नेपाळच्या पुरात ठाणे जिल्ह्यातील १२ जण अडकले; १० जणांशी अद्याप संपर्क नाही

    29-Aug-2026
Thane Nepal Flood  (चित्र: एआय)
 
ठाणे: (nepal flood) नेपाळमध्ये २६ ऑगस्टपासून आलेल्या भीषण पुरामुळे आणि भूस्खलनामुळे कैलास-मानसरोवर यात्रेसह विविध कारणांसाठी नेपाळमध्ये गेलेले ठाणे जिल्ह्यातील १२ जण अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या यादीतून समोर आली आहे. यापैकी केवळ दोन जणांशी संपर्क होऊ शकला असून तब्बल १० जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
 
ठाणे जिल्हा प्रशासनाकडील उपलब्ध माहितीनुसार, अडकलेल्या व्यक्तींमध्ये रेखा सतीश पाटणकर, सतीश विनायक पाटणकर, अपर्णा समीर जोशी, समीर मुकुंद जोशी, सुनील सुदर्शन सुभेदार, संजय राजमल पाटील, नलिनी संजय पाटील, राजनिश रघुनाथ नातू, यशास भांड, अभिषेक घोणे, प्रकाश शांताराम माने आणि प्रतीक्षा प्रकाश माने यांचा समावेश आहे. (nepal flood)
 
यातील काही जण कैलास-मानसरोवर यात्रेसाठी काठमांडू–टिमुरे–रसुवागढी–चीन सीमा या मार्गावर होते. काही प्रवाशांचा शेवटचा संपर्क नेपाळ-चीन सीमेवरील इमिग्रेशन केंद्र, रसुवा-भोटेकोशी परिसर किंवा काठमांडू येथे झाल्याची नोंद आहे. त्यानंतर पुरामुळे रस्ते, पूल आणि दळणवळण यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटल्याचे प्रशासनाच्या नोंदीत नमूद आहे. (nepal flood)
 
विशेष म्हणजे संजय राजमल पाटील आणि नलिनी संजय पाटील हे कल्याण पश्चिम येथील रहिवासी असून त्यांचा शेवटचा निश्चित ठावठिकाणा काठमांडूतील हॉटेल शंकर असल्याची माहिती नोंदवण्यात आली आहे. तर सुनील सुदर्शन सुभेदार यांचा शेवटचा संपर्क नेपाळ-चीन इमिग्रेशन कार्यालयाजवळ झाल्याची नोंद आहे. (nepal flood)
 
शोध मोहिमेला अडथळे
 
ठाणे जिल्ह्यातील या १२ जणांपैकी १० जणांशी अद्याप संपर्क न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. मात्र, या १० जणांपैकी कोणाच्याही मृत्यूची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात संपर्क यंत्रणा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात बाधित असल्याने बचाव व शोधमोहीमेला अडथळे येत आहेत. (nepal flood)
 

 





संबंधित मजकूर