‘रक्षाबंधन’ नव्हे मतलालसा!

    29-Aug-2026   
Akhilesh Yadav Raksha Bandhan
 
 
निवडणुका जवळ आल्या की, लोकशाहीचा मूळ गाभा बाजूला राहून ‘आश्वासनांची खैरात’ आणि ‘मतपेढीचे राजकारण’ यांचा उघडउघड खेळ सुरू होतो. सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा एक व्हिडिओ या तंत्राचाच एक भाग. रक्षाबंधनाचे पवित्र निमित्त साधून महिलांना लिफाफ्यातून रोखरकमेचे वाटप करणे आणि त्याद्वारे राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे भारतीय राजकारणातील एका चिंतातुर प्रवृत्तीकडे लक्ष वेधते. व्हिडिओ पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येईल की, ज्या महिला राखी बांधताहेत अशांना हे पैशांनी भरलेले लिफाफे अखिलेश यादव सरसकट देत आहेत. मात्र, ज्या महिलांनी फक्त पैसे मिळताहेत म्हणून हजेरी लावलीय, त्यांनादेखील अखिलेश पैसे देताना यामध्ये दिसले. उलट, त्यांना तर दोन-दोन लिफाफे दिले जाताहेत.
 
‘रक्षाबंधन’ हा बहीण-भावाच्या नात्यातील पवित्रता आणि संरक्षणाचे वचन देणारा हिंदू सण. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक आणि सांस्कृतिक सणाचा थेट राजकीय लाभ लाटण्यासाठी वापर केला जात असल्याचे चित्र या व्हिडिओवरून स्पष्ट होते. हिंदू सणांचे पावित्र्य जपण्याऐवजी, त्याचा वापर करून विशिष्ट मतदारांना खूश करणे आणि व्होटबँक पक्की करणे हा निव्वळ स्वार्थी राजकीय दृष्टिकोन. यापूर्वी, अखिलेश यादव यांनी, "सत्ता आल्यास प्रत्येक महिलेला वर्षाला तब्बल ४० हजार रुपये दिले जातील,” असे आश्वासन दिल्याचे पाहायला मिळाले होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि महसुलाचा विचार न करता अशाप्रकारच्या अवास्तव घोषणा करणे, हा लोकानुनयाचा सोपा मार्ग झाला आहे. महिलांना खर्‍या अर्थाने सक्षम करायचे असेल; तर रोजगार, शिक्षण आणि सुरक्षेच्या संधी देणे गरजेचे. सत्ता असताना ज्या गोष्टींचा कधी विचार झाला नाही, त्या गोष्टी अचानक निवडणुका तोंडावर आल्यावरच कशा आठवतात? निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असणार्‍या राजकीय नेत्यांनी आता धार्मिक भावना आणि सणांचे औचित्यही आपल्या प्रचाराचे माध्यम बनवले आहे. रक्षाबंधनासारख्या सणाचा राजकीय आखाड्यात असा वापर करून महिला मतपेढीला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न लोकशाहीसाठी नक्कीच चिंताजनक म्हणावा लागेल.
 
वैचारिक अस्वस्थतेचा पंचनामा
 
राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अविरतपणे काम करणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिले जाते; पण दुर्दैवाने काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना संघाच्या वाढत्या प्रभावाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच संघावर निष्फळ टीका करत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा आणि संघाच्या नोंदणीवरून हास्यास्पद आव्हाने देण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. म्हणे, "संघाने आपली नोंदणी करून घ्यावी, नोंदणी शुल्क मी भरतो,” अशी भाषा वापरून खर्गे यांनी स्वतःच्या विचारसरणीचा आकस आणि संघद्वेष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला.
 
मग नोंदणी नसलेल्या संस्थेशी जोडली जाणारी ‘जेन-झी’ काय मूर्ख आहे? तर मुळीच नाही! आजची ‘जेन-झी’ सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे. खुद्द सरसंघचालकांनीसुद्धा ‘जेन-झीं’चे भरभरून कौतुक केले होते. संघाला कोणत्याही कागदी नोंदणीची किंवा शासकीय शिक्क्याची गरज पडली नाही. कारण, संघाची नोंदणी ही लाखो भारतीयांच्या हृदयात झाली आहे. नैसर्गिक आपत्ती असो, ‘कोरोना’चा काळ असो किंवा सीमाभागातील सुरक्षा असो; कोणतीही प्रसिद्धी न मिळवता सर्वप्रथम मदतीला धावून जाणारा स्वयंसेवक तरुणवर्गाने जवळून पाहिला आहे. आजची डिजिटल, आधुनिक आणि तार्किक विचार करणारी तरुणाई जर संघाकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत असेल; तर याचा अर्थ एकच, काँग्रेसचा आणि प्रियांक खर्गेंचा संघविरोधी खोटा प्रचार तरुणाईने पूर्णपणे नाकारला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी संघावर चिखलफेक करणे सोपे आहे; पण राष्ट्रनिर्माणाचा आणि शिस्तीचा जो विचार संघाने रुजवला, त्याला छेद देणे अशय आहे. संघ हा ‘अनुशासन’ आणि ‘स्वयंस्फूर्ती’ या तत्त्वांवर चालतो. कोणतीही नोंदणी नसतानाही गेली १०० वर्षे एकही आर्थिक घोटाळा किंवा अराजकता न माजवता ही संघटना अविरतपणे कशी चालते, यावर विरोधकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. संघ केवळ शाखांपुरता मर्यादित नसून, ‘सेवा भारती’च्या माध्यमातून देशातील दुर्गम, आदिवासी आणि उपेक्षित भागात हजारो सेवाप्रकल्प चालवतो. या सेवाकार्याला कोणत्याही नोंदणी प्रमाणपत्राची गरज नसते.
 
खर्गेंचा हा आक्रमक संघद्वेष म्हणजे केवळ त्यांच्या राजकीय अस्वस्थतेचे लक्षण आहे.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर