संघसंस्कारांनी घडलेले ग्रामविकासाचे शिल्पकार

    29-Aug-2026
Rajaram Gangaram Ghag
 
राष्ट्रभक्ती, संघटनकौशल्य, शिक्षणाची तळमळ आणि निरपेक्ष समाजसेवा यांचा सुंदर संगम म्हणजे कै. राजाराम गंगाराम घाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांत घडलेले हे स्वयंसेवक आयुष्यभर गावाच्या विकासासाठी झटले. त्यांनी शिक्षण, सहकार, संस्कृती आणि सार्वजनिक जीवनात उभारलेले कार्य आजही प्रेरणादायी ठरते.
 
राजाराम घाग हे प्रेमजीभाई आसर यांचे एकनिष्ठ शिष्य होते. त्यांच्या विचारधारेतून त्यांनी समाजकारणाची प्रेरणा आणि सार्वजनिक जीवनाचे बालबोध धडे घेतले. बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. घरची आर्थिक अवस्था बिकट असल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करणेही कठीण होते. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी नियमित येत असत. संघाच्या कार्यकर्त्यांच्या सहवासातून त्यांना आत्मविश्वास, शिस्त आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळाली. या संघसंस्कारांच्या बळावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि पुढील जीवनाची वाटचाल सुरू केली.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांचा परिचय तात्यासाहेब नातूंशी झाला आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. दहिवली आणि परिसरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी चार ते पाच किलोमीटर पायी जावे लागत असल्याची वेदना त्यांनी जवळून अनुभवली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी १९६८ मध्ये दहिवली येथे माध्यमिक शाळेची स्थापना करण्याचा निर्धार केला. या निर्धारातून 'रत्नसागर इंग्रजी माध्यमिक शाळे'ची स्थापना झाली. या शाळेने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. अनेक विद्यार्थी उत्तम गुणवत्तेने शिक्षण पूर्ण करून विविध शासकीय आणि खाजगी क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत झाले.
 
राजाराम घाग यांनी केवळ शिक्षणापुरते कार्य मर्यादित ठेवले नाही. त्यांनी संपूर्ण गावाचे संघटन केले आणि ग्रामस्थांच्या विश्वासामुळे दीर्घकाळ सरपंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. सरपंच म्हणून त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. विशेषतः 'श्रीकृष्ण दूध संस्था' स्थापन करून परिसरातील शेतकऱ्यांना दुधाचा योग्य मोबदला मिळवून दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळाले. गावातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळावी यासाठी त्यांनी मोठे सांस्कृतिक सभागृह उभारले. त्यामुळे शिक्षण, संस्कृती आणि समाजजीवन यांचा सुंदर मेळ घालणारा विकासाचा आदर्श त्यांनी उभा केला.
 
गावपातळीपासून तालुका आणि जिल्हास्तरापर्यंत त्यांनी सार्वजनिक जीवनात सातत्याने काम केले. स्वच्छ, निर्लेप आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन भारतीय जनसंघाने चिपळूण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांचे सहकारी सदानंद मोहिते हे त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ होते. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आणि लोकशाहीवरील निर्बंधांच्या विरोधात अनेक स्वयंसेवकांनी भूमिगत राहून काम केले. राजाराम घाग यांनीही सदानंद मोहिते यांच्या सहकार्याने भूमिगत राहून संघटन आणि जनजागरणाचे कार्य केले. हा काळ त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचा आणि धैर्याचा महत्त्वपूर्ण अध्याय ठरला.
 
राजाराम घाग करत असलेल्या संघकार्यामागे त्यांच्या पत्नी सरिता घाग यांचा त्यांना खंबीर पाठींबा होता. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि रत्नसागर शिक्षण संस्थेच्या कारभारातही सक्रिय सहभाग घेतला. राजाराम यांना दोन मुलं - वीरेंद्र आणि होमकिरण, तसेच दोन मुली - हेमलता आणि सुप्रिया.
 
दि. ५ जानेवारी १९९७ रोजी अल्पशा आजाराने राजाराम गंगाराम घाग यांचे निधन झाले. परंतु त्यांनी उभारलेल्या शिक्षणसंस्था, सहकारी चळवळ, ग्रामविकासाची परंपरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेले त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरते. त्यांचे जीवन हे एका संघ स्वयंसेवकाने शाखेतील संस्कारांच्या बळावर आपल्या गावाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास कसा साधावा, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. राष्ट्रप्रेम, संघटन, शिक्षण आणि सेवा या चार मूल्यांवर उभे राहिलेले त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ राहील.




संबंधित मजकूर