सागरी महासत्तांचा मेळा

Hamburg maritime Exhibition


समुद्र हा केवळ दोन भूभागांना जोडणारा जलमार्ग नाही, तर तो जगाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे. जगभरातील व्यापाराची मोठी उलाढाल समुद्रीमार्गाने होते. जहाजबांधणी, बंदरे, मालवाहतूक, ऊर्जा, संरक्षण आणि व्यापार या सर्व क्षेत्रांचे भवितव्य समुद्राशीच जोडलेले. त्यामुळे सागरी क्षेत्रात होणारा प्रत्येक बदल हा केवळ एका उद्योगापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो. अशा पार्श्वभूमीवर जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे होणारे ‘एसएमएम २०२६’ हे प्रदर्शन विशेष महत्त्वाचे ठरते.
 
अवघ्या एका आठवड्यानंतर हॅम्बुर्गमध्ये जगभरातील सागरी उद्योगाचा महासंगम होणार आहे. सुमारे २ हजार ३०० कंपन्या, १२० देशांतील प्रतिनिधी आणि ९० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक प्रदर्शन क्षेत्रामुळे हॅम्बुर्ग चार दिवसांसाठी जागतिक सागरी उद्योगाचे केंद्र बनणार आहे. प्रदर्शनातील सर्व जागा आधीच आरक्षित झाल्या आहेत. या प्रतिसादातून सागरी उद्योगातील वाढती उलाढाल, नव्या तंत्रज्ञानाची गरज आणि भविष्यातील संधींचे महत्त्व स्पष्ट होते. मात्र, ‘एसएमएम २०२६’चे खरे महत्त्व त्याच्या भव्यतेत नाही.
 
आज सागरी उद्योग मोठ्या बदलाच्या टप्प्यावर आहे. वातावरणातील वाढते तापमान, हवामानातील बदल आणि प्रदूषण कमी करण्याची गरज, यामुळे जहाजांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर जगभर भर दिला जात आहे. पारंपरिक इंधनांऐवजी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर, कमी इंधनात अधिक काम करणारी जहाजे आणि पर्यावरणपूरक जहाजबांधणी यांना आता प्राधान्य मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रदर्शनामध्ये प्रथमच ऊर्जा कार्यक्षमता केंद्र उभारण्यात आले आहे. कमी ऊर्जेत अधिक कार्यक्षम वाहतूक कशी साधता येईल, जहाजांचा इंधनखर्च कसा कमी करता येईल आणि पर्यावरणावरील परिणाम कसा घटवता येईल, यावर येथे विचारमंथन होईल. भविष्यातील सागरी उद्योगासाठी ऊर्जाबचत ही केवळ आर्थिक गरज नसून, पर्यावरणीय जबाबदारीही आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट होते.
 
दुसरीकडे सागरीसुरक्षेचे आव्हानही दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाच्या समुद्रीमार्गांची सुरक्षा, बंदरांची सुरक्षितता आणि जहाजांचे संरक्षण यांना आर्थिक, तसेच सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे यंदाच्या प्रदर्शनात सागरीसुरक्षा आणि संरक्षणासाठी अधिक जागा देण्यात आली आहे. नागरी, तसेच संरक्षण क्षेत्रात वापरता येणार्‍या नव्या तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले आहे. भविष्यातील सागरीसुरक्षा ही केवळ युद्धनौकांवर अवलंबून राहणार नसून अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रणा आणि माहितीच्या वेगवान वापरावरही आधारित असेल, याची ही नांदी आहे. या जागतिक सागरी मेळाव्यात भारताची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे. चीन, जपान आणि दक्षिण कोरियासोबत भारताचाही सागरी उद्योगात वाढता सहभाग दिसून येत आहे. जहाजबांधणी, बंदरविकास, समुद्री मालवाहतूक, नौदल क्षमता आणि सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने भारत मोठ्या संधींच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ‘एसएमएम’सारख्या जागतिक व्यासपीठावर भारताला तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नव्या संधी मिळू शकतात.
 
या आयोजनाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे, तरुणपिढीला दिलेले स्थान. विद्यार्थी, तरुण अभियंते, नवउद्योजक आणि संशोधकांना सागरी उद्योगाशी जोडण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. तसेच ‘एसएमएम २०२६’मध्ये तज्ज्ञांच्या चर्चासत्रांतून ऊर्जासंक्रमण, पर्यावरणसंरक्षण, सागरीसुरक्षा, जहाजबांधणी, बंदरविकास आणि डिजिटल मालवाहतूक यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.
 
म्हणूनच, ‘एसएमएम २०२६’कडे केवळ व्यापार प्रदर्शन म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, तर हे जगातील सागरी उद्योगाच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारे व्यासपीठ आहे. ऊर्जाबचत, पर्यावरणसंरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांचा समतोल साधणे, हे आगामी काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे. हॅम्बुर्गमध्ये होणारा हा सागरी महासंगम त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जगाची तयारी किती आहे, हे दाखवून देईल. त्यामुळे ‘एसएमएम २०२६’कडे आता केवळ उद्योगजगताचे नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेचे लक्ष लागले आहे.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर