पटाणीचे मुस्लीम!

    29-Aug-2026   
Pattani Muslims
 
 
आम्हाला पटाणी प्रांतात विशेष स्वायत्तता हवी,’ अशी मागणी करत ‘बारीसन रेव्होल्युसी नॅशनल’ या इस्लामिक फुटीरतावादी संघटनेने थायलंडमध्ये नुकतेच ७८ हल्ले केले. इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी हे हल्ले केले. पटाणी प्रांतामध्ये अनेक शतके इस्लामिक राज्य होते, असे त्यांचे म्हणणे. पण, पटाणीमध्ये इस्लामिक राज्य कसे स्थापन झाले? "अल्लाच्या कोपामुळे तुझा आजार बरा होत नाही. तुला बरे करतो; पण त्याबदल्यात तुला इस्लाम स्वीकारायला लागेल,” असे १४५७ साली तिथल्या तत्कालीन बौद्ध राजाला सांगण्यात आले. त्याच्याभोवती तशी परिस्थिती रचण्यात आली. अल्लाच्या कोपापासून वाचण्यासाठी राजा मुस्लीम झाला आणि पटाणीचे बौद्ध राज्य हे इस्लामिक राज्य झाले. आज तेच पूर्वीचे बौद्ध पटाणी पुन्हा इस्लामिक राज्य व्हावे, म्हणून तिथे हिंसाचार सुरू आहे.
 
जसे आपल्याकडे अजूनही काही लोक फुशारक्या मारतात की, त्यांनी हिंदुस्थानावर ८०० वर्षे राज्य केले, तसेच पटाणीचे मुस्लीमही सातत्याने सांगतात की, ६०० वर्षे त्यांच्या पूर्वजांनी पटाणीवर राज्य केले. पण, १४५७ सालानंतर इस्लामिक राज्य झालेले पटाणी हे त्याआधी समृद्ध बौद्ध साम्राज्य होते. षड्यंत्र रचून पटाणी साम्राज्याला इस्लामिक बनवण्यात आले होते. ६०० वर्षांपूर्वी थायलंडच्या बाजूला पटाणी हे स्वतंत्र राज्य होते. तिथे ‘या तु नाक्पा’ हा बौद्ध राजा सम्राट होता. त्याला त्वचेचा गंभीर आजार झाला. राजाने खूप उपचार केले; पण त्याचा आजार बरा झाला नाही.
 
त्यावेळी त्याच्या राज्यात जडीबुटी औषधामध्ये निष्णात असलेला शेख सैद नावाचा कट्टर मुस्लीम राहायचा. तो इंडोनेशियामधून आला होता. शेवटी राजाने त्याला उपचार करण्यासाठी बोलावले. त्याला सांगितले की, "तू जर मला बरे केलेस, तर तू मागशील ते देईन.” शेखने राजाला बरे केले.
 
राजाने दागदागिने, संपत्ती शेखला देऊ केली. पण, तो म्हणाला, "मी मागेल ते तुम्ही देणार होता. माझी एकच मागणी आहे की, तू इस्लाम स्वीकार. देव-देवता सोड आणि अल्लाला मान.” धर्मप्रेमी राजाने नकार दिला. मात्र, त्यानंतर काही काळाने पुन्हा त्याला तो त्वचारोग झाला. शेखने पुन्हा उपचार केले, राजाने पुन्हा धर्मांतरणाला नकार दिला. असे तिसर्‍यांदा झाले. यावेळी मात्र शेखने आजाराने जर्जर झालेल्या राजाकडून वचन घेतले की, "उपचार करेन; पण त्या बदल्यात तू इस्लाम स्वीकारायलाच हवाच. इस्लाम स्वीकारत नाहीस म्हणून तुला हा आजार होतो.” गंभीर आजारातून सुटका व्हावी आणि अल्लाचा कोप होऊ नये, म्हणून आजारातून बरे झाल्यावर राजाने इस्लाम स्वीकारला. त्याचे नाव ठेवले गेले, ‘सुलतान इस्लाईल शहा.’ त्यावेळी शेख सैद हा राजाचा प्रमुख सल्लागार झाला. त्याने राजाच्या दरबारातील सगळे बौद्ध आणि हिंदू अधिकारी काढून त्याजागी बाहेरून आलेले मुस्लीम नेमले. राज्यातील मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या. लोकांना सामुदायिक धर्मांतरण करायला लावले.
 
काही अभ्यासकांच्या मते, १४व्या शतकामध्ये पटाणीच्या बौद्ध राजाने वाळवंटातून येणार्‍या मुस्लीम व्यापार्‍यांवर भरपूर कर लावले होते. त्यामुळे मुस्लीम व्यापार्‍यांचा आणि इस्लामचा इथे शिरकाव होत नव्हता. दुसरीकडे राजाला युद्धात हरवणे सोपे नव्हते. मुस्लीम व्यापार आणि इस्लामचा शिरकाव करण्यासाठी त्या सगळ्या व्यापार्‍यांनी आणि त्यांच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शेख सैद याला हस्तक बनवून पटाणीमध्ये पाठवले. राजा आजारी पडणे आणि त्याचा उपचार केवळ शेखकडेच असणे, हे सगळे संशयास्पद होते. पुढे राजा मुस्लीम झाला आणि राज्यकारभार शेख सैदच्या हातात आल्याने मुस्लीम व्यापार्‍यांवरचे कर उठवले गेले. पटाणी इस्लामिक व्यापाराचे केंद्र बनले. कधीकाळी बौद्ध असलेले राज्य पूर्णतः इस्लामिक बनले. या अभ्यासकांच्या मते, सुंसस्कृत भरभराटीच्या आग्नेय आशियामध्ये इस्लाम पोहोचवण्यासाठी शेख सैदच्या माध्यमातून हे रचलेले षड्यंत्र होते. काहीही असो; पण याच शेख सैदच्या षड्यंत्राने मुस्लीम झालेल्यांच्या वंशजांनी आज २०२६ साली थायलंडमध्ये एकाच वेळी ७८ ठिकाणी हल्ले केले. जर पटाणीच्या राजाने इस्लाम स्वीकारला नसता, तर तिथल्या जनतेनेही तो स्वीकारला नसता आणि थायलंडला आपला देश न मानणारे तिथले फुटीरतावादीही अस्तित्वात नसते. हे पाहून वाटते, ‘धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण’ हे स्वा. सावरकर काय उगीच म्हणाले होते?




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर