एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट! इम्रानने केली २१ वर्षीय मॉडेलची घरात घुसून निर्घृण हत्या

    28-Aug-2026   
 
Muskan Murder Case Delhi
 
नवी दिल्ली (Muskan Murder Case Delhi) : पश्चिम दिल्लीतील टिळक नगर परिसरात एका २१ वर्षीय तरुणीची तिच्याच घरात घुसून चाकूने वार करत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दि. २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. मृत तरुणी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेण्यासोबतच अर्धवेळ मॉडेल म्हणून काम करत होती. आरोपी जिम ट्रेनरने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता, मात्र तिने नकार दिल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
 
 
 
मुस्कान असे मृत तरुणीचे नाव असून ती ओल्ड महावीर नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. दि. २६ ऑगस्टच्या संध्याकाळी मुस्कान घरात एकटीच होती. तिची आई आणि भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधून आरोपी अकीब उर्फ इम्रान याने तिच्या घरात प्रवेश केला. घरात शिरताच त्याने मुस्कानसोबत पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला. मात्र, तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला. या नकाराचा राग अनावर झाल्याने इम्रानने सोबत आणलेल्या तीक्ष्ण चाकूने मुस्कानवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. तिचा गळा आणि छातीवर गंभीर वार झाल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.आरोपी इम्रान हा पेशाने जिम ट्रेनर असून त्याची मुस्कानशी जुनी ओळख होती. तो मुस्कानवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होता. मुस्कानने त्याचे वागणे पाहून त्याच्याशी बोलणे आणि संपर्क पूर्णपणे बंद केला होता. तरीही आरोपी तिचा कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी सतत पाठलाग करत होता. मुस्कानने कुटुंबीयांनाही या त्रासाबद्दल सांगितले होते, ज्यानंतर त्यांनी इम्रानला समज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही इम्रानने मुस्कानचा जीव घेतला. (Muskan Murder Case Delhi)

पोलीसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न, पण पोलीसांनी ठोकल्या बेड्या
 
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ १५ हून अधिक विशेष पथके तयार केली आणि आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा केल्यानंतर आरोपी इम्रान दिल्लीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या लपण्याच्या जागेचा शोध घेतला.दि. शुक्रवार, दि. २८ ऑगस्टच्या पहाटे पोलिसांच्या पथकाने त्याला वेढा घातला. स्वतःला वेढलेले पाहून आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र आत्मरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. (Muskan Murder Case Delhi)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर