चाकोरीबाह्य विषय हाताळणारा मराठी सिनेमा सातासमुद्रापार गेल्याचा आनंद : सतीश पुळेकर

    29-Aug-2026
satish parulekar
 
 
‘द्विधा’ या वडील आणि मुलीच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारा हृदयस्पर्शी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सतीश पुळेकर आणि मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून, पुळेकर वेगळ्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहेत. याचनिमित्ताने सतीश पुळेकर यांच्याशी विविध विषयांवर रंगलेल्या गप्पांमध्ये चाकोरीबाह्य विषय हाताळणारा मराठी सिनेमा सातासमुद्रापार जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तेव्हा सतीश पुळेकर यांच्याशी साधलेल्या संवादातील हा संपादित अंश...
 
‘द्विधा’ ही वडील आणि मुलीच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारी हृदयस्पर्शी गोष्ट आहे. तेव्हा, या चित्रपटाचा प्रवास नेमका कसा सुरु झाला?
 
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिग्दर्शक निलेश नाईक यांना मी ओळखत नव्हतो. एक दिवस अनिकेत दुभाषी आणि भूषण कडू यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलं "सध्या तुम्ही काय करताय, आपण भेटू शकतो का? आम्हाला जरा तुमचे एका चित्रपटासाठी फोटो हवे होते.” मी आपले तेव्हा दाढी वगैरे वाढलेले फोटो दिले पाठवून. नंतर एक दिवस फोन आला, "सर, तुम्ही घरी आहात का?” आणि चक्क निलेश नाईक दहिसरवरून थेट माझ्या घरी आले. हा चमत्कार फक्त स्वामीच करू शकतात. नंतर चित्रपटाची कथा त्यांनी ऐकवली आणि मी हा चित्रपट करत असल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपटाचा विषय मला खूप आवडला. मानसी या चित्रपटात माझ्या मुलीची भूमिका करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मग मालाडला आमचं काही फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झाले. अशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला.
 
मानसी ही एक उत्तम अभिनेत्री. तिच्यासोबत सहकलाकार म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता?

मानसीसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम आहे. माझी आणि मानसीची आधी ओळख नव्हती. निलेश नाईकांच्या कार्यालयात आम्ही पहिल्यादांच भेटलो. मानसीने जी भूमिका यात केली आहे, तिचा स्वभाव अगदी याउलट आहे. पण, तिने खूप गंभीरपणे या भूमिकेत रंग भरले. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने ती बघायची. आमचे अनेक प्रसंग यामुळे खूपच सुंदर झाले. जेव्हा समोरचा कलाकारपण त्याच ताकदीचा असेल, तेव्हा काम करायला अजून हुरूप येतो.

निलेश नाईकांना एडिटिंग आणि जाहिरात क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे, तर अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
 
उत्तम! तुम्ही ट्रेलर बघितला, तर लक्षात येईल की, निलेश नाईक काय ताकदीचे दिग्दर्शक आहेत. मी उगाच कौतुक करायचं म्हणून करत नाही; पण खरंच निलेश यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. प्रत्येक गोष्ट, प्रसंग त्यांनी अगदी उत्तमपणे समजावून सांगितला. अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकाची आपल्याला गरज आहे.
 
आमच्यासाठी तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघणं पर्वणीच असते. ‘तुला पाहता’ आणि आता ‘द्विधा’ असे आपले दोन चित्रपट यंदा प्रदर्शित झाले. तर या टप्प्यावरती दोन वेगळे विषय दोन वेगळे चित्रपट, पण अभिनेता एकच, सतीश पुळेकर! कसं वाटतंय?
 
एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी ही उत्तम गोष्ट आहे. आता माझं वय ७६ असून या वयातही निर्मात्यांना मी आठवतो, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मी आधी खूप चित्रपट केले, अशातला भाग नाही. माझा स्वभाव शिस्तबद्ध आहे; काही कडक वगैरे नाही. मला शिस्तबद्ध माणसं प्रचंड आवडतात. पण, माझ्या या स्वभावाचा अपप्रचार केल्यामुळे मला कमी कामं मिळाली. एक अख्खी पिढी माझ्या हाताखाली तयार झाली. मी त्यांच्यावर रागवायचो, चिडायचो, एवढंच त्यांनी डोयात ठेवलं. पण, त्यामागची भावना त्यांनी समजून घेतली नाही. आज त्यांच्यापैकी कोणीच मला विचारत नाही, याच वाईट वाटतं.
 
