सुरेल समाजबंध

Dilip Apastamb
 
‘ऑईल अ‍ॅण्ड गॅस’ क्षेत्रातील जागतिक अनुभव, परदेशातील समृद्ध कारकीर्द आणि समाजासाठी झटणार्‍या दिलीप अपस्तंब यांच्याविषयी...
 
वृत्तीनंतर बहुतेक जण एक निवांत आयुष्य जगणे पसंत करतात. मात्र, पुण्यातील दिलीप अपस्तंब यांनी निवृत्तीलाच, एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यास योग्य मानले. जगातील ‘ऑईल अ‍ॅण्ड गॅस’ उद्योगात जवळपास चार दशके वरिष्ठ पदांवर काम करत, बहरीन, ओमान, दुबई अशा देशांमध्ये त्यांनी व्यावसायिक यश मिळवले. परंतु, त्या यशापेक्षाही त्यांनी जोडलेली माणसे लाखमोलाची. आज ते हजारो ज्येष्ठ नागरिक, विशेष मुलं, सैनिक, स्वनाथ आणि गरजूंच्या चेहर्‍यावर, गाण्याच्या माध्यमातून हसू फुलवत आहेत.
 
खरेतर दिलीप यांचा प्रवास आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसांशी नातं जोडलेल्या, एका संवेदनशील व्यक्तीचा आहे. ‘ऑईल अ‍ॅण्ड गॅस’ क्षेत्रातील त्यांच्या विशेष कौशल्यामुळे, त्यांना परदेशी काम करण्याची संधीही अनेकदा मिळाली. परंतु, परदेशातही त्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख जपण्याचं काम मनापासून केले.
 
दिलीप यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचा मोठा वाटा. लहानपणापासून संघ शाखेत शिकलेली शिस्त, संघभावना, निःस्वार्थ सेवा आणि नेतृत्वाचे संस्कार त्यांच्या सोबत कायम राहिले. परदेशात असतानाही त्यांनी, भारतीय समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न कायम केले. बहरीनमध्ये भारतीय आणि विशेषतः मराठी समाजाला एकत्र आणण्यासाठी, त्यांनी महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातूनही अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले. मस्कतमध्ये त्यांनी, तेथील संघ स्वयंसेवकांच्या मदतीने बौद्धिक वर्ग आणि नियमित भेटींचेही आयोजन केले. सार्वजनिक ठिकाणी ध्वज उभारणे शय नसल्यामुळे उद्यानांमध्ये कुटुंबासह बौद्धिक चर्चा, संस्कारवर्ग आणि सामाजिक संवादांचे आयोजन करण्यावरच त्यांचा भर असे. निवृत्तीनंतर पुण्यात सुरू केलेल्या ‘मेलोडियस ब्रीझ’ या संगीत समूहामागेही, हीच विचारधारा असल्याचे ते सांगतात. कोणत्याही लाभाची अभिलाषा न बाळगता, सुरु असलेले समाजसेवेचे कार्य, हे संघसंस्कारांचेच फलित असल्याचेही ते नम्रपणे मान्य करतात. परदेशात ते जवळपास १६ वर्षे राहिले. त्यावेळी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे कुटुंब मात्र पुण्यातच होते. मात्र, कालांतराने त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
 
२०१७ मध्ये पुण्यातल्या बालेवाडी येथे ‘आदित्य ब्रीझ पार्क सोसायटी’मध्ये, त्यांनी ‘मेलोडियस ब्रीझ’ या संगीत समूहाची स्थापना केली. सोसायटीतील संगीतप्रेमींना एकत्र आणून, ‘कराओके’च्या माध्यमातून हिंदी आणि मराठी गाण्यांचे कार्यक्रम यामार्फत सुरू झाले. सुरुवातीला याचा उद्देश निव्वळ विरंगुळा हाच होता. परंतु, पुढे त्याचे रूपांतर समाजसेवेच्या उपक्रमात झाले. आज ‘मेलोडियस ब्रीझ’ हा समाजकार्य करणारा एक सांस्कृतिक परिवारच झाला आहे.
 
