रक्षाबंधनाच्या आठवणींना मृण्मयीने दिला उजाळा !

    28-Aug-2026
 
 
mrunamyi
 
 
 
मुंबई - (Mrunmayee Deshpande)रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे. बालपणी रक्षाबंधन म्हणजे भावंडांची गडबड, घरभरलेला आनंद, भेटवस्तू, मिठाई आणि दिवसभराची धमाल. काळ पुढे सरकतो, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो, पण या सणाच्या निमित्ताने बालपणीच्या त्या सुंदर आठवणी पुन्हा मनात ताज्या होतात. रक्षाबंधनाच्या याच आठवणींना उजाळा दिलाय मृण्मयी देशपांडे यांनी.
 
 
'मुंबई तरुण भारत'शी बोलताना मृण्मयी म्हणाली कि, “आमच्या घरी आम्ही सख्या दोन बहिणी आहोत; पण आम्हाला सख्खा भाऊ नसला तरी सख्या चुलत भावंडांची मोठी फौज आहे. जवळपास दहा फूटांच्या सोफ्यावरही न मावणारी भावंडं आमच्याकडे आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांची एक लाईन आणि ओवाळणी करणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन असायची. त्यात भेटवस्तू, मिठाई आणि भरपूर धमाल असायची. बालपणी घर भावंडांनी अक्षरशः भरलेलं असायचं. आमच्या घरात जवळपास ५०-६० जण रक्षाबंधनासाठी एकत्र यायचे. बाबांचं रक्षाबंधन आणि आईची राखी पौर्णिमा असा सगळा आनंदी गोंधळ सुरू असायचा. दिवसभराच्या गोंधळानंतर जेवण झालं की आम्ही सगळी भावंडं एका खोलीत जाऊन दोन-तीन तास झोपायचो. आमच्या त्या झोपलेल्या अवस्थेतील काही मजेशीर फोटो आणि रील्स आजही पाहिल्या की आम्हाला हसू आवरत नाही. मोठं झाल्यावर मात्र प्रत्येक नात्याला एक वेगळा आयाम मिळतो. आज आमचं नातं खूप प्रगल्भ झालं आहे. एकमेकांना न सांगताही अनेक गोष्टी समजतात, गरज पडली की आधार दिला जातो आणि भावना पटकन ओळखल्या जातात. भावंडांचं हे नातं आता आणखी घट्ट झालं आहे, याचा मला खूप आनंद आहे.”(Mrunmayee Deshpande)
 




संबंधित मजकूर