दुसरी एक गोष्ट, कोणाला समजा मी नट म्हणून हवा असेन आणि त्यांनी कुणाला माझा नंबर मागितला, तर "सतीशला घेताय? मस्त मस्त. पण बघा हं...’ असं उत्तर त्यांना मिळायचं. ‘बघा हं...’ म्हटलं म्हणजे चित्रपट हातातून गेला! मी असं खूप भोगलंय. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे दोनच ‘हिरो’ मी तरुण असताना होते. त्यावेळेला त्यांनी सोडलेले चित्रपट माझ्या वाटेला यायचे.
 
तुमच्या बायकोचा तुमच्या यशात मोठा वाटा आहे?
 
हो, हे खरं आहे. माझी बायको श्रद्धाने खूप सहन केलं. आमच्या लग्नाला ५२वं वर्ष चालू आहे. मला या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी तिने खूप तपश्चर्या केली होती. मला या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी तिने मला मुभा दिली; स्वतः नोकरी करत माझ्या संघर्षाच्या काळात माझी ढाल बनून उभी राहिली. आई-वडील, काका-काकी, मोठा भाऊ-बहीण हे सगळे होतेच, पण नंतरची ही ५२ वर्षे ज्या पद्धतीने तिने माझं ‘फ्रस्ट्रेशन’, माझं ‘डिप्रेशन’, माझे होणारे अपमान, मला हाकलून देणं, माझ्याकडून स्क्रिप्ट काढून घेणं, अशा असंख्य प्रसंगी ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. नंतर ज्या पिढीला मी तयार केलं, त्यांनीही विचारलं नाही, तेव्हा तिने दिलेली साथ शब्दांत व्यक्त होणार नाही. ती नेहमी म्हणते, "तू उत्तम कलाकार आहेस, यश तुझ्यामागे येणारच.” तेव्हा मला जाणवायचं, मी काही टाकाऊ अभिनेता नाही; माझ्यात पण काहीतरी खास आहे.
 
तुम्ही शिस्तप्रिय आहात, पण रागीट नाही. तरीही तुमच्याबाबत हा अपप्रचार का केला गेला?
 
माझ्यावर हे एक शिक्कामोर्तबच झालं होतं. मी खूप भोगलंय. मला बर्‍याच प्रोजेटमधून न सांगता थेट काढून टाकण्यात आलं. मीपण कधी कोणाला विचारायला नाही गेलो की मला का काढलं? वाईट वाटायचं या गोष्टींचं; पण रडत बसणार्‍यांतला मी नाही. बायकोची साथ याप्रसंगी असायची. मला कधी कुठल्या पुरस्कार सोहळ्याला बोलावत नाहीत. मला जर कुठल्या गोष्टीसाठी नामांकन असेल तर बोलावतात; अन्यथा मला कोणी विचारत नाही. मला बर्‍याचदा पुरस्कार सोहळा दूरचित्रवाणीवर सुरू असताना बायको विचारते, "काय रे, तू कुठे दिसत नाहीस?” तेव्हा मी तिला स्पष्ट सांगतो, "मला बोलावतच नाहीत, तर मी का जाऊ?” मला नेहमी असं वाटतं की, इंड्रस्टीतील एका गटाने नेहमीच माझे पाय खेचण्याचा, मागून माझ्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला. मी कोणत्या ग्रुपचा भाग नाही. पण, एवढं सगळं असूनसुद्धा ५० वर्षांपासून मी पाय रोवून उभा आहे. माझ्यापरीने काम करण्याचा प्रयत्न करतोय. एक खूप चांगलं नाटक व्यावसायिक नाटक मी करत होतो. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं व्यावसायिक नाटक असणार होतं. नाटकाच्या तालमी झाल्या; सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि एक दिवस अचानक फोन आला की, "सतीश, तुला नाटकातून काढून टाकण्यात आलंय.” असं सगळं माझ्या बाबतीत घडलंय.
 
५० वर्षांपासून तुम्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहात. तेव्हा, मागे वळून बघितलं, तर तेव्हाचा चित्रपट आणि आताचा चित्रपट यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
 
तांत्रिकदृष्ट्या खूप बदल झाला आहे. आधी रिळं असायची, आता सगळं डिजिटल झालंय. तंत्रज्ञान खूप विकसित होत चाललंय. मार्केटिंगचे जाळे विस्तारत चालले आहे. शिवाय, आपला सिनेमाही आता श्रीमंत होत आहे. वेगवेगळे प्रयोग होत आहेत. उत्तम कलाकार, दिग्दर्शकांची नव्या दमाची फळी तयार झाली असून चाकोरीबाह्य विषय आपण हाताळत आहोत. नुकताच प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ने १०० कोटींचा पल्ला गाठला. १०० कोटींची कमाई करणारा तो पहिला चित्रपट ठरला. त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन! आपला मराठी चित्रपट आता सातासमुद्रापार जातोय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
 
(मुलाखत : कपिल देशपांडे)




संबंधित मजकूर