‘यश’ असूनही अयशस्वी ठरलेला ‘टॉसिक’

    29-Aug-2026
Toxic Movie Review
 
 
कन्नड सुपरस्टार यशचा नवा चित्रपट ‘टॉसिक’ मोठा गाजावाजा करीत या आठवड्यात प्रदर्शित झाला. तब्बल ५०० कोटींचे बजेट असलेल्या ‘टॉसिक’ची गेल्या वर्षभरापासूनच चर्चा रंगली होती. तब्बल तीनवेळा या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलल्यानंतर अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘केजीएफ’नंतर तब्ब्ल चार वर्षांनंतर यशचा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनाही प्रचंड आशा-उत्सुकता होती. पण, प्रेक्षकांच्या पदरी प्रचंड निराशाच पडली असून, हा चित्रपट ‘फुसका बार’च म्हणावा लागेल. त्यामुळे ‘यश’ असूनही ‘टॉसिक’ मात्र अयशस्वीच ठरला आहे.
 
मेरी मदर टंग वायलेंस हैं रे...’ हा कन्नड सुपरस्टार यशचा एक संवाद संपूर्ण चित्रपटाचा सूर आणि वातावरण व्यक्त करण्यासाठी म्हणा पुरेसा आहे. पण, अडचण फक्त एवढीच की, हिंसेच्या या अतिशयोक्तीत भावना फार मागे पडल्या आहेत. आता, यशसारखा ‘रॉकिंग स्टार’, ‘स्टायलिश अ‍ॅशन’, ‘हाय-व्होल्टेज ड्रामा’, ‘हाय-टेक व्हीएफएस’ आणि तब्बल पाच नायिका असलेला चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’ ठरेल, अशी अपेक्षा होती. पण, जर तुम्ही यशचे चाहते असाल, तर यंदा तुमच्या पदरी निराशाच पडणार आहे. कारण, तुम्हाला ‘केजीएफ’मधल्या ‘रॉकी भाई’ची पण आठवण येणार नाही. ‘टॉसिक’ची कथा इतकी गुंतागुंतीची आहे की, तीन तासांहून अधिक वेळानंतर जेव्हा चित्रपट संपतो, तेव्हा एक प्रेक्षक म्हणून तुम्ही आपलं डोकं पकडूनच चित्रपटगृहातून बाहेर पडाल.
 
ही कथा गोव्याच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या जगातील सत्ता, कुटुंब आणि सूड यांभोवती फिरते. ‘फ्लॅशबॅक’च्या माध्यमातून, ही कथा राया (यश)च्या जगात डोकावते, ज्याच्यासाठी हिंसा हेच त्याचे सर्वांत शक्तिशाली शस्त्र. त्याची बहीण गंगा (नयनतारा), जिने त्याला लहानाचं मोठं केलं, ती त्याच्यासाठी सर्वस्व. साल्वाडोरच्या (डॅरेल डिसिल्वा)जवळ गेल्याने रायाचा गुन्हेगारीजगतातील प्रभाव वाढतो. साल्वाडोरची प्रेयसी (हुमा कुरेशी), त्याचा भाऊ (अक्षय ओबेरॉय) आणि मुलगी रेबेका (तारा सुतारिया) हेदेखील या कटात आणि सत्तासंघर्षात सामील आहेत.
 
साल्वाडोरला आपली गुन्हेगारी टोळी मजबूत करण्यासाठी रायाचे लग्न आपली मुलगी रेबेकाशी लावून द्यायचे असते. राया यासाठी तयार होतो. पण, जेव्हा रायाची भेट नादिया (कियारा अडवाणी) नावाच्या एका मनमोहक सर्कस कलाकाराशी होते, तेव्हा त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते. त्यांच्यात फुलणार्‍या उत्कट प्रेमाची एक मोठी किंमत रायाला मोजावी लागते, ज्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त होते. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला ‘टॉसिक’ बघावा लागेल.
 
हा चित्रपट तसा खूप भव्य आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजूही एकदम भक्कम आहे. या चित्रपटात साहसदृश्य, रक्तरंजितपणा, उत्कट प्रसंग, ग्लॅमरस नायिका असं जे जे आवश्यक ते सगळं आहे; फक्त कथा तेवढी हरवली आहे! दिग्दर्शकाला काय दाखवायचं होतं किंवा यशला कशा पद्धतीने सादर करायचं होतं, या संभ्रमात संपूर्ण चित्रपटाची वाट लागली आहे. चार वर्षांनंतर यशचं पुनरागमन होणार होतं; शिवाय सोबतीला गीतू मोहनदास ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शिकाही होती, नयनतारासारखी मोठी नायिका, कियारासारखी ग्लॅमरस, टॉपची नायिका, तसेच सध्याची समाजमाध्यमांवर सातत्याने चर्चेत असणारी रुमिणी वसंत, अशी तगडी मंडळी एकत्र आल्यामुळे प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या. पण, नेमकी कथाच गायब असल्यामुळे दिग्दर्शकाला प्रेक्षकांना नेमकं काय दाखवायचं होतं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
 
