
मुंबई - (Rakshabandhan )रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे.काळ पुढे सरकतो, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो, पण या सणाच्या निमित्ताने बालपणीच्या त्या सुंदर आठवणी पुन्हा मनात ताज्या होतात. भावंडांसोबत घालवलेले हे क्षण, केलेली मस्ती, भांडणं आणि एकत्र साजरे केलेले सण मोठं झाल्यावर अधिकच खास वाटू लागतात. याच रक्षाबंधनाच्या आठवणी सांगतायेत ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील नर्मदा रामपुरे म्हणजेच पौर्णिमा तळवलकर !
'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधताना पौर्णिमा तळवलकर म्हणाल्या कि , “बालपणी रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही सगळी चुलत भावंडं एकत्र यायचो. मी कथ्थक शिकत होते आणि माझी बहीण पल्लवी वैद्य हिलाही नृत्याची खूप आवड होती. ती शिकली नसली तरी माधुरी दीक्षितची गाणी आणि नृत्य पाहून स्वतःच नृत्य शिकली. आम्ही रक्षा बंधनाच्या दिवशी एखाद्या गाण्यावर नृत्य बसवून घरच्यांसमोर सादर करायचो. हे आम्ही दरवर्षी करायचो आणि खूप एन्जॉय करायचो. माझ्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस होता. तिथे आम्ही कटिंग पेपरमध्ये खेळायचो, नाचायचो आणि लपाछपीही खेळायचो. सुट्टीचा दिवस कसा संपायचा, हे आम्हाला कळायचंच नाही. माझे काही चुलत भाऊ तळेगावला राहायचे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या वेळी आम्ही त्यांना पोस्टाने राखी पाठवायचो आणि त्यांच्याकडून पत्र यायचं. त्या काळात व्हिडिओ कॉलची सुविधा नव्हती, त्यामुळे पत्राचीही एक वेगळीच मजा होती. लहानपणी भावंडांमध्ये मस्ती, मारामारी आणि भांडणं होतात. पण मोठं झाल्यावर आमच्यात खूप बदल झाला. आज आम्ही तिघंही एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो. कुठल्याही अडचणीच्या वेळी मदतीचा हात देतो. ‘आपली हक्काची दोन माणसं आहेत’ ही भावना खूप समाधान देणारी आहे. रक्षाबंधनाचं हे नातं आम्ही शेवटपर्यंत असंच जपणार आहोत.”(Rakshabandhan)