भारताचा चुकीचा नकाशा पाहताच संतापली लव्हलिना; ग्लासगोतील भारतीय रेस्टॉरंटला सुनावले

आक्षेपानंतर व्यवस्थापनाने मागितली माफी

    03-Aug-2026   
Indian Map Controversy
 
मुंबई : (Indian Map Controversy) कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणारी स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने ग्लासगो येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारताचा चुकीचा नकाशा प्रदर्शित केल्याबद्दल व्यवस्थापनाला जाब विचारला. भारतीय खेळाडूंच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभादरम्यान तिचे लक्ष नॅपकिनवर आणि रेस्टॉरंटबाहेर लावलेल्या भारताच्या नकाशाकडे गेले. त्यामध्ये ईशान्य भारत योग्य प्रकारे दाखविण्यात आला नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. यावर तिने तातडीने आक्षेप नोंदवत देशाचा नकाशा नेहमी अचूक आणि संपूर्ण स्वरूपातच प्रदर्शित केला गेला पाहिजे, असे स्पष्ट केले.
 
ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास रचला. भारताने बॉक्सिंगमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत अनेक पदकांची कमाई केली. आसामची लव्हलिना बोर्गोहेन हिने महिला ७५ किलो वजनी गटात दमदार खेळ करत रौप्यपदक जिंकले. अंतिम सामन्यात तिला ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-सू ग्रीनट्रीकडून १-४ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. सामन्यानंतर तिने सुवर्णपदक न जिंकता आल्याची खंत व्यक्त केली, मात्र भारतीय बॉक्सिंग संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान असल्याचे सांगितले. (Indian Map Controversy)
 
स्पर्धा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या सन्मानार्थ ग्लासगोमधील प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंट ‘मिस्टर सिंह्स इंडिया – द होम ऑफ करी’ येथे भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. याचवेळी रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या नॅपकिनवरील आणि बाहेर लावलेल्या भारताच्या नकाशावरून वाद निर्माण झाला. भोजनादरम्यान लव्हलिनाचे लक्ष नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशाकडे गेले. त्यात ईशान्य भारत योग्य प्रकारे दाखवलेला नसल्याचे तिने पाहिले. त्यानंतर तिने तातडीने व्यवस्थापनाकडे याबाबत आक्षेप नोंदवला. (Indian Map Controversy)
 
याबाबत लव्हलिना म्हणाली, "रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर छापलेल्या नकाशातून आमचा ईशान्य भारत गायब आहे. भारताचा प्रत्येक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वत्र भारताचा योग्य आणि संपूर्ण नकाशाच प्रदर्शित केला गेला पाहिजे. केवळ नॅपकिनवरच नव्हे, तर रेस्टॉरंटच्या बाहेर लावलेल्या नकाशातही हीच चूक आढळून आली. देशाचा कोणताही भाग नकाशातून वगळणे किंवा चुकीच्या पद्धतीने दाखविणे योग्य नसून भविष्यात अशी निष्काळजीपणा होऊ नये", असे तिने स्पष्ट केले. (Indian Map Controversy)
 
रेस्टॉरंटची माफी; पूरग्रस्तांना समर्पित केले रौप्यपदक
 
भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनीही या मुद्द्यावर लव्हलिनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, नकाशात केवळ ईशान्य भारतच नव्हे, तर जम्मू-काश्मीरचाही योग्य समावेश करण्यात आलेला नव्हता. अजय सिंह आणि लव्हलिना यांनी तत्काळ ही बाब रेस्टॉरंट व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर व्यवस्थापनाने चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आणि योग्य नकाशा असलेले नवीन नॅपकिन तयार करून वापरण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, लव्हलिनाने आपले रौप्यपदक आसाममधील पूरग्रस्तांना समर्पित केले आहे. ती म्हणाली की, स्पर्धेमुळे या कठीण काळात आपल्या राज्यातील नागरिकांसोबत राहता आले नाही, याची तिला खंत आहे. परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, अशी आशाही तिने व्यक्त केली. सध्या आसाममध्ये पुरामुळे सात जिल्हे प्रभावित झाले असून सुमारे १.७८ लाख नागरिक या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. या कठीण परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या सर्व पूरग्रस्तांना आपण हे पदक समर्पित करत असल्याचे लव्हलिनाने सांगितले. (Indian Map Controversy)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर