'पादचारी प्रथम' अभियानाचे मोठे यश: मुंबईत १,४५९ ठिकाणी कारवाई, १३४ पदपथ मोकळे

    29-Aug-2026
PedestrianFirst

मुंबई : (PedestrianFirst) मुंबई महानगरपालिकेने पादचाऱ्यांसाठी पदपथ सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाईला वेग दिला आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आलेल्या २०० पदपथांपैकी १३४ पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे १९७ किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अडथळे दूर करण्यात आले आहेत.
 
या अभियानांतर्गत भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत येथे पदपथांवर उभारण्यात आलेल्या ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. भांडुप परिसरातील पहिल्या टप्प्यात एकूण १४ पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, त्यापैकी सुमारे ११ पदपथांवर कारवाई सुरू झाली आहे. (PedestrianFirst)
 
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अभियान
 
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्तांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना हे अभियान कठोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. (PedestrianFirst)
 
आयुक्तांकडून सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) सुरू असलेल्या कारवाईचा आढावाही घेतला जात आहे. महापालिका प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना या अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (PedestrianFirst)
 
भांडुपमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त
 
भांडुपमध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार आणि ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कारवाईनंतर रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या तसेच स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पदपथाचा मार्ग मोकळा झाला आहे. (PedestrianFirst)
 
यामुळे गर्दीच्या वेळेत पादचाऱ्यांची होणारी गर्दी आणि वाहतुकीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. स्थानक परिसरातून लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनाही आता अडथळेमुक्त पदपथ उपलब्ध होणार आहे. (PedestrianFirst)
 
२६ प्रशासकीय विभागांमध्ये अभियान
 
‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १३४ पदपथांवरील कारवाई पूर्ण झाली आहे. सुमारे १९७ किलोमीटरचे पदपथ अडथळेमुक्त करण्यात आले असून, १,४५९ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. हे अभियान महापालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये राबविण्यात येत आहे. (PedestrianFirst)
 
यासोबतच एस विभागात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचा नायनाट करण्यासाठीही विशेष अभियान राबविण्यात येत आहे. (PedestrianFirst)
 
पदपथावर साहित्य ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार
 
महापालिकेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी असतात. पदपथावर अनधिकृत दुकान, स्टॉल, बांधकाम साहित्य किंवा अन्य वस्तू ठेवून मार्ग अडविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. (PedestrianFirst)
 
 




संबंधित मजकूर