रिंग मेट्रोचा मार्ग बदलणे आता कठीण; महामेट्रोचे स्पष्टीकरण

"वेक अप ठाणेकर" च्या पत्राची पीएमओकडून दखल.

    29-Aug-2026
Wake Up Thane 
 
मुंबई : (Thane Ring Metro) ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोच्या मार्गाबाबत ठाणेकरांच्या चिंता मांडणाऱ्या ‘वेक अप ठाणेकर’च्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दखल घेतली असून, हे निवेदन संबंधित प्राधिकरणांकडे पाठविण्यात आले आहे. त्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच ‘वेक अप ठाणेकर’च्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन नागरिकांच्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा केली. त्यामुळे रिंग मेट्रोच्या मार्गाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता तांत्रिक आणि अधिकृत बाजू मिळाली आहे.
 
पीएमओकडे धाव; प्रकरण संबंधित यंत्रणांकडे
 
रिंग मेट्रोच्या मार्गामुळे पर्यावरण, वाहतूक, बांधकामादरम्यान होणारा त्रास, स्थानकांची उपयुक्तता आणि शेवटच्या टप्प्यातील प्रवासाची जोडणी यासह विविध मुद्दे उपस्थित करत ‘वेक अप ठाणेकर’ ने थेट पीएमओकडे लेखी निवेदन केले होते.या निवेदनाची दखल घेत पीएमओने ते संबंधित प्राधिकरणांकडे पाठवले. त्यानंतर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी झालेली बैठक हा या संपूर्ण पाठपुराव्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. (Thane Ring Metro)
 
संपूर्ण मार्ग बदलणे आता कठीण
 
बैठकीत ‘वेक अप ठाणेकर’ने महामेट्रोसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठेवला—मंजूर झालेल्या रिंग मेट्रोचा संपूर्ण मार्ग बदलता किंवा पुनरेखित करता येईल का? (Thane Ring Metro)
 
यावर महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले की, सध्याच्या टप्प्यावर संपूर्ण मंजूर मार्गाचे मोठ्या प्रमाणावर पुनरेखन करणे हा व्यवहार्य पर्याय नाही. मात्र एखाद्या विशिष्ट तांत्रिक किंवा जागेशी संबंधित अडचणीमुळे आवश्यकता भासल्यास एखाद्या स्थानकाच्या ठिकाणात मर्यादित बदल तपासला जाऊ शकतो. (Thane Ring Metro)
 
यामागे प्रकल्पाचा सध्याचा टप्पा महत्त्वाचा आहे. सुमारे १२ हजार २०० कोटी रुपयांचा, २९ किलोमीटर लांबीचा आणि २२ स्थानकांचा हा प्रकल्प असून, त्याला केंद्र व राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे. केंद्र, राज्य सरकार आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करारही झाला आहे. सर्वेक्षण, तांत्रिक तपासण्या, आराखडे आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पुढे गेल्याने आता मार्गात मोठा बदल करणे म्हणजे अनेक निर्णय आणि प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासारखे ठरणार आहे. (Thane Ring Metro)
  
ठाणेकरांच्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरूच ठेवणार
 
संपूर्ण मार्गाचे पुनरेखन सध्याच्या टप्प्यावर कठीण असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी त्यामुळे था ठाणेकरांनी गप्प बसण्याचे कारण नाही. उलट आता पर्यावरणीय परिणाम, बांधकामातील त्रास, वाहतूक व्यवस्थापन, स्थानकांची उपयुक्तता, शेवटच्या टप्प्यातील प्रवासाची जोडणी आणि सार्वजनिक निधीच्या तुलनेत प्रकल्पाचा फायदा या मुद्द्यांवर अधिक ठोस पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे ‘वेक अप ठाणेकर’चे म्हणणे आहे. (Thane Ring Metro)
 
रिंग मेट्रो हा ठाण्याच्या पुढील अनेक दशकांच्या वाहतुकीवर परिणाम करणारा मोठा सार्वजनिक प्रकल्प आहे. त्यामुळे विकासाला विरोध न करता पारदर्शक, पर्यावरणपूरक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री विकासाची मागणी करण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार असल्याचं वेकअप ठाणेकर ने स्पष्ट केलं आहे. (Thane Ring Metro)
 
प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट झाली
 
“पीएमओच्या निर्देशानंतर महामेट्रोसोबत झालेल्या चर्चेत रिंग मेट्रोच्या सध्याच्या स्थितीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. मंजूर मार्गात मोठा बदल होण्याची शक्यता नसली, तरी ठाणेकरांच्या हितासाठी प्रकल्प अधिक उपयुक्त आणि परिणामकारक करण्याच्या मुद्द्यांवर आमचा पाठपुरावा सुरूच राहील. संघर्ष थांबलेला नाही; आता पुढची दिशा अधिक वास्तववादी आणि परिणामकारक असेल.” - दयानंद नेने, ‘वेक अप ठाणेकर’ 
(Thane Ring Metro) 
 
 




संबंधित मजकूर