मुंबई : (Rahul Gandhi Fact Check) काँग्रेसचे युवराज आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जून ते ऑगस्ट यादरम्यान कोटा, देहरादून, प्रयागराज, पुणे अशा चार ठिकाणी ‘छात्रो की गूंज’च्या नावाखाली तरुणांची गर्दी जमवून देशातील शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे, महिला सुरक्षेसंबंधी प्रश्न मांडणारे कार्यक्रम आयोजित केले होते. परंतु, या चारही कार्यक्रमांमध्ये राहुल गांधींनी केलेल्या एकूण 40 दाव्यांतून तरुणाईची दिशाभूल करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राहुल गांधींच्या या चार सभांमधील 73 टक्के दावे असत्य, तर 27 टक्के दावे हे दिशाभूल करणारे असल्याचे ‘झूठ की गूंज’ या संकेतस्थळाने केलेल्या तथ्यतपासणीत समोर आले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आजपासून पुढील तीन दिवस, राहुल गांधींच्या कार्यक्रमातील दाव्यांची पोलखोल चार भागांत मांडणार आहोत. (Rahul Gandhi Fact Check)
राहुल गांधींनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना देशातील 80 टक्के महिलांना छळाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला. पण, मुळात या दाव्याचा आधार 2016 मधील एका खासगी संस्थेचे सर्वेक्षण असल्याचे तथ्यतपासणीत नमूद करण्यात आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमधील केवळ 502 महिलांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणात, 79 टक्के महिलांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा छळ सहन केल्याचे म्हटले होते. मात्र, हे सर्वेक्षण राष्ट्रीय स्वरूपाचे नव्हते. तरीही या मर्यादित आकडेवारीला ‘देशातील महिलांची सार्वत्रिक परिस्थिती’ असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. (Rahul Gandhi Fact Check)
राहुल गांधींच्या दाव्याची ‘झूठ की गूंज’ या संकेतस्थळाने आकडेवारीच्या मदतीनेच हवा काढली आहे. 2025 मध्ये देशातील 31 शहरांमधील जवळपास 12 हजार 770 महिलांचा समावेश असलेल्या सर्वेक्षणात, जवळपास 40 टक्के महिलांनीच त्यांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. राहुल गांधींनी सांगितलेल्या 80 टक्क्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास निम्मा आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वीच्या मर्यादित सर्वेक्षणाचा आकडा उचलून, आजच्या भारताचे दिशाभूल करणारे चित्र रंगवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न अप्रामाणिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Rahul Gandhi Fact Check)
दरम्यान, महिलांच्या सुरक्षेसाठी गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. महिला हेल्पलाईन क्रमांक ‘181’च्या माध्यमातून आजवर 2.1 कोटींहून अधिक तक्रारींचे निवारण झाले असून, 84 लाखांहून अधिक महिलांना या सेवेचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. ‘112’ या अखिल भारतीय आपत्कालीन प्रतिसाद सेवेतूनही 43 कोटींहून अधिक तक्रारींचे निवारण झाले आहे. ‘भारतीय न्याय संहिते’त अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कारासाठी मृत्युदंड अथवा आजीवन कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे आकडे, दुसरीकडे राहुल गांधींचे दावे; या दोन्हींची तुलना केली असता त्यांच्या भाषणातील 80 टक्क्यांच्या फुग्यात किती हवा भरलेली आहे, हे स्पष्ट होते. (Rahul Gandhi Fact Check)
संपुआकालीन पापाचा वाली कोण?
महिला सुरक्षेवर भाषण करताना राहुल गांधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ काळातील परिस्थितीचा उल्लेख मात्र सोयीने टाळतात. 2012 मध्ये ‘यूएन वुमन’ने दिल्लीत केलेल्या सर्वेक्षणात 95 टक्के महिलांनी सार्वजनिक ठिकाणी असुरक्षित वाटत असल्याचे म्हटले होते. 2013मध्ये एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणातही जवळपास 96 टक्के दिल्लीकर महिलांनी अंधार पडल्यानंतर रस्ते वा मेट्रो स्थानके असुरक्षित असल्याचे सांगितले होते. मग त्या काळातील विदारक वास्तवावर राहुल गांधींचे मौन का?