चित्रपटात बर्‍याच घटना अशा घडतात की, त्या अतिशय अतार्किक वाटतात. चित्रपटाचा संपूर्ण डोलारा त्याने आपल्या खांद्यावर उचलून धरला आहे. त्याची चालण्याची स्टाईल, डोळ्यांतील जरब, साहसदृश्यातील चपळता सगळं लाजवाब. यशचा ‘ऑरा’ चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न गीतू मोहनदासने केला आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाचं वलय हे फक्त आणि फक्त यशभोवतीच राहतं. संपूर्ण चित्रपटात जेव्हा यश मोठ्या पडद्यावर येतो, तेव्हा त्याने अक्षरशः मोठा पडदा व्यापून टाकतो. विशेषतः दुहेरी भूमिकेतील त्याने साधलेला समतोल जबरदस्त असाच. फक्त काही दृश्यांमध्ये यशमधील ‘रॉकी भाई’ डोकावत राहतो. चित्रपटात नयनतारासारखी एवढी मोठी अभिनेत्री असूनसुद्धा, दिग्दर्शकाला तिच्या अभिनयकौशल्याचा यथायोग्य वापर करता आलेला नाही. त्यामुळे मुळात नयनताराने हा चित्रपट का स्वीकारला असावा, इतपत प्रेक्षकांना प्रश्न पडावा, असा हा गोंधळ. नयनताराने चित्रपटात काय केलंय, तर यशच्या केवळ मागे-पुढे केलंय. कियारा अडवाणी ‘नादिया’च्या भूमिकेत ग्लॅमरस दिसली आहे. तिचे पात्र कथेला भावनिक आधारही देते; पण त्या पात्राला अजून वाव मिळायला हवा होता. हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांना पडद्यावर कमी वेळ मिळाला असला, तरी त्यांनी आपापल्या भूमिकांमधून छाप पाडली आहे. रुमिणी वसंत आणि संजीदा शेख यांनीही त्यांच्या छोट्या भूमिकांमध्ये प्रभाव पाडला आहे; पण स्त्री पात्रांच्या भूमिकांमध्ये खोलीचा अभाव जाणवतो.
 
त्याहूनही या चित्रपटाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे, भूतकाळ आणि वर्तमानकाळात हेलकावे खाणारी कथा समजून घ्यायला तुम्ही तयार होईपर्यंत, एक दुसरे थरारक अ‍ॅशन दृश्य धडकते. गोळ्या, रक्त आणि हिंसाचार इतके तीव्र आहेत की काही वेळाने त्याचा प्रभावही अगदी ओसरतो. ‘निमल’मध्येही प्रचंड हिंसाचार होता; पण त्यातील पिता-पुत्राच्या नात्यामुळे त्याला भावनिक वजन प्राप्त झाले होते. ‘टॉसिक’मध्येही बहीण, वडील, पत्नी आणि मुले यांसारखी अनेक नाती दाखवली आहेत; पण दुर्दैवाने यांपैकी एकही नाते मनाला स्पर्श करत नाही.
 
एक महिला दिग्दर्शक असूनही, गीतू मोहनदास यांनी मात्र यशच्या हिंसक, पुरुषी प्रतिमेचा पुरेपूर रायाच्या भूमिकेसाठी पुरेपूर वापर केलेला दिसतो. पण, गीतू यांनी त्यांच्या नायिकांना बहुतेकदा ‘शोपीस’ म्हणूनच मर्यादित ठेवलं आहे. जवळपास प्रत्येक स्त्रीपात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे रायापुढे शरण जाण्यास तयार असते. यशच्या चित्रपटांतील संवादांना सहसा शिट्ट्या मिळतात; पण इथे दमदार पंचलाईनऐवजी संवाद समाजमाध्यमांत फॉरवर्ड केलेल्या मेसेजसारखे वाटतात.
 
संगीतकार रवी बसूर यांचा मागचा ट्रॅकरेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ दोन’सह अनेक हिट गाणीही दिली. पण, या चित्रपटात मात्र त्यांनी प्रचंड अपेक्षाभंग केला, असेच खेदाने म्हणावे लागेल. चित्रपटातली गाणी प्रचंड कर्णकर्कश आहेत. फक्त ‘तबाही’ हे गाणं तेवढं चांगलं जमून आलं आहे. ते बघायला आणि ऐकायला तुलनेने छान वाटतं. चित्रपटाचं कॅमेरावर्क अप्रतिम. ‘व्हीएफएस’पण तगडे म्हणावे लागतील. चित्रपटातील ‘अ‍ॅशन सिक्वेन्स’ही जबरदस्त आहेत. ‘लार्जर दॅन लाईफ’ यश दाखवण्यात दिग्दर्शिका यशस्वी ठरली आहे. पण, एवढं सगळं असूनही चित्रपटाचा आत्मा म्हणजे त्याची कथाच गायब असल्यामुळे ‘टॉसिक’ तुमचा अपेक्षाभंग करतो. अतिआत्मविश्वास दाखवला, तर काय होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘टॉसिक!’
 
दिग्दर्शक गीतू मोहनदासला चित्रपटात नेमकं काय दाखवायचं होतं? यश चित्रपटात काय करतोय? अशा असंख्य प्रश्नांसह प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतो. कारण, या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळत नाही.
 
एकूणच काय, जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल, तर या चित्रपटाचा पर्याय निवडा. पण, एक चित्रपटप्रेमी म्हणून हा सिनेमा तुमचा अपेक्षाभंग करणारा ठरु शकतो.
 
निर्माता : केव्हीएन प्रॉडशन, यश
दिग्दर्शक : गीतू मोहनदास
कलाकार : यश, नयनतारा, रुमिणी वसंत, अक्षय ओबेरॉय, कियारा आडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया
रेटिंग :
 
-कपिल  देशपांडे 




संबंधित मजकूर