शिव्यांचा उत्सव आणि विवेकाचा शिमगा...

    03-Aug-2026
Democratic Protests
 
 
दिल्लीतील सीजेपीचे आंदोलन अनेक अंगाने चर्चेत आहे. यात महत्त्वाचे आणि धोकादायक म्हणजे आंदोलनातील तरुणांची भाषा. अभिव्यक्तीचा चुकीचा अर्थ लावून, भाषेचा नीचांकी स्तर या तरुणांनी गाठला. मतभेद हा लोकशाहीचा श्वास असला, तरी शिवी हा तिचा शब्दकोश होऊ शकत नाही, हा विवेक या तरुणांना सांगणे आवश्यक आहे...
 
जंतरमंतर’वर गेल्या महिनाभर सुरु असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले. आंदोलनांसाठीचा मार्ग गांधींनी सांगितलेला उपोषणाचा अर्थात अहिंसेचे होता, हे खरेच. पण, आंदोलनात शेवटच्या टप्प्यात पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुराचा मारा झाला. त्यात काही विद्यार्थी आणि पोलीसही जखमी झाले. यावरुन राजकारण सुरू झाले. अर्थात, राजकीय सत्तेत कोणीही असले, तरी असे राजकारण होतच राहते, संधी शोधल्या जातात. मात्र, हे लक्षात घ्यायला हवे की, यांसारख्या घटना राष्ट्र, समाज म्हणून निंदनीयच आहेत. मुळात, आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी अहिंसेची वाट असावी, इतकेच! हा अहिंसेच्या वाटेचा प्रवास हिंसेच्या मार्गाने पुढे जाईल असे वाटत असतानाच, तसे काही झाले नाही हे बरे झाले. कोणतेही आंदोलन ही अहिंसेच्याच मार्गाने झाले पाहिजे. हिंसेच्या मार्गाने फार तर बदल घडू शकतो, पण परिवर्तनाची शयता नसते.जेव्हा आंदोलनाचे यश म्हणजे परिवर्तन असते, तेव्हा त्याचे फलित दीर्घ काळ टिकणारेही असते.
 
मुळात, जेव्हा सामाजिक प्रश्नांवर आंदोलन घडते, तेव्हा ते कोणाच्याही विरोधात असले, तरी तेथे शत्रुत्वाची भावना असता कामा नये. सरकार नावाच्या व्यवस्थेने लोकभावनेचा आदर करणे, हे त्यांचे कर्तव्य असते. लोकशाही सरकारमध्ये बसलेली माणसं, याच लोकसमूहाने निवडून दिलेली असतात. त्यामुळे, संवादसेतू निर्मितीची गरज असते. त्यानंतर आंदोलन अहिंसेनेदेखील जिंकता येते, हा आपल्या देशाचा इतिहास. संवादासाठी भाषा हेच महत्त्वाचे साधन असून, याच वाटेने गेल्या ७५ वर्षांत विविध आंदोलने झाली. खरं तर कोणत्याही आंदोलनाचे यश म्हणजे मागण्या मान्य होणे किंवा कोणाचा तरी राजीनामा घेणे, एवढ्यापुरते मर्यादित नाही. हे यश-अपयश काळाच्या पटलावर मोजले जाते. आजच्या आंदोलनाचा परिणाम, भविष्यात समाज व अगदी नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनावर काय होतो? यावरूनच त्याचे मोजमाप होते. देशाला स्वातंत्र्य केवळ एका आंदोलनात मिळाले, असे झालेले नाही. त्यासाठी कधी अहिंसेची, तर कधी हिंसेची आंदोलने झाली. देशभरात उभ्या राहिलेल्या विविध ठिकाणच्या आंदोलनांतूनच, स्वातंत्र्याचे समर पेटले. ब्रिटिशांना घालवण्यासाठी १५० वर्षे जावी लागली. त्यामुळे आंदोलनाचे यश-अपयश लगेच मोजले जाणे अपेक्षित नसते, हे लक्षात घ्यायला हवे.
 
