धारावी पुनर्विकासात मिठी नदीचे पुनरुज्जीवन; ३.३ किमी सार्वजनिक रिव्हरफ्रंटसह ४० हजार झाडांचे संवर्धन

    03-Aug-2026
Dharavi Project
 
मुंबई : (Dharavi Project) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत (डीआरपी) मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाला केंद्रस्थानी ठेवत हरित आणि पर्यावरणपूरक विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. या योजनेत ३.३ किलोमीटर लांबीचा सार्वजनिक रिव्हरफ्रंट, ४० हजार झाडांचे संवर्धन, तसेच मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सुमारे दोन लाख भरपाईची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
 
धारावी पुनर्विकास आराखड्यानुसार मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासोबतच उद्याने, हरित मार्ग, पादचारी व सायकलस्वारांसाठी स्वतंत्र ग्रीन स्पाइन आणि सार्वजनिक खुल्या जागांचे जाळे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, शहरी उष्णतेचा परिणाम कमी करण्यास, जैवविविधतेला चालना मिळण्यास आणि नागरिकांना अधिक आरोग्यदायी सार्वजनिक जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. (Dharavi Project)
 
या प्रकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे माटुंगा कल्व्हर्टपासून मिठी नदीपर्यंत ३.३ किलोमीटरचा सार्वजनिक रिव्हरफ्रंट प्रोमेनेड. हा रिव्हरफ्रंट सर्व मुंबईकरांसाठी खुला असेल. येथे व्ह्यूइंग डेक, कॅफे, सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा तसेच नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणारी रचना विकसित केली जाणार आहे. नदीकाठावर स्थानिक प्रजातींची झाडे, प्रदूषण शोषून घेणारी वनस्पती, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पारगम्य पेव्हिंग आणि बायोस्वेल्स विकसित करण्यात येणार आहेत. (Dharavi Project)
 
प्रकल्पांतर्गत धारावी परिसरात टप्प्याटप्प्याने सुमारे ४० हजार झाडांचे पुनर्लागवड व संवर्धन केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या तुलनेत ही संख्या जवळपास पाचपट अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय एमएमआरमध्ये जवळपास दोन लाख भरपाईची झाडे लावली जाणार असून, त्यापैकी ३० हजार झाडांची लागवड पालघर जिल्ह्यातील चहाडे गावात आधीच पूर्ण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकूण ७५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (Dharavi Project)
 
झाडांच्या लागवड व पाच वर्षांच्या देखभालीसाठी पर्यावरणविषयक सल्लागार संस्था टेराकॉन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैज्ञानिक पद्धतीने लागवड, सिंचन, संरक्षण आणि झाडांच्या वाढीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या संस्थेकडे असेल. सहा महिन्यांनी झाडांच्या अस्तित्वाचा अहवालही सादर करण्यात येणार असून, याचा संपूर्ण खर्च अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) उचलणार आहे. (Dharavi Project)
 
अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मते, मिठी नदीचे पुनरुज्जीवन, मोठ्या प्रमाणातील वृक्षलागवड आणि परस्परांशी जोडलेली उद्याने व हरित मार्ग यांच्या माध्यमातून धारावी परिसराचा पर्यावरणीय समतोल सुधारण्यास मदत होईल. तसेच पुनर्विकासाबरोबरच नागरिकांना अधिक स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत शहरी वातावरण उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. (Dharavi Project)
 
 




संबंधित मजकूर