लखनौची घटना. आजाराचे निमित्त झाले आणि तिचे केस गळू लागले. तिने केसगळतीवर उपचार सुरू केले. आपले टक्कल कुणाला दिसू नये, म्हणून ती टोपी घालू लागली. केसगळती थांबली नाही. टक्कल पडले, तर आपले कसे होणार? लोक काय म्हणतील? गेली पाच-सहा वर्षे ती या भीतीत जगत होती. अखेर कालपरवा या १५ वर्षांच्या किशोरीने आत्महत्या केली. भयंकर! शरीराचे अवयव आणि त्यात केसही ठरलेल्या मानकातच असायला हवेत, हे मापदंड कधी आणि कुणी ठरवले असतील? या असल्या गोष्टींमागचा फोलपणा या मुलीला कुणीतरी समजवायला हवा होता. पण, बनावटी आणि दिखावटी दुनियेत मनाच्या आणि गुणाच्या सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याला भुलले जाते, हे क्रूर वास्तव!
स्त्रियांचे आणि पुरुषांचेही नयननक्श, केस, अंगकाठी, रंगरूप पाहून त्यांना संधी देण्याचा आंधळा बाजार सुरू आहे. योग्यतेपेक्षा ती व्यक्ती कशी दिसते, याचा आधार घेतला जातो. २०१२ सालची ती घटना आठवते. निवडणुकीचे दिवस होते. तिकीटवाटप होणार होते. मुंबई उपनगरात एका राजकीय नेत्याने तिकीटवाटपाच्या एक दिवसाआधी विरोधी पक्षातील महिलेला त्याच्या पक्षात आणले. पक्षासाठी आयुष्य खर्ची केलेल्या महिलांची संधी डावलून तिला संधी का, असे विचारल्यावर त्याचे उत्तर होते, "तिचा चेहरा असा आहे की, तिला पाहून लोक मते देतील.” पण, गंमत म्हणजे, हे सांगणारा नेता त्याच्याच सौंदर्याच्या मापदंडात कुठेच बसत नव्हता. अर्थात, माणसाच्या शरीरावरून माणसाचे गुण मापणारे आणि त्यांना संधी देणारे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत समाजात असेच सुरू राहणार. तर, विषय होता त्या अश्राप मुलीचा. टक्कल पडतेय या अवाजवी भीतीने तिने जीव दिला. तिला कसली भीती वाटली? आपल्याशी कोण विवाह करेल? ही भीती? समाजाने ठरवलेले शारीरिक मापदंड आणि केसही नसतील, तर स्त्रीचे काही खरे नाही, अशी क्रूर चौकट कुणी आखून दिली आहे? अर्थात, अपवादही आहेत. शारीरिक सौंदर्याच्या कुंपणात माणसाचे जगणे बंदिस्त करणार्या सगळ्या भौतिक आणि अभौतिकतेला झुगारणे ही काळाची गरज. कारण, दुसर्या कशाहीपेक्षा माणसाचे माणूस म्हणून सुंदर जगणे महत्त्वाचे. त्यामुळेच त्या मुलीची आत्महत्या काळजाला चटका लावून गेली.
हिंदूद्वेषाच्या डबक्यात डराव डराव
राहुल गांधी या ५६ वर्षांच्या युवकाने(?) मागेच हिंदू धर्मात पितृसत्ताक पद्धतीमुळे हिंदूधर्मीय महिलांचे जगणे कसे वाईट आहे, यावर आणि अशाच शेंडाबुडखा नसलेल्या गोष्टींवर अकलेच्या कुवतीप्रमाणे तारे तोडले. त्यानंतर त्यांच्या विधानाला कुठे ठेवू आणि कुठे नको असे करत हिंदू धर्माचा द्वेष करणार्या हिंदूंबद्दल मत्सर असणार्या त्या त्याच त्याच लोकांनी समाजमाध्यमांवर अगदी वात आणला. जणू काही राहुल गांधी हे हिंदू धर्माचे मोठे अभ्यासकच आहेत की नाही? जणू काही राहुल गांधींनी अख्खा जन्म हिंदू स्त्रीयांच्या उन्नतीसाठी वाहिला आहे की काय असे वाटावे, अशा अविभार्वात ही ठराविक मंडळी समाजमाध्यमांवर त्यांचे नसलेले ज्ञान पाजळत आहेत. अर्थात, प्रत्येकाला खुश राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ‘राहुल गांधी हे हिंदूं धर्माचे थोर सुधारक आहेत’ या अतर्क्य काल्पनिक दुनियेत रमणार्या लोकांनाही खुश राहण्याचा अधिकार आहे.
हिंदू धर्मात महिलांना कसा त्रास आहे, हे सांगताना हे लोक पुण्यातील कार्यक्रमामध्ये राहुल गांधी आणि त्यांच्याशी संवाद साधणार्या मुलींच्या वक्तव्यांचा आधार देतात. विशेष म्हणजे, ज्या मुली शिवराळ भाषा बोलतात, त्यांचे हे लोक कौतुकही करतात. मुलींनी शिवीगाळ केली तर काय झाले? स्त्री आणि पुरूषांमध्ये भेद का? असेही हे लोक प्रश्न विचारतात. पण, आपल्या घरात, कुटुंबामध्ये असे कोणी बोलते का? आईबहीण अगदी खानदानीच्या लैंगिक अवयवाचा, लैंगिक व्यव्हाराचा उद्धार करणारी ही वाक्ये! त्यांचा वापर म्हणजे आधुनिकता का? असो राहुल गांधींनी पितृसत्ताक पद्धतीला आव्हान दिले, असेही हे लोक सांगतात. याला काय म्हणावे? देशातील धर्मांध लोक सोडून बाकी अख्खा देश मानवतेची निरंतर प्रगती करत आहे. जुन्या आणि आधुनिक संकल्पनांचा समन्वय साधून काळानुसाार सकारात्मक बदल करत आहे. मात्र, त्याचवेळी हे हिंदूद्वेष्टे लोक हिंदूद्वेषाच्या डबक्यात डराव डराव करत आहेत. अर्थात, बेडूक कितीही फुगला तरी सिंहाची बरोबरी करू शकत नाही! पण, हे समजत नाही म्हणून तर हिंदूद्वेष्टे जळत-कुढत बसत आहेत आणि असेच राहणार!