निफाड तालुयातील कोठुरे या गावात मामाकडे भीमराव गारे यांचे बालपण गेले. तेथेच त्यांचा संघाशी संबंध जुळला आणि ग्रामीण संस्कारांची पाळेमुळे त्यांच्या मनात घट्ट रुजली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून त्यांनी पेठ तालुयात सुमारे पाच वर्षे प्रचारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी ग्रामीण समाजजीवन जवळून अनुभवले आणि त्यातूनच समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची प्रेरणा घेतली.
प्रचारक म्हणून कार्य पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक आयुष्याची सुरुवात केली. किराणा दुकानात नोकरीची संधी असतानाही त्यांनी ती नाकारली आणि स्वतःचा स्वतंत्र वृत्तपत्र वितरण व्यवसाय सुरू केला. ‘पेपरवाला’ हा शब्द जरी सामान्य असला, तरी गारेकाकांनी त्याला एक वेगळी ओळख दिली. त्यांच्या ‘जय श्रीराम’ या आवाजानेच परिसरात लोकांना आपला पेपर आल्याची जाणीव होत असे. वृत्तपत्रवाटप हे त्यांच्या दृष्टीने केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हते; ते लोकांशी नाते जोडण्याचे माध्यम होते.
त्यांनी सात-आठशे कुटुंबांशी अत्यंत आत्मीयतेचे संबंध निर्माण केले. प्रत्येक घरातील सदस्य, त्यांचे व्यवसाय, त्यांची परिस्थिती याची त्यांना सविस्तर माहिती असे. ही माहिती त्यांनी केवळ नोंद म्हणून न ठेवता, त्या नात्यांना समाजकार्याशी जोडण्यासाठी प्रभावीपणे वापरली. त्यांच्या संवादातून, आपुलकीतून आणि विश्वासातून अनेक कुटुंबे समाजकार्याशी जोडली गेली.
ग्रामसेवेच्या कार्यात गारेकाकांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागात गोशाळा उभारणे, ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबवणे, शहरातील लोकांना त्या उपक्रमांशी जोडणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. वर्षातून एकदा शहरातील नागरिकांना ग्रामीण प्रकल्पांना भेट देण्यासाठी घेऊन जाणे, त्यांना त्या कार्याची प्रत्यक्ष ओळख करून देणे आणि समाजात बांधिलकी निर्माण करणे, हे त्यांनी सातत्याने केले.
ग्रामीण भागातील उत्पादनांना शहरात बाजारपेठ मिळावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. रानभाजी, धान्य आणि इतर उत्पादने नाशिकमध्ये आणून विक्रीची व्यवस्था केली. ग्रामीण भागातील त्यांनी निवडलेल्या गावातील महिला सक्षमीकरणाकरिता बचत गटाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील राहिलेत. अनेक बचत गटांची निर्मिती करून महिलांना गृहउद्योग सुरू करण्याकरिता प्रशिक्षण दिले. तसेच नवनवीन गृहउद्योग सुरू करून महिलांना मोठे पाठबळ दिले. पेठ आणि सुरगाणासारख्या दुर्गम भागांत लघुउद्योग उभे राहावेत, तसेच आयुर्वेदिक शेतीचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले आणि स्वतःही सक्रिय सहभाग घेतला. सुरगाणा तालुयातील आदिवासी बांधवांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे मोठे कार्य गारेकाकांनी अनेक वर्षे सातत्याने केले. दुर्गम आणि विकासापासून दूर असलेल्या भिंतघर परिसरात जाऊन त्यांनी केवळ सेवाप्रकल्प उभे केले नाहीत, तर स्थानिक समाजात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि संघटनाची भावना निर्माण केली. या कार्यामागे नाशिकमधील अनेक स्वयंसेवक, विशेषतः महिला स्वयंसेविकांचे मोठे योगदान होते. गारेकाकांनी स्वयंसेवकांचे प्रभावी जाळे उभे करून ग्रामीण आणि आदिवासी भागाशी शहरातील समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते, दाते आणि तज्ज्ञांना भिंतघर परिसरात नेऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी घडवून आणली. या संवादातून अनेक विकासात्मक उपक्रमांची संकल्पना आकाराला आली. त्यापैकी काही प्रमुख प्रकल्पांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
गोशाळा उभारणी : सेवाभावातून
उभा राहिलेला प्रकल्प
भिंतघर परिसरात गारेकाकांनी स्वयंसेवकांच्या मदतीने गोशाळा उभारली. या कामासाठी नाशिकमधील अनेक स्वयंसेवकांनी श्रमदान, निधीसंकलन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. ग्रामीण भागातील जनावरांचे संगोपन, शेतीला पूरक मदत आणि स्थानिकांना रोजगार यादृष्टीने गोशाळा महत्त्वाची ठरली. या उपक्रमाची दखल राज्यपातळीवरही घेण्यात आली आणि महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतः या गोशाळेच्या भेटीसाठी आले होते. त्यामुळे या प्रकल्पाला विशेष सामाजिक मान्यता मिळाली.