मुळात, आपल्या मागण्यांसाठी लोक पुढे येतात, आंदोलन करतात, सरकार संवादाची पाऊलवाट निर्माण करते, या गोष्टी लोकशाहीसाठी अधिक महत्त्वाच्या. त्यामुळे आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, अहिंसक आंदोलनच अधिक महत्त्वाचे. अशा आंदोलनांची दखल घेणे हे व्यवस्थेचे कर्तव्यच. आंदोलनातून कोणाचेही प्राण जाऊ नये, याची काळजीही घेतली जावी. त्याचदृष्टीने याच आंदोलनाच्या संदर्भाने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशही महत्त्वाचे ठरतात. त्यासाठीची संवेदनशीलता प्रत्येकाने जपलीच पाहिजे.
 
मात्र हे सारे घडत असताना, एक गोष्ट मात्र अधिक अधोरेखित झाली ती म्हणजे, आंदोलनादरम्यान काही ‘जेन-झीं’ची भाषा. त्यांच्या घसरलेल्या भाषेनेही आंदोलनाला गालबोट लागले. समाजमाध्यमांतून त्यावर काही प्रतिक्रिया उमटल्या. खरं तर भाषा हे संवादाचेच माध्यम. भाषेतून हदयं जुळतात. या आंदोलनातील तरुणाईची भाषा, अत्यंत हिंसात्मक होती. अशी भाषा सार्वजनिक व्यासपीठावर अथवा आंदोलनात वापरणे योग्य नाही, हे कोणीही सामान्य माणूस सांगेल. केवळ आंदोलन अहिंसक असून चालत नाहीत, तर भाषादेखील महत्त्वाची असते. अर्थात, सर्वच तरुणांची तशीच भाषा तशी नसली, तरी यानिमित्ताने आंदोलनादरम्यान ज्या स्वरूपाची भाषा ‘जेन-झी’नी वापरली, ती आपल्या भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीला शोभणारी नव्हती. ती भाषा हिंसात्मकच होती. या भाषेची नकारात्मकता अधिक चिंताजनक मानायला हवी. याचबरोबर गेली काही वर्षे समाजमाध्यमांवर होणारा भाषेचा उपयोग, त्यानिमित्ताने होणारी अभिव्यक्तीही चिंताजनकच म्हणायला हवी.
 
भारतीय राज्यघटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा आपल्याला हवा तसा उपयोग करता येत नाही. तसे केल्यास तो राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर ठरेल. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. मुळातच, जबाबदार नागरिक म्हणून अधिक संयम राखणे आणि व्यक्त होणे महत्त्वाचे असते. मात्र, समाजमाध्यमांवर एखादी ध्वनिचित्रफीत किंवा एखादा संदेश प्रसारित झाल्यानंतर, राजकीय पक्ष, त्यांचे कार्यरर्ते, माध्यमांची संकेतस्थळे, विविध स्वरूपांच्या समाजमाध्यमांवरचे लोक जशी प्रतिक्रिया देतात, त्यावरुन आपल्या भाषेचा स्तर किती खालावला आहे, ते समजते. आपण कोणत्याही विचारधारेचे असलात, तरी व्यक्त होताना सभ्यता राखता येणे, महत्त्वाचेच असते. विचारधारेतील भिन्नता हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे वेगळ्या विचारधारेतील माणसं, ही आपली शत्रू नसतात. ते वैचारिक मतभेद असतात, मनभेद नाही.
 
मात्र, अलीकडे समाजमाध्यमांवर व्यक्त होतानाचा भाषास्तर इतका खालावला आहे की, लोक समोरासमोर देखील इतया खालच्या स्तरावर बोलणार नाहीत. हा खालावणारा भाषेचा स्तर चिंताजनकच आहे. तरुणाईची ही भाषा म्हणजे, समाजातील मोठ्यांचे अनुकरण. शेवटी ‘महाजनो येन गतः स पन्थाः’ असेच म्हटले जाते. त्याप्रमाणे समाज ज्यांचे अनुकरण करतो, त्याच माणसांची भाषा खालवलेली दिसत आहे. राजकीय सभांमधील नेते, पुढारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांचीही भाषा कितीतरी खालावली आहे. कोणा एखाद्याने स्वतःची भाषा विकसित केली असेल, म्हणून प्रत्येकानेच ती भाषा वापरावी असे नाही. देशाच्या संसदेत एकेकाळी विरोधकांची भाषणे ऐकण्यासाठी, पंतप्रधान येऊन बसत. विरोधी पक्षांतील असले, तरी त्यांची भाषणे अधिक श्रवणीय असायची. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण ऐकण्यासाठी तर, पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः येऊन बसत. संघर्ष होता, पण तो विचारांचा होता. कोणाच्या निंदा-नालस्तीसाठी अभिव्यक्तीचा उपयोग होत नसे. त्याकाळी सभागृहात नाथ पै. जॉर्ज फर्नांडीस, मधु दंडवते अशा कितीतरी माणसांची भाषणे ऐकली जात. अनेकांची गाजलेली भाषणेदेखील विचार करण्यास प्रवृत्त करत.
 
अर्थात, त्याकाळी सभागृहात बोलणारी माणसंही विद्यापीठ होती. आज तीच वानवा सर्वत्र जाणवू लागली आहे. जनतेने भाषणे ऐकावी अशी माणसंच फारशी उरली नाहीत, हे वास्तव लक्षात घेतले तर ही तरुणाई का अशा बोलते, हे लक्षात येईल. अभ्यासपूर्ण भाषणाची वानवाच आज आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर अभिव्यक्त होताना, आंदोलनानिमित्तानेदेखील भाषेचा स्तर अधिकच घसरल्याचे समोर येत आहे. तरुणाईची भाषा अशीच पुढे जात राहणार असेल, तर चिंता करण्यासारखीच ही परिस्थिती आहे.
 
गेली काही वर्षे आपल्या समाजाची भाषा अधिक हिंसात्मक का होत आहे? भाषेचा उपयोग करताना मर्यादा का सोडल्या जात आहेत? भाषा हे संवादाचे माध्यम आहे. मात्र, तरीसुद्धा भाषेतून संवाद साधण्याऐवजी, केवळ शब्दांचा फापटपसारा केला का मांडला जातो. संवादाची भाषा अशीच खालावत जाणार असेल, तर आंदोलनेदेखील बदनाम होतील. त्यातूनच मार्ग चुकेल.
त्यामुळे आंदोलनाच्या यश-अपयशापेक्षा, आंदोलनानिमित्ताने होणारी भाषा अधिक चिंताजनक ठरत आहे. मुळातच, आपण कोणाच्या संदर्भाने बोलत आहोत, त्यांचे पद, प्रतिष्ठा, समाजासाठीचे योगदान, त्यांची पात्रता याचा विचार न करता, केले जाणारे आरोप-प्रत्यारोप पाहिले परिस्थिती किती खालावली आहे, याचा अंदाज येतो. त्यामुळे गांधीजी ज्या स्वरूपाच्या अहिंसेचा विचार प्रतिपादित करायचे, त्यात वाचिक अहिंसेचादेखील विचार होता. आपल्या बोलण्याने कोणाला तरी दुःख होईल, अशा प्रकारचा संवाददेखील हिंसाच. मुळात, यासारखा विचार करणारी माणसंच कमी होत आहेत. त्यामुळेच समाज भाषिक हिंसाचाराची वाट चालत आहे. ही वाट आज जरी बरी वाटत असली, तरी त्यातून उद्या आणखी कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. भाषिक हिंसेची वाट ही शारीरिक हिंसेपर्यंत पोहोचते हे ध्यान्यात घेलते, तर उद्याच्या संकटावर आजच उपाययोजना करता येईल.
 
त्यासाठी शब्दांचे सामर्थ्य आपण लक्षात घ्यायला हवे. देशातले झालेले आंदोलनही, सर्वोच्च न्यायालयाच्या एका शब्दाने उभे राहिले. तरुणाईचा ‘कॉक्रोच’ असा उल्लेख केला आणि पाहता पाहता समाजमाध्यमांवर त्याची प्रतिक्रिया उमटली. त्यातूनच ‘सीजेपी’ नावाचा गट स्थापन झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या देशातील तरुणाई लगेचच एकत्र आली आणि पाहता पाहता तरुणाई दिल्लीत उतरली. ही जशी समाजमाध्यामांची शक्ती आहे, त्याचप्रमाणे शब्दाचे सामर्थ्यही त्यातून दिसते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, तरुणाईच्या भाषेचा खालावत जाणारा स्तर, भविष्यात आंदोलनाची उंची हरवण्याचा धोका आहे.
 
- संदीप वाकचौरे




संबंधित मजकूर