नशिबाच्या अंधारातून प्रकाशाकडे...

    28-Aug-2026

Vijay Vekhande Guruji
 
 
दारुच्या व्यसनी पाशांतून स्वतःला मुक्त करुन, तब्बल ३८ वर्षे शेकडो उद्ध्वस्त संसारांमध्ये
आनंदाची ज्योत पेटवणार्‍या वेखंडे गुरुजींची ही स्फूर्तिगाथा...
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्|
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः॥
‘श्रीमद्भगवद्गीता’ - अध्याय ६, श्लोक ५
 
अर्थात, मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, स्वतःचा विनाश करू नये. कारण, मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो. व्यसनाचा राक्षस हादेखील मानवाचा शत्रूच. हा व्यसनरुपी राक्षस जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश करतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीलाच गिळंकृत करत नाही; तर संपूर्ण कुटुंबाचे अस्तित्वच भस्मसात करतो. परंतु, निसटलेल्या आयुष्याची राख हातात उरलेली असतानाही, स्वतःच्या तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर ‘फिनिस’ पक्ष्याप्रमाणे राखेतून पुनरुत्थान पावणारे आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट आणणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पालघर जिल्ह्यातील कुर्झे गावचे सुपुत्र विजय मधुकर वेखंडे, ज्यांना संपूर्ण परिसर आदराने ‘वेखंडे गुरुजी’ म्हणून ओळखतो.
 
दि. १ जून १९८३ रोजी मालती व मधुकर वेखंडे यांच्या पोटी जन्मलेल्या विजय गुरुजींचा खरा पुनर्जन्म झाला दि. ४ जून १९९३ रोजी. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर तलाठी कार्यालयात काम करताना त्यांना दारूचे भयानक व्यसन जडले. पुढे कुडूस विभाग शिक्षण सेवा संघाच्या कुर्झे हायस्कूलमध्ये लिपिक ते शिक्षक असा प्रवास करताना दारूच्या नशेत सर्वस्व गमावून ते मरणासन्न आणि हतबल परिस्थितीत पोहोचले होते. परंतु, त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला यांची अथांग सहनशीलता, अनन्य साथ आणि गुरुजींच्या स्वतःच्या ठाम निर्धारामुळे ते दारूच्या भस्मासुराच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त झाले.
 
दारू सोडताच त्यांनी केवळ विचार बदलला नाही, तर कृतीतून नवा आदर्शदेखील उभा केला. दारूसाठी रोज वाया जाणारे पैसे त्यांनी शिस्तबद्धपणे बचत करण्यास सुरुवात केली. या बचतीतूनच कुर्झे येथे जागा घेऊन घर व दुकानाचा पाया रचला. ज्या दिवशी दारू सोडली, तो दि. ४ जून १९९३ हा दिवस स्वतःचा खरा पुनर्जन्म मानत त्यांनी तब्बल दीड लाख रुपयांची पुंजी जमा करून आपल्या संसाराला सुरक्षित व सन्मानजनक दिशा दिली.
 
आपला संसार पूर्वपदावर आल्यानंतर गुरुजी तिथेच थांबले नाहीत. आपण ज्या गर्तेतून बाहेर पडलो, त्यात इतर कोणीही रुतू नये, या भावनेने त्यांनी स्वतःच्या एका छोट्या खोलीतून ‘दारू सोडा, संसार जोडा’ हा महामंत्र देत व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली. गुजरात येथील आपले गुरुवर्य गणपत बाबा यांना साक्षी मानून स्थापन केलेले ‘गुरुकृपा मनशांती दारुमुक्ती मंडळ’ आज सलग ३८ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दर शनिवार व रविवारी तब्बल ३०० ते ५०० परिवार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीचा मंत्र व औषधे घेण्यासाठी गोळा होतात. संपूर्ण कुर्झे गावाच्या भक्कम साथीने गुरुजींनी आजवर हजारो उद्ध्वस्त कुटुंबे पुन्हा उभी करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पुण्यकर्म केले आहे.
 
शिक्षकी पेशा निष्ठापूर्वक सांभाळताना त्यांनी शाळेसाठी नवीन इमारत, मुलींसाठी स्वच्छतागृह, संगणक केंद्र, बोअरवेल व पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधा विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभ्या केल्या. कुर्झे ग्रामपंचायत असो की, विक्रमगड पंचायत समिती, गावातील कोणतीही सामाजिक समस्या असो वा वैचारिक मतभेद, तिढा सोडवण्यासाठी सर्व प्रथम ‘वेखंडे गुरुजीं’नाच पाचारण केले जाते.
 
त्यांचा स्वानुभव आणि व्यसनमुक्तीचा विचार ‘दारू सोडा, संसार जोडा’ या प्रेरणादायी पुस्तकातून समाजमनावर कोरला गेला आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, तत्कालीन पालकमंत्री व आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आणि तत्कालीन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. दीपक सावंत अशा मान्यवरांनी या पुस्तकाची महती ओळखून त्याला प्रस्तावना दिली आहे.
 
त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन समाजाकडून त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘व्यसनमुक्ती सामाजिक कार्य पुरस्कार’, ‘कलाभूषण पुरस्कार’, ‘दारुमुक्ती दाता पुरस्कार’, ‘गरिबांचा वाली पुरस्कार’, आणि ‘विद्यार्थीमित्र पुरस्कार’ अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु, एवढे यश आणि सन्मान मिळूनही गुरुजी अत्यंत साधेपणाने जगतात आणि आपल्या प्रवासात मदत करणार्‍या प्रत्येक हाताची कृतज्ञतेने आठवण ठेवतात.
 
गुरुजींचे अनुभवाचे बोल आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत-
मानव व नशा, राक्षस जन्म देते...
 
जो दारूच्या व्यसनात दंगला-रंगला, त्याचा संसार भंगला!
 
आज शिक्षक सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही वेखंडे गुरुजी पूर्ण वेळेने समाजसेवेत आणि उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
 
ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यातील उद्ध्वस्ततेवर मात करून हजारो घरांमध्ये आनंदाचे नंदनवन फुलवले, तो खर्‍या अर्थाने समाजाचा ‘मार्गदर्शक दीपस्तंभ’ ठरतो. एका पराभूत क्षणातून पराक्रमी पर्वाची सुरुवात कशी करावी, याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे वेखंडे गुरुजी! त्यांच्या या पावन, महान आणि अविरत समाजकार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम आणि उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

-कमलेश संखे




संबंधित मजकूर