गोधडी प्रकल्प : आदिवासी
भगिनींच्या स्वावलंबनाचा मार्ग
भिंतघर परिसरातील महिलांना शेती नसलेल्या काळात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गारेकाकांनी गोधडी प्रकल्प सुरू केला. परिसराचा अभ्यास आणि महिलांशी संवाद साधल्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला. नाशिकमधून जुने कपडे, साड्या, चादरी आणि पडदे ‘डोनेशन’च्या माध्यमातून गोळा केले जात. हे साहित्य आदिवासी भगिनींना दिले जाई आणि त्या त्यापासून सुंदर गोधड्या शिवत. नंतर या गोधड्यांची विक्री नाशिकमध्ये केली जाई. या प्रक्रियेमुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून यशस्वीपणे सुरू असून, भिंतघर व आसपासच्या पंचक्रोशीतील अनेक महिलांना त्यातून आर्थिक आधार मिळत आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात नाशिकमधील अनेक महिला स्वयंसेविकांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे शहर आणि आदिवासी समाज यांच्यात एक जिव्हाळ्याचा सेतू निर्माण झाला.
शिवणकाम वर्ग : कौशल्यातून आत्मनिर्भरता
गोधडी प्रकल्प सुरू असताना आदिवासी भगिनींनी शिवणकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गारेकाकांनी तेथे शिवणकाम प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाशिकमधील दात्यांकडून शिवणकामाच्या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. जगताप मॅडम यांनी स्वतः प्रत्येक शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस भिंतघर येथे जाऊन प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. सुमारे ३० ते ४० महिलांनी तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, अनेक महिला निरक्षर असूनही त्यांनी जिद्दीने शिवणकाम शिकून घेतले. पुढे आणखी काही मशीन उपलब्ध झाल्यानंतर त्यांपैकी अनेक महिलांनी स्वतःचा छोटा शिवणकाम व्यवसाय सुरू केला. आज या महिलांपैकी काहीजणी आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देत आहेत.
बकरी बँक प्रकल्प : स्थलांतर रोखणारा अभिनव प्रयोग
सुरगाणा तालुयात पावसाळ्यानंतर रोजगाराची कमतरता असल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर होत असे. हे थांबवण्यासाठी काय करता येईल, यावर गारेकाकांनी स्वयंसेवकांसह विस्तृत चर्चा केली आणि त्यातून ‘बकरी बँक’ ही अभिनव संकल्पना पुढे आली. या प्रकल्पांतर्गत दात्यांच्या मदतीने चार-पाच महिन्यांची बकरीची करडू आदिवासी महिलांना मोफत दिली जात. त्या महिलांनी ती वाढवायची. पुढे बकरीला करडू झाल्यानंतर पहिली करडू त्या महिलांकडेच राहत आणि दुसर्या वेळच्या करडूंपैकी एक करडू गावातील दुसर्या गरजू महिलेला दिले जाई. अशाप्रकारे ‘बकरी बँक’ गावोगावी वाढत गेली. या प्रकल्पामुळे अनेक महिलांना स्वतःच्या बकर्या मिळाल्या आणि दरवर्षी १० ते २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचे साधन तयार झाले. हा प्रकल्प राबवताना गारेकाकांनी विशेष मेहनत घेतली. काही स्वयंसेवक शाकाहारी असल्याने त्यांना सुरुवातीला या प्रकल्पाबद्दल संकोच होता. मात्र, काकांनी संवादातून त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात आदर्शवत ठरला.
तसेच आदिवासी बांधवांना बैलवाटप, सुरगाणा परिसरात पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाण्याच्या टाया उभारणे, ‘गिव्ह फाऊंडेशन’चे रमेश अय्यर यांच्या सहकार्याने अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधणे, आदिवासी भगिनींसाठी वार्षिक वर्ग, स्वयंसेवक मेळावा आणि सामाजिक प्रेरणा यांसारखे कित्येक उपक्रम गारेकाकांना राबविले. परंतु, गारेकाकांचे कार्य हे केवळ सेवाप्रकल्प उभारण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी आदिवासी समाजात स्वावलंबन, आत्मविश्वास आणि संघटनाची नवी ऊर्जा निर्माण केली.
समाजकार्य करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारीही तितयाच सक्षमपणे पार पाडली. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे, यावर त्यांनी विशेष भर दिला. मुलगी प्राची, प्राजक्ता व मुलगा प्रसाद यास उच्चशिक्षित केले. प्राची कर सल्लागार म्हणून कार्यरत आहे, तर मुलाला बँकेत नोकरी मिळवून दिली. त्यामुळे गारेकाकांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून समाजात ओळखले जाऊ लागले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही गारेकांकाचा परिचय होता. नाशिकमधील कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस नेले. झालेल्या या भेटीत पंतप्रधानांनी ‘भीमराव, पुढे या’ असे म्हणून त्यांना सन्मान दिला. त्याक्षणी उपस्थित असलेल्या अनेकांना त्यांच्या कार्याचा आणि संपर्काचा आवाका कळून आला. परंतु, इतका मोठा सन्मान आणि ओळख असूनही गारेकाकांनी आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कधीही सोडली नाही. गारेकाकांचा संघप्रचारक ते गृहस्थ असा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिले की, संघकार्य हे केवळ पूर्णवेळ कार्यकर्त्यांपुरते मर्यादित नसते; तर सामान्य माणूसही आपल्या दैनंदिन जीवनातून समाजासाठी मोठे योगदान देऊ शकतो.
गारेकाकांनी त्यांच्या छोट्याशा व्यवसायालाही समाजकार्याचे प्रभावी माध्यम बनवले. यावरून कार्यकर्त्यांनी हे शिकावे की, कोणतेही काम लहान नसते. योग्य दृष्टिकोन असेल, तर प्रत्येक काम समाजसेवेचे साधन होऊ शकते. गारेकाकांचे जीवन हे संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी कुटुंब आणि समाजकार्य यामध्ये सुंदर समन्वय साधला. एकंदरीत, गारेकाकांचे जीवन आपल्याला सांगते की, समाजकार्य हे वेगळे काही नसून, ते आपल्या जगण्याचाच एक भाग असायला हवे. साधेपणातून, नात्यांतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठे कार्य उभे राहू शकते, हीच त्यांची खरी शिकवण आहे. अशा या निःस्वार्थी, समर्पित आणि प्रेरणादायी कार्यकर्त्याचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाजकार्याच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी घालून दिलेला मार्ग, रुजवलेली मूल्ये आणि निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी, हीच त्यांच्या कार्याची खरी परंपरा आहे. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना, त्यांनी दिलेला वसा पुढे नेणे, ग्रामसेवा अधिक व्यापक करणे आणि समाजकार्याची ही परंपरा जपणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. गारेकाकांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली!
(लेखक ‘सहकार भारती’चे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री आहेत.)
-शरद जाधव