सरसंघचालकांचा वैश्विक एकतेचा संदेश आणि हिंदूद्वेष्ट्यांचा बौद्धिक दहशतवाद!

    28-Aug-2026
Mohan Bhagwat Global Unity Message
 
 
गेल्या काही दिवसांपासून रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोेहनजी भागवत यांच्या अमेरिका दौर्‍यातील कार्यक्रमांना तेथील हिंदूद्वेष्ट्या संस्थांनी, न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींसारख्या डाव्या आणि इस्लामी विचारांच्या प्रवृत्तींनी नाहक विरोध दर्शविला आहे. पण, मोहनजींच्या दौर्‍यांमागील मुख्यत्वे वैश्विक एकतेचा, ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा संदेश देण्याचा व्यापक प्रयत्न समजून न घेता, त्याला होणारा हा आंधळा विरोध म्हणजे बौद्धिक दहशतवादच म्हणावा लागेल.
 
विरोधकाला गप्प बसवण्याचे आणि कोपर्‍यात ढकलण्याचे अनेक मार्ग असतात. त्याला बदनाम करणे, खोट्या चौकटीत अडकवणे, शिवीगाळ करणे किंवा त्याची विश्वासार्हताच संपवण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांपैकी काही मार्ग. एखाद्या व्यक्तीबद्दलचा द्वेष किंवा विरोध व्यक्त करण्यासाठी त्याचे विकृत चित्र उभे केले जाते, त्याची थट्टा केली जाते किंवा त्याला वैधतेपासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातो. जर विरोधक एखादी अशी संघटना असेल, ज्याचे स्थान निर्विवाद आणि अभेद्य असेल; तर मग तिच्या प्रमुखालाच लक्ष्य केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याबाबतही सध्या हेच घडत असल्याचे दिसून येते.
 
दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल यांच्या उत्कृष्ट ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटात विष्णू दास यांची भूमिका साकारणारे परेश रावल भारताचा इतिहास, संस्कृती आणि मूल्ये विकृत करणार्‍या एका घातक प्रकारच्या बौद्धिक दहशतवादाचा उल्लेख करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. मोहनजी भागवत यांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांमध्ये हीच रणनीती अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडम यांसारख्या पाश्चात्त्य देशांमध्ये तथाकथित बौद्धिक दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे दिसते. स्वतःला ‘बुद्धिजीवी’ म्हणवून घेणार्‍या अशा व्यक्तींनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या भाषणात ‘दिमागी नक्षल’ अशी उपमा दिली होती. भारताच्या संदर्भात डाव्या अतिरेकी विचारसरणीच्या लोकांबद्दल बोलताना त्यांनी हा उल्लेख केला असला, तरी अशा प्रवृत्ती पाश्चात्त्य देशांमध्येही तितयाच सक्रिय असल्याचे दिसून येते.
 
डाव्या अतिरेकी विचारसरणीशी संबंधित काही मोजया गटांनी आणि कट्टर इस्लामवादी घटकांनी सोशल मीडियावर मोहीम उघडून मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे शनिवारी होणार्‍या सहा हजारांहून अधिक अमेरिकन नागरिकांच्या आंतरधर्मीय परिषदेत डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होऊ नये, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे ‘अहेड फोरम’ (अमेरिकन हिंदूज फॉर एन्गेजमेंट अ‍ॅण्ड डायलॉग) या व्यासपीठाच्या पुढाकाराने २००हून अधिक संस्था एकत्र येत, ‘युनिव्हर्सल वननेस’ ही परिषद आयोजित करत आहेत. या परिषदेचा उद्देश जगातील परस्परसंबंध आणि एकात्मतेचा संदेश देणे हा आहे.
 
पश्चिम आशिया आणि पूर्व युरोपमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अध्यात्म, शांतता आणि सामाजिक संवादाला चालना देणार्‍या विविध धर्मीय नेत्यांना एकत्र आणणार आहे. अमेरिकेतील अनेक नागरी नेते, सार्वजनिक संस्थांचे प्रतिनिधी, सामुदायिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने हिंदू समाजाचे सदस्य या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पुढील पंधरवड्यात टोरंटो आणि लंडनमध्येही अशाच सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. डॉ. मोहनजी भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये प्रवास करत समुदायसेवा, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी सहभाग, कुटुंबव्यवस्था, शाश्वत विकास आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे; हा संदेश देणार आहेत.
 
यावेळी दि. ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे झालेल्या ऐतिहासिक ‘पार्लमेंट ऑफ रिलिजन्स’ची आठवण येते. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी ‘सिस्टर्स अ‍ॅण्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ या संबोधनातून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला आणि हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि सार्वत्रिक स्वीकार यांवर आधारित जीवनपद्धती असल्याचे जगासमोर मांडले. वेगवेगळ्या श्रद्धांचा स्वीकार करून परस्पर सौहार्दाने जगणे, हा स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचा गाभा होता. आजही परिस्थिती वेगळी नाही. डॉ. मोहनजी भागवतही जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी ‘विश्व एकात्मतेचा’ हाच संदेश घेऊन पाश्चात्त्य देशांकडे जात आहेत. परस्पर आदर आणि सौहार्दावर आधारित हा संवाद जागतिक स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणू शकतो. गेल्या काही वर्षांत दलाई लामा, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि पोप फ्रान्सिस यांसारख्या जागतिक नेत्यांनीही संघर्ष, रोगराई, मागासलेपणा, अशिक्षितपणा, संसाधनांची कमतरता आणि अतिरेकी उपभोगवादाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या हितासाठी जागतिक एकात्मतेचा पुरस्कार केला आहे.
 
जगभरात सुरू असलेल्या चांगल्या, वाईट आणि विद्रूप प्रचार मोहिमांदरम्यान डॉ. मोहनजी भागवत भारताकडून शांततेचा सकारात्मक संदेश घेऊन जाणार आहेत. संघाच्या शतकीय प्रवासातील सेवाकार्य, हिंदुत्वाबाबतचे गैरसमज दूर करणारी मांडणी आणि भारताबद्दलची वस्तुस्थिती ते मांडतील. पुढील काळासाठी संघाची भूमिका काय असेल, याचाही वेध ते घेऊ शकतात. न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकांशी आणि विविध मान्यवरांशी त्यांची भेट होणार असताना, टोरंटो आणि लंडनमध्ये ते शीख समाजातील प्रमुख नेत्यांशीही संवाद साधणार आहेत.
 
विशेषतः कॅनडातील दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, तेथे खलिस्तानी अतिरेकी गटांकडून हिंदूविरोधी प्रचार वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. तथापि, बहुतांश शीख नेते, उद्योजक आणि समाज प्रतिनिधींनी डॉ. मोहनजी भागवत आणि संघाविरोधातील खलिस्तानी कथनापासून स्वतःला दूर ठेवले आहे. लेखकाच्या मते, पाकिस्तानच्या कारस्थानांमुळे प्रेरित काही इस्लामवादी कट्टरपंथी या प्रचाराला पाठिंबा देताना दिसतात. मात्र, हा संपूर्ण मुस्लीम समाजाचा दृष्टिकोन नाही.
 
न्यूयॉर्क, लंडन आणि टोरंटो या तिन्ही शहरांमध्ये हिंदू प्रवासी समाजाशी संवाद आणि विविध स्तरांवरील बैठका हे डॉ. मोहनजी भागवत यांच्या दौर्‍याचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. हा दौरा यावर्षी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेल्या व्यापक सांस्कृतिक संवादाचा पुढचा टप्पा मानला जात आहे. उत्पादन आणि उपभोग यांना केंद्रस्थानी ठेवून वस्तू आणि सेवांची बाजारपेठ उभारणे, ही पाश्चात्त्य जागतिकीकरणाची संकल्पना राहिली आहे. मात्र, विश्व एकात्मता, आध्यात्मिक एकात्मता आणि सनातन धर्मातील मूल्यांचा संदेश देत, डॉ. मोहनजी भागवत स्वामी विवेकानंदांनी आरंभलेल्या वेगळ्या प्रकारच्या जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन मानवतेतील परस्परसंबंध अधिक दृढ करण्याचा विचार या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौर्‍याचा केंद्रबिंदू आहे; म्हणून त्यांचे म्हणणे एकदा ऐकून तरी घ्या!
 
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून,
नवी दिल्लीस्थित पक्षनिरपेक्ष विचारमंच ‘सेंटर फॉर इंटिग्रेटेड अ‍ॅण्ड होलिस्टिक स्टडीज’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)
-के. ए. बद्रीनाथ




संबंधित मजकूर