न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये सरसंघचालकांचा वैश्विक संवाद

५ हजार प्रवासी भारतीयांची उपस्थिती; उद्बोधनाकडे लागले जगाचे लक्ष

    29-Aug-2026   
Mohan Bhagwat New York
 
मुंबई : (Mohan Bhagwat New York) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त आयोजित 'ग्लोबल आउटरीच प्रोग्राम' अंतर्गत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत अमेरिका दौऱ्यावर आहेत. दि. २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या इन्फोसिस थिएटरमध्ये त्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'वैश्विक सौहार्द आणि सार्वभौमिक एकता' (यूनिव्हर्सल वननेस) या संकल्पनेवर आधारित असलेल्या या सोहळ्यात सुमारे ५,००० प्रवासी भारतीय सहभागी होत असल्याची माहिती आहे. अमेरिकेतील नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मिडटर्म निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
सरसंघचालकांच्या या दौऱ्याला अमेरिकेतील ६० हून अधिक राजकीय आणि धार्मिक संघटनांनी कडाडून विरोध केला असून हा कार्यक्रम रोखण्याची मागणी केली. न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर जोहरान ममदानी यांनी या आयोजनावर जाहीर टीका करत संघावर भेदभावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. तथापि, हा खाजगी स्तरावर आयोजित कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार शहराच्या अखत्यारीत येत नसल्याचेही ममदानी यांनी स्पष्ट केले.(Mohan Bhagwat New York)
 
स्थानिक पातळीवरील विरोधानंतरही या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी राहिली. सरसंघचालकांचे हे संबोधन केवळ सभागृहातील उपस्थितांपुरते मर्यादित न राहता, साऱ्या विश्वातील लोक आपापल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशनच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकणार आहेत. अशा माहिती आहे की कार्यक्रमात अमेरिकेतील ३९ राज्ये आणि सुमारे ८५० शहरांमधून ५ हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.(Mohan Bhagwat New York)
 
मिळालेल्या माहितीनुसार, सरसंघचालक या कार्यक्रमात सामाजिक समरसता, विश्वबंधुत्व आणि एकात्मता या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार हा कार्यक्रम दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे. भारतीय वेळेनुसार २९ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११.३० वाजता कार्यक्रम सुरू होऊन ३० ऑगस्टच्या पहाटे ३ वाजेपर्यंत तो चालेल. कार्यक्रमादरम्यान ते भारतीय वंशाच्या नागरिकांसोबतच अमेरिकेतील विविध सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. यामध्ये युवक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच बौद्धिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे.(Mohan Bhagwat New York)
 
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटले की, न्यूयॉर्कमधील 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' हा विविध धर्म, संस्कृती आणि श्रद्धा असलेल्या जनसमुदायाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत संवाद साधणार असलेला एक आंतरधर्मीय मेळावा आहे. मुक्त संवाद आणि परस्पर आदराच्या भावनेतून आयोजित केलेला हा कार्यक्रम भारतीय जीवनमूल्यांचे प्रतिबिंब दर्शवतो; ही मूल्ये मुळातच सर्वसमावेशक असून सर्वांचे स्वागत करणारी आहेत. हा उपक्रम संघाच्या त्या दीर्घकालीन परंपरेशी सुसंगत आहे, ज्याद्वारे संघ भारत आणि जगभरातील विविध समुदायांशी संवाद साधून परस्पर सामंजस्य आणि सामायिक उद्दिष्टे जोपासत आला आहे.(Mohan Bhagwat New York)
 
गैरसमजांना संवादातून उत्तर
 
दि. २५ ऑगस्टपासून सुरू असलेल्या अमेरिका-कॅनडा-ब्रिटन दौऱ्यामागे केवळ भारतीय वंशाच्या नागरिकांशी संपर्क साधण्याचा हेतू नाही, तर भारतीय संस्कृती, हिंदू जीवनदृष्टी आणि संघाच्या कार्याबाबत थेट संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संघाच्या मते, भारत आणि हिंदू समाजाबाबत परदेशात निर्माण झालेल्या गैरसमजांना संवादातून उत्तर देणे आणि भारतीय वंशाच्या समाजाशी नाते अधिक दृढ करणे हा या जागतिक संपर्काचा एक भाग आहे.(Mohan Bhagwat New York)
 
टाइम्स स्क्वेअर परिसरात जाहिरात
 
न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या मध्यवर्ती भागातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणजे टाईम्स स्क्वेअर. ब्रॉडवे थिएटर, प्रचंड डिजिटल होर्डिंग्ज, निऑन लाइट्स आणि वर्षभर होणाऱ्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे त्याची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. न्यूयॉर्कला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी टाइम्स स्क्वेअर हे प्रमुख आकर्षण आहे. टाइम्स स्क्वेअर हे शहराच्या मोठ्या जागतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. अशा वेळी चर्चेत असलेल्या सरसंघचालकांच्या कार्यक्रमाची भव्य जाहिरात टाइम्स स्क्वेअर परिसरात झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण दररोज सुमारे साडेतीन लाख लोकांची वर्दळ टाइम्स स्क्वेअरच्या परिसरात होत असते.(Mohan Bhagwat New York)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर