नेपाळच्या महाप्रलयाचा धडा...

    29-Aug-2026
Nepal Flood Disaster
 
 
हिमालयाच्या विस्तीर्ण पसरलेल्या हिमाच्छादित डोंगररांगांमध्ये वातावरण हे नेहमीच अनिश्चित असते आणि भूमी अधिक संवेदनशील. म्हणूनच हिमालयाच्या कुशीतील प्रदेशात विशाल पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करणे, हे संभाव्य आपत्तीला आमंत्रण देणारे ठरते. याकडे साफ दुर्लक्ष करीत, चीनने हिमालयीन प्रदेशात महाकाय धरणे, जलविद्युत प्रकल्प उभे केले. नेपाळमधील परवाचा भीषण महाप्रलय हीच धोक्याची घंटा वाजवणारा ठरला आहे.
 
नेपाळमधील प्रलयंकारी महापुराने निसर्गापुढे मानवी जीवन किती क्षुल्लक आहे, त्याची नव्याने जाणीव करून दिली. नेपाळमधील ल्हेंडे खोला नदीमध्ये कोसळलेल्या हिमनदीच्या पाण्याने प्रचंड उत्पात घडविला असून, त्यात सुमारे ४०० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महापुराची व्याप्ती बघता, ही संख्या पुढील काही दिवसांत वाढण्याची भीती आहेच. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतातील अनेक यात्रेकरूंचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्याने भारतातही चिंतेचे वातावरण आहे.
 
हिमालय ही अवाढव्य पर्वतरांग असली, तरी ती तितकीशी मजबूत पर्वतरांग नाही. ‘भारतीय भूस्तर प्लेट’ ही ‘युरेशियन भूस्तर प्लेट’ला धडकल्याने हिमालय पर्वतरांग उत्पन्न झाली. ही प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने हिमालय हा भूकंपप्रवण प्रदेश मानला जातो. हिमालय हा तुलनेने अधिक तरुण पर्वत असून, त्याच्या उंचीत दरवर्षी वाढ होत असते. म्हणूनच, ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे शिखरही दरवर्षी काही मिमीने उंच होत आहे. परिणामी, भूगर्भातील हालचालींमुळे हिमालयात नेहमीच कडे कोसळणे किंवा नवी सरोवरे तयार होणे यांसारख्या भौगोलिक घटना घडत असतात. अशाच एका तयार झालेल्या हिमनदीच्या सरोवराचा बांध दोन दिवसांपूर्वी फुटला आणि त्यात साठलेले लक्षावधी गॅलन पाणी प्रचंड वेगाने उताराच्या दिशेने धावू लागले. ही घटना नेपाळ-तिबेटच्या सरहद्दीवरील पर्वतरांगेत घडली आणि त्याचा जबरदस्त फटका नेपाळला बसला. हे फुटलेल्या सरोवराचे पाणी नेपाळमधील नद्यांच्या प्रवाहाबरोबर खालच्या प्रदेशात प्रचंड वेगाने वाहात गेले आणि वाटेत येणार्‍या प्रत्येक अडथळ्याला आपल्यासोबत गिळंकृत करीत गेले.
 
अशा या भीषण परिस्थितीत भारताने २४ तासांच्या आत नेपाळला मदतीचा हात दिला. भारत हा आपल्या शेजारी देशांना नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत पोहोचविणारा एक विश्वासार्ह देश. काही वर्षांपूर्वीही नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपात भारतीय हवाईदलाने तातडीने मदत पोहोचविली होती आणि तेथे अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले होते. तसेच भारतीय लष्कराच्या गिर्यारोहण पथकांनी पडलेल्या इमारतींखाली अडकलेल्या अनेकांची सुटका केली होती. नेपाळच नव्हे, तर चार-पाच वर्षांपूर्वी तुर्कीये व सीरिया या देशांमध्ये आलेल्या भूकंपातही भारताने या देशांना सर्वप्रथम तातडीची वैद्यकीय मदत पोहोचती केली होती.
 
आजही नेपाळमध्ये आलेल्या या आपत्तीत भारताने तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे. कैलास-मानसरोवर यात्रेत भारताचेच सुमारे २०० यात्रेकरू तिबेटी भागात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवून सुखरूप भारतात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नेपाळमध्ये गतवर्षी झालेल्या हिंसक सत्तांतरानंतर आलेल्या नव्या सरकारने भारताबरोबर काहीशी अलिप्त भूमिका घेतली. पण, ताज्या आपत्तीत नेपाळला मदत करताना या राजकीय मतभेदांना भारताने आड येऊ दिलेले नाही. नवे पंतप्रधान बालेन शहा यांनाही आता भारताचे महत्त्व आणि भारताला नेपाळबद्दल वाटत असलेल्या आपलेपणाची जाणीव झाली आहे. म्हणूनच, त्यांनी भारतवगळता अन्य देशांना मदतकार्यात सहभागी करून घेण्यास नकार दिला. संकटकाळात भारतच आपली मदत करू शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे, हेच त्यांच्या या निर्णयावरून दिसून येते.
 
उलट, आता आलेल्या या पुराची कल्पना चीनने आपल्याला उशिरा दिली, असा आरोप नेपाळ सरकारनेच केला. एकप्रकारे या नैसर्गिक आपत्तीतील हानीला चीनची बेजबाबदार भूमिका कारणीभूत आहे, असे नेपाळचे मत. चीनने हिमालयात अनेक धरणे व जलविद्युत प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात ब्रह्मपुत्रा नदीवरील विशाल धरण प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पाचा विपरीत परिणाम भारतावर होण्याची शयता वर्तविली जाते. चीनने या प्रकल्पांचा वापर भारताविरोधात हत्यारासारखा करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्याचा खरा धोका समस्त मानवजातीला जाणविणार. कारण, चीनने तंत्रज्ञानाच्या जोरावर जगातील सर्वांत मोठा ‘थ्री गॉर्जेस’ धरण प्रकल्प उभारला आहे. या विशाल धरणातील पाणीसाठ्याचा परिणाम पृथ्वीच्या गतीवरही झाल्याचे पुरावे भूगर्भ व खगोलशास्त्रज्ञांनी यापूर्वीच दिले आहेत.
 
दुर्दैवाने भारतालाही हिमालयीन प्रदेशातील अनेक नैसर्गिक संकटांना नित्य सामोरे जावे लागते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, तसेच अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये महामार्ग, बोगदे आणि जलविद्युत प्रकल्प उभारताना तंत्रज्ञांना अनेक अडचणी जाणवतात. गेल्या काही वर्षांत बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे चारधामांना जोडणार्‍या महामार्गांना तडे जात असल्याचे दिसून आले आहे. या धामांच्या परिसरात, तसेच काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या मार्गात दरडी कोसळण्याच्या व अचानक पूर येण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. नैसर्गिक अडचणींवर मात करणे आवश्यक असले, तरी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन विकास प्रकल्प उभारल्यास ते कधीही सुरक्षित राहतील, असे नाही. कारण, शेवटी निसर्गाची ताकद सर्वोच्च. निसर्गाला आणि पर्यावरणाला सुरक्षित राखल्यासच मानवी जीवन चिरंतन राहू शकते. क्षणभरात होत्याचे नव्हते होणे म्हणजे काय, त्याचा अनुभव नेपाळमधील पुराने दिला. त्यावरून बोध घेणे हे माणसाच्याच हाती. पण, आपल्या बुद्धिमत्तेचा
गर्व झालेला माणूस त्यातून काही धडा शिकण्याची अपेक्षा कमीच!




संबंधित मजकूर