मुंबई : (Nepal Flood News) नेपाळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सेवा इंटरनॅशनल नेपाळ आणि हिंदू स्वयंसेवक संघ नेपाळ यांनी संयुक्तपणे पूरग्रस्त आणि भूस्खलनग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी व्यापक सेवाकार्य सुरू केले आहे. स्वयंसेवकांना तातडीने प्रभावित भागांत पाठवण्यात आले असून मदतकार्य सुरू झाले आहे. मदतकार्याची एक टीम नुवाकोट येथे पोहोचली असून तेथील परिस्थितीचा आढावा घेणे, तातडीच्या गरजा ओळखणे आणि बाधित कुटुंबांना मदत समन्वयित करण्याचे काम सुरू आहे. वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलांमुळे संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवक स्थानिक समुदायांसोबत समन्वय साधून कार्यरत आहेत.
याचबरोबर काठमांडूमध्ये मदतसाहित्य आणि अन्नधान्य संकलन मोहीमही सुरू करण्यात आली आहे. स्वयंसेवक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, कपडे, स्वच्छतेच्या वस्तू, प्राथमिक उपचार साहित्य आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे संकलन करून त्या प्रभावित भागांत पाठवण्याची व्यवस्था करत आहेत. या मोहिमेशी संबंधित कार्यकर्ते काठमांडू आणि पूरग्रस्त भागांत समन्वय साधत मदतसाहित्याचे संकलन, वाहतूक आणि वितरणाचे काम करत आहेत. परिस्थितीनुसार ही मोहीम आणखी विस्तारली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आयोजकांनी स्पष्ट केले की, या कठीण काळात बाधित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करणे हेच या सेवाकार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (Nepal Flood News)
मिळालेल्या माहितीनुसार रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि पूर्व नवलपरासी या जिल्ह्यांतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काही भागांत संपूर्ण वसाहती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. शेकडो कुटुंबे संकटात सापडली असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोटे कोशी नदीतील अचानक आलेल्या महापुरात मृतांचा आकडा १६२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांपैकी ६४ मृतदेह चितवन जिल्ह्यात, तर २६ मृतदेह पूर्व नवलपरासीमध्ये आढळले आहेत. शेकडो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. (Nepal Flood News)
या आपत्तीमुळे प्रभावित भागांत प्रवास करणाऱ्या पर्यटकांबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार ५०० हून अधिक पर्यटकांचा अद्याप संपर्क झालेला नाही, त्यापैकी ४६६ जण परदेशी नागरिक आहेत. बेपत्तांमध्ये १४२ भारतीय, ५४ अमेरिकन आणि ३३ ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय गोसाईकुंड आणि मानसरोवर यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंविषयीही चिंता वाढली आहे. डोंगराळ भूभाग, वाहून गेलेले रस्ते आणि पूल तसेच दूरसंचार सेवा खंडित झाल्यामुळे अनेकांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. (Nepal Flood News)
पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे ४० ते ५० किलोमीटर रस्ते वाहून गेले किंवा नुकसानग्रस्त झाले आहेत. तसेच सुमारे १८ पूल वाहून गेले किंवा खराब झाल्याने अनेक गावे मुख्य रस्त्यांपासून तुटली आहेत. वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवाही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्या आहेत. रुग्णालयांच्या सेवा प्रभावित झाल्या असून शाळा आणि शैक्षणिक उपक्रमांवरही परिणाम झाला आहे. वाहतूक व्यवस्था खंडित झाल्याने अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि अन्य अत्यावश्यक वस्तू दुर्गम भागांपर्यंत पोहोचवणे कठीण झाले आहे. (Nepal Flood News)
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी यात्रेकरूंबाबत माहिती दिली
आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी फेसबुक पोस्टद्वारे मानसरोवर यात्रेकरूंबाबत माहिती दिली. यात्रेसाठी गेलेल्या २१ गटांपैकी ४९५ जण सुरक्षित परतले आहेत. सध्या ७४३ जण तिबेटमध्ये, १४८ जण नेपाळमध्ये, तर ७७ जण इमिग्रेशन सेंटरमध्ये आहेत. तसेच त्यांचे तीन स्वयंसेवक तिमुरे (नेपाळ) येथे कार्यरत आहेत. या माहितीद्वारे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी अद्याप संपर्क न झालेल्या अनेकांबाबत चिंता कायम आहे.(Nepal Flood News)
काठमांडू-नारायणगढ मार्गावर अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन
बिघडलेल्या परिस्थितीमुळे नेपाळ सरकारने नागरिकांना काठमांडू-नारायणगढ मार्गावर अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. रस्ते आणि पूल नुकसानग्रस्त असून पूर व भूस्खलनाचा धोका कायम असल्याने अनेक मार्गांवर प्रवास धोकादायक ठरत आहे. नागरिकांनी हवामान आणि आपत्तीविषयक अधिकृत सूचना पाळाव्यात, धोकादायक भागांपासून दूर राहावे आणि बचाव यंत्रणांना सहकार्य करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. सध्या नेपाळमध्ये सरकारी यंत्रणा, सुरक्षा दल, स्थानिक समुदाय आणि सामाजिक संस्था शोध, बचाव आणि मदतकार्यांत गुंतलेल्या आहेत. या प्रयत्नांत सेवा इंटरनॅशनल नेपाळ आणि हिंदू स्वयंसेवक संघ नेपाळ यांचे स्वयंसेवकही सक्रियपणे सहभागी झाले असून, बाधित कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी त्यांचे सेवाकार्य सातत्याने सुरू आहे. (Nepal Flood News)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक