रील्स, एकांकिका इत्यादी माध्यमांतून आपल्या तमाम फॉलोअर्सच्या दैनंदिन जीवनात संस्कृतचा समावेश करणार्या, प्रिशा ठक्करविषयी कालच्या संस्कृत दिनाच्या निमित्ताने...
देवभाषा संस्कृतम्’ ही जर फक्त देव-धर्म आणि कर्मकांडापर्यंतच मर्यादित राहिली, तर संस्कृतचा अंत दूर नाही. म्हणूनच तिला ‘जनभाषा’ करत तिचे रक्षण करण्यासाठी, प्रिशा ठक्कर ही तरुणी मागील सहा-सात वर्षे झटत आहे. संपूर्ण ठाणे-मुंबई भागातील उद्याचे भविष्य असणार्या ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ यांना बोली संस्कृत शिकवते. तसेच ती समाजमाध्यमांवरूनही ‘prisha.thakkar’ या चॅनेलच्या माध्यमातून संस्कृतचा प्रचार करते. प्रिशा सध्या तिच्या दमदार कंटेंट रील्सच्या माध्यमातून, ‘जेन-झीं’च्या संस्कृतप्रेमाचा नवा चेहरा ठरत आहे.
प्रिशा मुंबईत स्थायिक कच्छी कुटुंबातील मुलगी. तिचे सर्वच कुटुंबीय गुजराती, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचे अभ्यासक. आई इंग्रजीची शिक्षिका. त्यामुळे प्रिशाला बालपणी कायमच, इंग्रजी लिखाणातील काटेकोरपणाबद्दल टोकले जात असे. पण, पाचवीत गेल्यावर तिचा संस्कृतशी परिचय झाला.
संस्कृतच्या व्याकरणामुळे ती भाषा तिला कमालीची भावली. संस्कृतमध्ये वाक्य तयार करताना, शब्दांना ठरावीक क्रम असावा लागत नाही आणि संस्कृतात इंग्रजीसारखा ‘सायलेंट’ अक्षरांचाही त्रास नसतो. प्रिशाला संस्कृत आवडत असले, तरी पदवीसाठी मात्र तिने इतिहासाचीच दिशा निवडली.
परंतु, या काळातही प्रिशाने संस्कृत संभाषण शिकवणार्या ‘संस्कृत भारती’ संस्थेशी जोडली जात, विविध वयोगटांना संस्कृत शिकवण्याचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजतागायत ती ठाणे-मुंबई परिसरातील, बालवाडीपासूनच्या शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतचे धडे देत आहे. प्रिशाने ‘प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र’ विषयात पदवीचे शिक्षण घेतानाही, संस्कृतशी जुळलेली नाळ तुटू दिली नव्हती. अभ्यासक्रमातील ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ हा संस्कृत साहित्याशी संबंधित विषय तर, तिच्या आयुष्याला ठळक दिशा देणाराच ठरला. आपला कल इतिहास अभ्यासण्याकडे नसून, नेमका संस्कृत साहित्याचा इतिहास जाणून घेण्याकडे असल्याचे तिला तेव्हा प्रकर्षाने जाणवले.
पदवीनंतर तिने पूर्णपणे संस्कृतकडे वळण्याची ठाम भूमिका घेत, ‘डिप्लोमा’ पूर्ण केला. सध्या ती मुंबईतील सोमय्या महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. प्रिशाला संस्कृत साहित्यापैकी, नाटकांमध्ये अधिक रुची आहे. तिला पहिल्यापासूनच ‘थिएटर’ करायला आवडते.
महाविद्यालयीन काळात तिने ‘कच्छी’ भाषेतील नाटकांतही काम केले. आता सोमय्या विद्यापीठाने तिला संस्कृत नाटकांत भाग घेण्याची संधी दिली. विद्यापीठातील ‘नाट्यशास्त्रा’चा अभ्यास आणि त्याच्या प्रात्यक्षिक सरावादरम्यान, तिला आपल्या संस्कृत संभाषणकौशल्यांचा खर्या अर्थी वापर करण्याची सुवर्णसंधी मिळते. संस्कृत फक्त पुस्तकांत बंदिस्त न करता, तिचा प्रत्यक्ष वापर प्रिशाला समाधान देतो.
पण, प्रिशाला आपली संस्कृतची आवड केवळ स्वतःपुरती ठेवणे मान्य नाही. तिला पुढची पिढी घडवायची आहे; संस्कृत जगवायची आहे. यासाठी तिने माध्यम म्हणून तिने रील्सचा मार्ग निवडला. प्रिशा स्वतःही ‘जेन-झी’पैकीच असल्यामुळे, ती ‘जेन-झीं’ना आपलीशी वाटली आणि तिचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत गेले. प्रिशाच्या रील्सचे विषय तसे हलकेफुलके; पण दर्जेदार असतात.
लॉकडाऊन काळात ती ‘कच्छी’ भाषेत दैनंदिन व्लॉग-फूडव्लॉग करून, आपल्या आप्तस्वकीयांना पाठवत असे. पण, जसजशी तिला संस्कृतची अधिक गोडी लागली, तसतसे तिने त्याच प्रकारचे रील्स संस्कृतमध्ये करायचे ठरवले.
प्रिशा म्हणते, "भारतीयांच्या वाणीत संस्कृत आहेच; फक्त त्यांना माहीत नाही की, हे संस्कृत आहे! सर्वच प्रादेशिक बोली भाषा या संस्कृतोद्भव असल्यामुळे, तुम्ही मराठी-हिंदी-गुजराती जरी बोलत असाल, तरी ४० ते ५० टक्के शब्द हे संस्कृतच असतात.” अगदी हेच आपल्या रील्सच्या माध्यमातून, नेटकर्यांना पटवून देण्याचे काम प्रिशा करते. तिने आपल्या घरातील प्रत्येक वस्तूवर त्याच्या संस्कृत नावाची चिठ्ठी चिकटवून, घरातल्या सर्वांना जाणूनबुजून तेच पुकारण्याचा नेम घालून दिला आहे. ‘जब तुम ये कहते हो, अच्छे लगते हो,’ या गाण्यातून, तिने आपल्या प्रेक्षकांना ‘प्रिशा’ऐवजी ‘संबोधन’ ‘प्रिशे’ पुकारायचे आवाहन केले. विशेष म्हणजे, दुसर्याच दिवसापासून तिला तिच्या मित्रमंडळींकडून ‘प्रिशे’ हाक मारली जाऊ लागली. प्रेक्षकांचा असा सकारात्मक प्रतिसाद पाहून, प्रिशाला जोमाने काम करण्याची स्फूर्ती मिळते.
सध्या प्रिशाच्या यमक जुळणार्या, ‘छत्रम्-मित्रम्-पत्रम्’ इत्यादी शब्दसंपत्ती वाढवणार्या रील्सना मोठाच प्रतिसाद मिळत आहे. ऋतूचे आणि मुलाचे नाव ‘हेमंत’ यांची गंमत साधत "मला हेमंत आवडतो,” असे म्हणणार्या रीललाही तरुणांचा कमालीचा प्रतिसाद लाभला होता. असे द्वयअर्थी शब्द शोधून, ते मजेने हाताळायला प्रिशाला विशेष आवडते.
दैनंदिन जीवनातील शब्द-वाक्यांसाठी, प्रिशा संस्कृतमधील प्रतिशब्दांची माहिती लोकांना देते आणि ते लोकांना आवडतेदेखील! प्रिशा म्हणते, "आपण हल्ली ‘ओके’, ‘थँक-यू’ यांसारखे शब्द सर्रास वापरतो. जर आपण इंग्रजी शब्दांना आपल्या मातृभाषेतीलच शब्द असल्यासारखे आपलेसे करू शकतो, तर त्याऐवजी ‘अस्तु’ आणि ‘धन्यवाद’ला का स्थान देत नाही?”
प्रिशाला भविष्यातही रील्स, नाटक अशाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समाजमाध्यमांतून, संस्कृतचा निरंतर प्रसार करायची इच्छा आहे. प्रिशा ठक्करला तिच्या पुढील संस्कृतकार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
-ओवी लेले