गेल्या नऊ वर्षांत या समूहाने, २२४ हून अधिक संगीत कार्यक्रम केले आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या, कॅफे, विवाह समारंभ यांसोबतच ’निवारा’, ’मातोश्री’, ’मधुर भाव’ इत्यादि संस्था, पुण्यधाम वृद्धाश्रम, लष्करी रुग्णालये, येरवडा पुरुष व महिला कारागृह, सम्यक पुनर्वसन केंद्र, निवांत अंध मुक्त विकासालय, मानसिकदृष्ट्या विशेष मित्रांचे ‘नवक्षितिज’ निवासस्थान, ‘सात फाऊंडेशन’ अशा असंख्य संस्थांमध्ये त्यांनी विनामूल्य कार्यक्रम केले आहेत. ज्यांच्या आयुष्यात आनंदाची कमतरता आहे, त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवणे, हाच त्यांचा उद्देश आहे. सुरुवातीपासूनच कोणत्याही संस्थेकडून मानधन न घेण्याच्या नियमाचे त्यांनी, कसोशीने पालन केले. सांगलीतील एका संस्थानाने आग्रहाने दिलेले मानधनही त्यांनी, सैनिकांच्या रुग्णालयातील कार्यक्रमासाठी खर्च केले. आलेल्या देणग्याही त्यांनी, गरजू संस्थांकडे पोहोचवल्या.
 
‘कोरोना’ काळात तर त्यांनी स्टुडिओ भाड्याने घेऊन, सलग १४ फेसबुक लाईव्ह संगीताचे कार्यक्रमही वृद्धाश्रमांसाठी केले. त्याच्या लिंकदेखील विविध संस्थांना पाठवल्या जात. हे कार्यक्रम पाहताना, वृद्धांच्या चेहर्‍यावरचे समाधान त्यांना कृतार्थतेची अनुभूती दणारे ठरले. हिंगोलीत आत्महत्याग्रस्त शतकर्‍यांच्या मुलांसाठी काम करणार्‍या, ‘सात फाऊंडेशन’साठीही त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे मदतीचे आवाहन केले. त्यावेळीही, लोकांनी थेट संस्थेच्या खात्यात मदत जमा करून मोठा हातभार लावला होता. त्यांच्या आयुष्यातील सर्वांत हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे, अंथरुणाला खिळलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा फोन. ‘आताच या, आम्हाला तुमची गाणी ऐकायची आहेत,’ अशी त्यांची शेवटची इच्छा होती. दिलीप यांनी तत्काळ त्यांच्या घरी जाऊन, दीड तास जुनी गाणी सादर केली. काही दिवसांनी वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाने परदेशातून पाठवलेल्या ई-मेलमध्ये याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.
 
आजही दिलीप घरातील मिनी स्टुडिओमध्ये, विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कात गायन कलेचे शिक्षण देतात. दिलीप यांना वाटतं की, गेली नऊ वर्षे कोणताही मोबदला न घेता, त्यांचे ‘मेलोडियस ब्रीझ’चे सहकलाकार हीच त्यांची खरी संपत्ती आहे. डॉटर, प्राध्यापक, अभियंते, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध क्षेत्रांतील लोक एका समान ध्येयासाठी एकत्र आले असल्याचे ते सांगतात. ‘ऑईल अ‍ॅण्ड गॅस’ क्षेत्रातील जागतिक अनुभव, परदेशातील सांस्कृतिक नेतृत्व आणि निवृत्तीनंतर समाजासाठी सुरू केलेली संगीतसेवा या तिन्ही प्रवाहांना, दिलीप यांनी एका सुरेल धाग्यात गुंफले आहे. म्हणूनच आज दिलीप संगीताच्या माध्यमातून समाजात आशेचा सूर जिवंत ठेवणार्‍या, एका संवेदनशील माणसाचेप्रतीक झाले आहेत. त्यांच्या कार्यासाठी

दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना
मन:पूर्वक शुभेच्छा!




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर