी’ ही उपप्रजाती श्रीलंका आणि दक्षिण भारतीय द्वीपकल्पात आढळते. आता या दोन्ही उपप्रजाती न राहता, वेगळ्या प्रजाती म्हणून मान्यता पावल्या आहेत.
दोन्ही उपप्रजाती वरकरणी सारख्याच वाटत असल्या, तरी त्याचा आणखी सखोल अभ्यास करून श्रीलंकेतील पक्षीशास्त्रज्ञांच्या पुढाकाराने २०२३ मध्ये ‘सीबोहमी’ या उपप्रजातीला ‘हनुमान चिखल्या’ या सामान्य नामकरणाने स्वतंत्र प्रजातीचा दर्जा देण्यात आला. तसा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित केला. त्यासाठी त्यांनी अनेक निसर्ग - इतिहास संग्रहालयातील पक्षीनमुन्यांचा अभ्यास केला. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यात याच प्रजातीची (तेव्हाची ‘सीबोहमी’) मी प्रजनन नोंद घेतली होती.
पक्षीशास्त्रज्ञांच्या मते ‘हनुमान चिखल्या’ ही प्रजाती केवळ श्रीलंका येथील रहिवासी असून त्या व्यतिरिक्त आग्नेय (दक्षिण-पूर्व) भारतात (तामिळनाडू इत्यादी) आढळते. भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा पौराणिक जमिनी दुवा असलेल्या ‘रामसेतू’ या प्राचीन पुलाच्या कथेवरून आणि प्रभू रामभक्त हनुमानावरून या पक्ष्याचे नाव प्रेरित आहे.
दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थानिक मानला जाणारा ‘हनुमान चिखल्या’ मोकळ्या पाणथळ जागा, चिखलाचे सपाट प्रदेश आणि किनारी अधिवासात राहतो. त्याच्या उत्कृष्ट छद्मवेशामुळे आणि पाणथळ प्रदेशांच्या खाड्यांजवळील मोकळ्या चिखलाच्या सपाट प्रदेशात बसण्याच्या सवयीमुळे तो अनेकदा लक्षात येत नाही. मला ‘हनुमान चिखल्या’च्या दोन कुटुंबांमध्ये चार पिल्ली आढळली. पिल्ले जन्मतःच स्वावलंबी असल्याने ती आई-वडिलांसोबत धावत होती आणि धोका वाटल्यास जमिनीवर निश्चल पडून राहात होती. त्यांच्या पिसांच्या मळकट रंगामुळे ती जवळजवळ अदृश्य झाली होती. या प्रजातींचे नर-मादी वेगळे ओळखता येतात. प्रौढ, प्रजननक्षम नर ‘हनुमान चिखल्या’च्या कपाळावर काळा पट्टा असतो, त्याच्या फिकट टोपीमध्ये तांबूस पिवळसर रंग मिसळलेला असतो आणि छातीवर गडद रंगाचे अपूर्ण ठिपके असतात. ‘केंटीश’मध्ये पूर्ण ठिपके असतात. ‘केंटीश चिखल्या’च्या विपरीत ‘हनुमान चिखल्या’च्या डोक्यावर प्रजननाच्या काळात तांबूस रंगाची टोपी नसते. ‘हनुमान चिखल्या’च्या छातीवरील ठिपके आणि कपाळावरील पट्टा प्रजननेतर काळात अधिक फिकट होतात. ‘हनुमान चिखल्या’च्या डोळ्यांच्या पुढील भाग पुढील भागही अपूर्ण असतो, जो प्रजननाच्या काळात अधिक गडद होतो. नर मादी दोघांचेही पाय गडद राखाडी रंगाचे असतात. ‘केंटीश’चे पाय मात्र काळे असतात.
दोन्ही प्रजातींच्या माद्या दिसायला सारख्याच असतात. परंतु, प्रजननाच्या काळात ‘हनुमान चिखल्या’च्या कपाळावरील पट्ट्यात, कानाच्या आवरणात, डोळ्यांच्या पुढील भागात आणि छातीवरील ठिपक्यांमध्ये उबदार रंगछटा नसते.
‘हनुमान चिखल्या’ची वीण भर उन्हाळ्यात होते. पाण्याची पातळी ओसरल्यामुळे उघड्या पडलेल्या चिखल प्रदेशात जमिनीवर त्याचे घरटे असते. घरटे म्हणजे, केवळ नावापुरते असून मातकट रेताड रंगाची ठिपके असलेली दोन ते तीन अंडी जमिनीवरच एखाद्या खळग्यात घातली जातात. खूप ऊन तापले की चिखल्या पक्षी पोटाची पिसे पाण्यात भिजवून आणतो आणि धावत येऊन अंड्यांवर बसतो, जेणेकरून अंड्यांचे तापमान वाढून आतली पिल्ले मरू नयेत. नर-मादी दोघे मिळून आळीपाळीने अंडी उबवतात आणि १५ ते १७ दिवसांत पिल्ले बाहेर निघतात. मोकाट गावठी कुत्री, साप, मुंगूस असे शिकारी प्राणी, गुरे अथवा मनुष्य घरट्याजवळ किंवा पिल्लांजवळ आली, तर त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोठे पक्षी पंख तुटल्याचे, जखमी झाल्याचे नाटक करतात. याला ’डिस्ट्रॅक्शन डिस्प्ले’ असे म्हणतात.
‘सीबोहमी’ उपप्रजातीच्या प्रजननाची नोंद २०१७ मध्ये कर्नाटकातूनही झाली होती. प्रजननाच्या ऐतिहासिक आणि अलीकडील नोंदी तामिळनाडूतील कडलोर, चेंगलपट्ट-चेन्नई, पॉईंट कॅलिमर, रामेश्वरम्, धनुष्कोडी, पिल्लईमादम, वलिनोक्कम आणि मन्नारच्या आखाताच्या आसपासच्या इतर ठिकाणांहून येतात. अलीकडेच, म्हणजे दि. २९ जुलै २०२४ रोजी मी रामसेतू परिसरात (जिल्हा रामेश्वरम्, तामिळनाडू) पक्षी सर्वेक्षणादरम्यान एकूण नऊ ‘हनुमान चिखल्या’ बघितले होते. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, ‘केंटीश चिखल्या’ची वीण उन्हाळ्यात (मार्च ते जुलैमध्ये) बलुचिस्तान, सिंध (पाकिस्तान) आणि गुजरातेत होते, असे डॉ. सालीम अली यांनी नोंदवून ठेवले आहे. तसेच ‘हनुमान चिखल्या’च्या श्रीलंका, दक्षिण भारतीय द्वीपकल्प आणि उत्तरेकडील विस्तारकक्षा अज्ञात आहेत, असे लिहून ठेवले होते. श्रीलंकेचे पक्षीतज्ज्ञ डॉ. संपथ सेनेविरत्ने मुंबईला आले असता, माझी त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा चर्चेत असे लक्षात आले की, ‘हनुमान चिखल्या’च्या योग्य नोंदी घेतल्या गेल्या, तर आपल्याला त्याची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष विस्तारकक्षा कळतील. विशेष म्हणजे, या दोन वेगळ्या केलेल्या प्रजाती केवळ विणीच्या हंगामात (उन्हाळ्यात) वेगळ्या ओळखता येतात. तसेच हिवाळ्यात दोन्ही प्रजाती एकाच ठिकाणी आढळू शकतात. म्हणून, केवळ उन्हाळ्यात घेतलेली त्यांची छायाचित्रे अभ्यासासाठी महत्त्वाची ठरतात. मला असे वाटते की, मध्य प्रदेशात प्रजननाच्या शक्यतांव्यतिरिक्त, ‘हनुमान चिखल्या’ हा दक्षिण भारतातील अनेक ठिकाणच्या पाणथळ जागांमध्ये प्रजनन करीत असावा. परंतु, त्याच्या वितरणाच्या नोंदी घेणे आवश्यक आहे. मला असे वाटते की, महाराष्ट्रासहित दक्षिण भारत (कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळम्) आणि मध्य प्रदेशात उन्हाळ्यात वीण करणारे सर्व ‘केंटीश चिखल्या’ हे ‘हनुमान चिखल्या’च असावेत. फक्त पश्चिम किनारपट्टीच्या भागात हिवाळ्यात दिसणार्या ‘केंटीश चिखल्या’चे फोटो मात्र काळजी घेऊन तपासायला हवेत. त्यामुळे उन्हाळ्यात महाराष्ट्रातील पक्षीमित्रांनी काढलेले बहुतेक फोटो ‘हनुमान चिखल्या’च असावेत. आपल्यासाठी हा पक्षी नवीन नसून, त्याचे ‘हनुमान चिखल्या’ हे नाव नवीन आहे.
-डॉ. राजू कसबे
(लेखक ज्येष्ठ पक्षीअभ्यासक आहेत.)
९००४९२४७३१